समुद्रकिनारे

देवगड किनारा

हापूस आंब्यासाठी जगभरात प्रसिध्द झालेले देवगड अत्यंत देखणे आहे. समुद्रच्या काठाला देवगड किल्लयाचे अवशेष अजूनही मनमोहक आहेत. समुद्रकिना-याला उंच टेकडीवर पवनचक्क्या उभारल्या आहेत. तीन बाजूंनी डोंगर आणि एका बाजूला समुद्र असा देवगडचा समुद्रकिनारा अत्यंत सुंदर आहे. देवगड बंदरामध्ये मासेमारीच्या असंख्य बोटी नांगरलेल्या असतात. पूर्वी देवगड हे किनारपट्टीवरचे गजबजलेले बंदर होते. हे नैसर्गिक बंदर असल्याने अनेक मोठमोठया बोटी थेट किना-यापर्यंत येऊन लागत. देवगड किल्ला आनंदवाडी बंदराच्या मागील डोंगरावर वसला आहे. तटबंदी अजूनही ब-यापैकी शाबूत असून आत दीपगृह आहे. किल्ल्यामध्ये वाहन जाऊ शकेल अशी सोय आहे. सध्या तटरक्षक दलाच्या ताब्यात हा भाग आहे.

दोन टेकडयांमधील देवगडच्या किना-या पलीकडच्या डोंगरावर समुद्रपक्ष्यांचे थवेच्या थवे विसावलेले असतात.

देवगड परिसरात सर्वत्र आंब्याच्या बागा दिसतात. अत्यंत कष्टाने त्या उभ्या केल्या आहेत. मातीचा मागमूसही नसलेल्या ठिकाणी कातळामध्ये खड्डे काढून त्यात बाहेरून माती आणून रोपे लावली असून प्रसंगी माणसाकडून खांद्यावरून मिळेल तेथून पाणी आणून ही झाडे जतन केली आहेत. इथल्या शेतक-याने विज्ञानाची कास धरून आंब्यावर वेगवेगळे प्रयोग केले असून त्यामुळे उत्पन्न आणि दर्जा वाढवण्यास मदत झाली आहे.

देवगडच्या जवळच वाडा येथे विमलेश्वराचे देऊळ प्रसिध्द आहे. मागे उंच डोंगर. समोर वाहता ओढा, आणि दोन्ही बाजूला गर्द झाडी. डोंगराच्या पायथ्याशी संपूर्ण दगडात कोरीव काम केले असून ते पांडवकालीन असल्याची लोकांची समजूत आहे. देवळातील पिंडी वैशिष्टयपूर्ण आहे.

Devgad Beach समुद्रच्या काठावर वसलेला देवगड किल्ला
Devgad Beach विजयदुर्ग किल्ला, जेटीवरून

मुंबई-देवगड अंतर ४८० किलोमीटर. मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगावहूनही देवगडला जाता येते. अंतर ५०-५५ किलोमीटर.

वाडानर खाडी देवगडपासून ६ किलोमीटर अंतरावर आहे.

विजयदुर्ग देवगडपासून साधारण ३० किलोमीटर अंतरावरचे देवगड तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उत्तरेकडचे शेवटचे टोक. मुंबई-गोवा महामार्गावर नरळे येथे उतरून थेट विजयदुर्गला जाता येते. हे अंतर ५५ किलोमीटर आहे. विजयदुर्गच्या रस्त्यावर आजूबाजूला सर्वत्र आंब्याच्या बागा दिसतात. खाडीच्या पलिकडे रत्नागिरी जिल्हा सुरू होतो.

सन ११९५ ते १२०५ या कालावधीत शिलाहार घराण्यातील राजा भोज याने हा किल्ला बांधला. सन १२१८ मध्ये देवगिरीच्या यादवांनी तो ताब्यात घेतला. सन १३५४ मध्ये विजयनगरच्या राजानी यादवांचा पराभव करून कोकण प्रांत बळकावला. त्यानंतर १२५ वर्षे हा किल्ला विजापूरकरांच्याकडे होता. सन १६५३ मध्ये शिवराजानी हा किल्ला जिंकून त्यात अनेक सुधारणा केल्या.

हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटर असून बाजूने ४० किलोमीटर लांबीची विजयदुर्ग खाडी आहे. हे एक उत्कृष्ट बंदर आहे. किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ १७ एकर १९ गुंठे असून तटाची उंची ३६ मीटर आहे. ५ तटबंधामुळे किल्ला मजबूत व अभेद्य झाला आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारात मारूतीचे मंदिर असून आत शंकराच्या व भवानी मातेच्या मंदिराचे अवशेष सापडतात. किल्ल्याला एकूण २० बुरूज असून आत हत्ती, घोडयांच्या पागा आहेत. पाण्याच्या प्रचंड टाक्या, पिराची सदर, नगारखाना, खलबतखाना, साहेबाचे ओटे, दोन भुयारी मार्ग इत्यादि ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. १६५३ ते १८१८ पर्यंत या किल्ल्यावर मराठयांचा अंमल होता. सुमारे ७०० वर्षांहून अधिक स्वबळावर प्रभावी आरमारी केंद्र म्हणून उभे असलेल्या या किल्ल्यावर कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, संभाजी आंग्रे व नंतर आनंदराव धुळप यांच्यासारखे तेजस्वी आरमार प्रमुख होऊन गेले. इंग्रज, पोर्तुगिज, डच या परकियांनी गिब्राल्टर म्हणून उल्लेख केलेला हा किल्ला मराठेशाहीच्या अपूर्व शौर्याचा वारसा आहे.

Devgad Beach किल्ल्यामधील पक्की बांधलेली विहिर
Devgad Beach विजयदुर्ग किल्ल्याचा बुरूज

दक्षिणेकडील रेड्डी गावापासून सुरू झालेली सिंधुदुर्गच्या समुद्रकिना-याची सफर विजयदुर्ग किल्ल्यावर येऊन संपते. अत्यंत रमणीय पण दुर्लक्षित असा हा भाग सहलीसाठी अत्यंत सुरक्षित, कमी खर्चाचा आणि साहसाचा अनुभव देणारा असा आहे. इथला माणूस थोडासा चौकस आहे. पण शहरात दुर्मिळ झालेली माणूसकी तुम्हाला इथे नक्कीच अनुभवायला मिळेल. योग्य नियोजन केले तर कोणतीही अडचण न येता सहलीचा आनंद उपभोगता येईल. Location Icon

टिप – महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केलेला आहे. पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने अनेक ठिकाणी तंबू निवास, पर्यटन निवास उभारलेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात कोठेही राहण्या-जेवण्याची अडचण भासणार नाही.