मासांहारी पदार्थ

भारतीय लोक जास्त करून शाकाहारी आहेत. असे असले तरीही भारतातील प्रत्येक राज्यात, मांसाहारी पदार्थ हे जेवणाचा अविभाज्य भाग असलेले अनेक लोक आहेत. भारतीय मसाल्याचे पदार्थ वापरून केलेले सामिष भोजन हे परकीयांनासुध्दा हल्ली आवडू लागले आहे.

या आहारापासून शरीराला मुख्यत: जास्त प्रथिने (प्रोटिन्स) मिळत असल्यामुळेही हे पदार्थ खाल्ले जातात. पार्टी हवी तर ‘ओली’ व कोंबडीची अशी तरूणवर्गाची मागणी असते. समुद्रकिनारी रहाणा-यांकडे माशाचे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. महाराष्ट्रातील कोल्हापूर हे शहर झणझणीत मटणासाठी , तर अलिबाग,रत्नांगिरी हे माशांसाठी प्रसिध्द आहेत. गावोगावच्या जत्रेत काही गावदेवतांना मांसाहारी पदार्थच नैवेद्याला लागतात. कोकणकडील भागात नारळाचे वाटण वापरून हे पदार्थ बनविले जातात. खास मराठी ढंगाचे मांसाहारी पदार्थ या विभागात दिलेले आहेत. ते आपल्याला खचितच आवडतील.

अंडाकरी

Andacurry साहित्य – १ मोठा नारळ, ६ उकडलेली अंडी, २ वाटया उभा चिरलेला कांदा, २ इंच आले, ५-६ हिरव्या मिरच्या, पाव चमचा हळद, ३ चमचे तेल, आर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, १ चमचा मीठ, २ चमचे लिंबाचा रस, ८ लसूण पाकळया, १ चमचा गोडा मसाला, १ वाटी उकळते पाणी.
व्हाईट सोस साहित्य – १ चमचा मैदा, १ कप दूध, १ चमचा लोणी.

वाटण – आले लसूण पाकळया, काळा मसाला, मीठ व मिरची बारीक वाटा. नारळ वाटून त्याचे दूध काढा.

कृती – एका पातेलीत तेल गरम करा. त्यावर वाटण घालून परता रंग बदलू नका. कांदा घाला व परता, नंतर उकळून ठेवलेले दूध घाला व उकळी आली की उकडलेली अंडी सोलून त्यांचेही तुकडे करून घाला. लिंबाचा रस व कोथिंबीर घाला. १ वाटीभर गरम पाणी घाला व मिश्रणाला चांगली उकळी आणा. ही करी ५-६ माणसांना पुरेल.

बटर चिकन

butter chicken
साहित्य – १ चिकन (५०० ते ६०० ग्रॅमचा छोटा बर्ड घ्यावा), २ चमचे साजूक तूप, ४ टेबलस्पून बटर, पाव किलो कांदे चिरून व उकडून, २ चमचे खसखस आणि मूठभर काजू भिजवून वाटून, अर्धी वाटी साईचे दूध, २ चमचे गरम मसाला, चार मोठे टोमॅटो उकडून व सोलून, १ चमचा धने-जिरे पावडर, २ चहाचे चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, १०० ग्रॅम ताजी मलई अथवा ५० ग्रॅम किसलेले चीज, मूठभर चिरलेली कोथिंबीर, १०-१२ पाकळया, १ इंच आले वाटून.

कृती – चिकन साफ करून त्याचे मोठे तुकडे करावेत व थोडे मीठ व १ कप पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये घालावे व कुकर गॅसवर ठेवावा. पूर्ण आचेवर आल्यावर गॅस बारीक करून २ मिनिटे शिजू द्यावे व गॅस बंद करावा. प्रेशर कुकर थंड झाल्यावर चिकन काढून घ्यावे व पाणी निथळून बाजूला ठेवावे. चिकन सोलून सर्व हाडे बाजूला काढून मांसल भाग काढून घ्यावा. वरील प्रकार चिकन उकडून न घेता मीठ व तेलाचा हात लावून ओव्हनमध्ये भाजून घ्यावे व सोलून मांसल भाग काढून घ्यावा. दोन्ही प्रकारे कुठलीही पध्दत अवलंबली तरी चालेल. पण ओव्हनमध्ये भाजून घेतलेल्या चिकनचे बटर जास्त खमंग व चविष्ट लागते. उकडलेला कांदा वाटून घ्यावा, उकडलेले टोमॅटो बारीक करून मिक्सरमधुन काढून घ्यावे. कढईमध्ये साजूक तूप व लोणी एकत्र गरम करावे व त्यात उकडून वाटलेला कांदा घालावा. कांदा गुलाबी रंगाचा होऊन तूप बाजूला सुटेपर्यंत परतावे. मग त्यात वाटलेलं आलं, लसूण घालावे. थोडे परतून वाटलेले खसखस, काजू व साईचे दही घालावे व तूप सुटेपर्यंत परतावे. मग त्यात लाल तिखट, धनेजिरे पावडर व गरम मसाला घालून परतावे. त्यात मिक्सिरमधून काढलेल्या टोमॅटोचा गर घालावा. चवीनुसार मीठ घालून चिकनचे तुकडे घालावेत. १ वाटी पाणी घालून थोडे उकळू द्यावे. बाऊलमध्ये काढून ताजी मलई व कोथ्रिबीर घालून सजवावे अथवा ओव्हनप्रुफ डिशमध्ये काढून वर किसलेले चीज घालून १० मिनिटे गरम ओव्हनमध्ये ग्रील करावे (चीज वितळे पर्यंत) वरील बटर चिकनला चिकनचा मांसल भाग काडून घेतल्यानंतर आवडत असल्यास खाण्याचा लाल रंग चोळून लावावा.

