बोली भाषा

कोकणी

कोकण प्रदेशात अनेक बोलीभाषा बोलल्या जातात. त्या सर्वांना ‘कोकणी’ ही सामान्य संज्ञा वापरण्यात येते पण त्यांतील काही बोली भाषिक दृष्टीने एकमेकींपासून इतक्या भिन्न आहेत, की त्यांचा एकाच समूहात अंतर्भाव करणे चुकीचे ठरते.

इतर कोणताही निकष न लावता असे म्हणता येईल, की ज्या बोलींत मराठीतील पुल्लिंगी एकवचनी ‘आ’ या प्रत्ययाऐवजी ‘ओ’ येतो (मराठी – घोडा, काळा; कोकणी – घोडो, काळो) ; पण त्याचबरोबर ‘ला’ या शब्दयोगी अव्ययाला समानार्थक असा ‘का’ किंवा ‘क्’ हा प्रत्यय लागतो (तूं-तुका, मी-माका, घोडो-घोड्याक् इ.) त्या बोली कोकणी. पहिले लक्षण गुजरातीलाही लागू पडते, पण दुसरे फक्त कोकणीला. कोकणीचे आणखीही एक लक्षण आहे. ते म्हणजे ‘इ’ किंवा ‘उ’ कोणत्याही स्वरानंतर आल्यास त्यांचे स्वरत्व नाहीसे होते (मराठी – घेईन, घेऊन, भाऊ; कोकणी – घेयन,घेवन, भाव्)

या तत्त्वानुसार पाहिले, तर गोव्याच्या उत्तरेला असलेल्या दक्षिण रत्नागिरीच्या (मालवण,वेंगुर्ला, कुडाळ, सावंतवाडी) बोलींपासून केरळपर्यंत कोकणीचे विस्तारक्षेत्र आहे. या बोलींचे भाषिक वैशिष्ट्यांनुसार तीन भाग पाडता येतात.

(१) गोव्याच्या उत्तरेकडील मराठीशी संपर्क असलेली व तिने प्रभावित झालेली ‘उत्तर कोकणी’
(२) पोर्तुगीज प्रभुत्वाखाली चारशे वर्षे असलेली गोव्याची ‘मध्य कोकणी’ आणि
(३) कन्नड व मलयाळम् या भाषांनी वेढलेली अगदी खालची ‘दक्षिण कोकणी’

परस्पर आकलनाची कसोटी लावली, तर उत्तर कोकणी ही मराठीला अतिशय जवळची ठरते. या व सांस्कृतिक संबंधाच्या दृष्टीने तिला मराठीची पोटभाषा म्हणणे योग्य ठरेल. याउलट मध्य व दक्षिण कोकणी यांचा अंतर्भाव मात्र ‘कोकणी’ या स्वतंत्र भाषावाचक संज्ञेत करता येईल. स्थलभेद व वर्गभेद यांच्या दृष्टीने कोकणीच्या सहा महत्त्वाच्या प्रातिनिधिक बोली मानता येतात :

(१) गोव्याच्या उच्चवर्णीय हिंदूची
(२) गोव्याच्या गावडे वगैरे जातींची
(३) कर्नाटक किंवा चित्रापूर सारस्वतांची
(४) उत्तर कर्नाटकातील ख्रिश्चनांची
(५) गौड सारस्वतांची आणि
(६) मंगलोर आणि दक्षिण कर्नाटकच्या ख्रिश्चनांची

रूपविचार : पुढील वर्णन बहुतांशी वर उल्लेख केलेल्या सहा बोलींतील पहिल्या बोलीवर आधारलेले आहे. यात प्रामुख्याने नाम व क्रियापद यांचा विचार केला आहे
वाक्यविचार : वाक्यरचना मराठीप्रमाणेच आहे; पण गोव्याच्या ख्रिश्चन बोलीवर पोर्तुगीजचा प्रभाव दिसून येतो. पारंपरिक रचनेचे काही नमुने पुढे दिले आहेत.

भास म्हळयार उतरांची रास – भाषा म्हणजे शब्दांची रचना
अशें हावें तुमका सांगला – असे मी तुम्हाला सांगितल’.
हांव वत्ता – मी जातो.
तुजो बाव उशार आस्सा – तुझा भाऊ हुशार आहे.
पारके न्हाय ते – ते परके नाहीत.
तुजें काळिज बोरें – तुझे मन चांगले.
आनि तान्ने चाकरांपयकी एकळयाक – आणि त्याने चाकरांपैकी एकाला
आप्पोवनु ’हाज्जो अर्थु इत्ते’ – बोलावून ‘याचा अर्थ काय’
म्हुणु विचारलें – म्हणून विचारले

साहित्य : कोकणी भाषा देवनागरी, रोमन, कानडी किंवा उर्दू लिपींतही लिहिली जाते. जेझुइट धर्मप्रसारकांनी तिचा अभ्यास करून तिची व्याकरणे लिहिली आणि तीत धार्मिक ग्रंथही लिहिले. अनेक शतके बोलभाषा म्हणून ती वापरली गेली पण या शतकाच्या आरंभापासून तिच्या भाषिकांत निर्माण झालेली अस्मिता अतिशय प्रभावी ठरली असून तिच्यात विपुल साहित्यनिर्मितीही होत आहे. विशेषतः ‘शणै गोंयबाब’ या लोकप्रिय नावाने प्रसिद्ध असलेल्या वामन रघुनाथ वर्दे वालावलीकर यांच्या उदाहरणाने आणि प्रेरणेने प्रतिभासंपन्न सुशिक्षितांचे लक्ष स्वभाषेकडे वळले आहे. बा. भ. बोरकर, मनोहर सरदेसाय, र. वि. पंडित, रवींद्र केळेकार, द. कृ. सुकथनकर इ. नावांचा या संदर्भात उल्लेख करणे योग्य ठरेल. साहित्य अकादमीने कोकणीला एक स्वतंत्र साहित्यभाषा म्हणून मान्यताही दिली आहे.