कोळंबीची खिचडी

kolambi-khichadi साहित्य – अर्धा किलां सोललेली कोळंबी, अर्धा किलो उत्तम प्रतीचा तांदूळ, ७-८ लसूण पाकळया व १ इंच आले वाटन, १ चमचा लाल तिखट, २ नारळाचे दूध, पाऊण वाटी तेल, २ मोठे दालचिनीचे तुकडे, ३-४ लवंगा, चार हिरवे वेलदोडे, अर्धा चमचा शहाजिरे, २ तमालपत्राची पाने, चवीनुसार मीठ, १ चमचा गरम मसाला, १ चमचा बडीशेप, १ चमचा जिरे बारीक पूड करून, १ चमचा हळद.

कृती – कोळंबी स्वच्छ धुवून हळद व मीठ लावून ठेवावी. तांदूळ धुवून चाळणीत लिथळत ठेवावेत. दोन नारळ वाटून दूध काढून घ्यावे. अंदाजे चार भांडी झाले पाहिजे. एका जाड बुडाच्या पातेलीत तेल गरम करावे. त्यात तमालपत्र, दालचिनी, हिरवे वेलदोडे व शिहाजिरे घालावे व त्यावर मीठ लावून ठेवलेली कोळंबी व वाटलेले आले, लसूण घालून परतावे. गरम मसाला, तिखट, हळद घालावी व निथळून ठेवलेली तांदूळ घालून परतावे. चार भांडी नारळाचे दूध व आवश्यक वाटले तर १ भांडे पाणी घालून चवीनुसार मीठ घालून खिचडी मंद आचेवर शिजू द्यावी. शिजवल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर व साजूक तूप घालून खाण्यास द्यावी.

पुणेरी मटन रस्सा

puneri-mutton-rassa
साहित्य – १ किलो कोवळे मटण, २ चमचे आले- लसूण, अर्धी जुडी कोथिंबीर, ४ हिरव्या मिरच्या मीठ व लिंबाचा रस घालून मटण मुरवत ठेवा. इतर साहित्य- ४ चमचा तळलेल्या कांद्याची पेस्ट, अर्धा कप दही, २ चमचे धने पूड, ६ लंवगा, २ इंच दालचिनी, २ वेलदोडे, अर्धा चमचा बडीशेप, १ टेबल चमचा खसखस भाजून, अर्धा कप ओल्या नारळाचा चव भाजून, ५ सुक्या लाल मिरच्यांची पेस्ट.

कृती
मटण थोडे पाणी घालून अर्धवट शिजवा, सर्व मसाल्याची बारीक पूड करा. थोडया तेलावर कांद्याची पेस्ट व दही भाजा. मिरच्यांची पेस्ट व मसाला पूड परतवा. मटण घाला, मीठ घालुन नरम शिजवा, वर कोथिंबीर पेरा. या पदार्थात थोडे भाजलेले तीळ वरून पेरल्यास पदार्थ पुणेरी दिसतो. मसाला परताना अर्धा चमचा साखर घातल्याने रंग चांगला येतो.

कोल्हापुरी पांढरा रस्सा

kolhapuri-pandhara-rassa
साहित्य – ४ कप मटण स्टॉक, ४-५ छोटे दालचिनीचे तुकडे, ३ लंवगा, ३-४ मसाला वेलदोडे, १ चमचा तूप, अथवा रिफाईड तेल, १ नारळाचे दूध काढून अंदाजे २ कप, पांढर्‍या मिर्‍यांची पूड १ चमचा, चवीनुसार मीठ

कृती
मटण स्वच्छ धुवून बारीक तुकडे करावेत त्यात ८ कप पाणी घालून प्रेशरकुकरमध्ये शिजवून घ्यावे. शिजल्यावर गाळून घ्यावे. ह्यालाच मटण स्टॉक म्हणतात. नारळ वाटून दूध काढावे. अंदाजे २ वाटया दाट दूध काढून गाळून घ्यावे. मटण स्टॉकमध्ये नारळाचे दूध घालून उकळावे व त्यात पांढर्‍या मिर्‍यांची पूड व चवीनुसार मीठ घालावे. १ चमचा तूप अथवा रिफाईड तेल गरम करून त्यात लवंगा, दालचिनीचे तुकडे, मसाला वेलची घालून ती फोडणी रश्श्यावर घालावी. नॉनव्हेज जेवणात गरम गरम सूपप्रमाणे द्यावा. तिखट आवडत असल्यास पांढर्‍या मिरीच्या पुडीचे प्रमाण वाढवावे. पांढरा रस्सा पातळ सूपप्रमाणे ठेवावा किंवा रश्श्याला थोडा वाटलेला नारळ लावून ग्रेव्हीप्रमाणे थोडा दाट करावा.