मालवणहून आच-याला निघाल्यानंतर आडारी नदीचा पूल ओलांडल्यावर सर्जेकोट लागतो. मालवणपासून हे ठिकाण ८-९ किलोमीटर अंतरावर आहे. मासेमारीच्या असंख्य बोटी इथे नांगरलेल्या दिसतात. समुद्राच्या काठाला नारळी पोफळीच्या बागा आणि त्यामध्ये विखुरलेली घरे हे नेहमीचे कोकणचे दृष्य इथेही पाहायला मिळते.
गड नदीवर कालावल येथे मोठा खाडी पूल आहे. दोन्ही बाजूला पाण्याच्या काठाने नारळी पोफळीची झाडे, त्यांचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब आणि अधून मधून दिसणारी घरे… पुलावर हे पाहायला तुम्ही थांबला की पुढच्या प्रवासाला जाण्याची इच्छाच होत नाही. कालावल नंतर नारळी पोफळीची झाडे कमी कमी होत जातात, आणि आंब्याच्या बागा सुरू होतात. लाल कातळामध्ये खड्डे काढून हापूस आंब्याची झाडे लावून त्यांना कावडीने लांबून पाणी आणून हा आंबा कोकणी माणसाने परदेशी पाठवला आहे. हे प्रचंड श्रम मागे असल्यानेच हापूस आंबा इतका गोड लागतो.
आचरा बंदर या नावातच फक्त आता बंदर उरले आहे. एके काळी हेही एक चांगल्यापैकी बंदर होते. सध्या मात्र त्याचे अस्तित्वच हरवले आहे. आच-याचे ग्रामदैवत रामेश्वर हे एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. दर तीन किंवा पाच वर्षांनी या देवाची यात्रा होते. त्यावेळी सतत तीन रात्री सर्व सजीव प्राणी आणि ग्रामवासीय गावाच्या सीमेबाहेर राहतात. मालवणपासून आचरा साधारण १५-१६ किलोमीटर अंतरावर आहे. येथून मालवण कणकवली आणि देवगडलाही जाता येते. समुद्राच्या काठाला खाजगी रित्या राहण्याची व जेवणाची सोय होते. ट्रेकिंग करणारे अनेक लोक इथे राहतात आणि समुद्र काठाने चालत जाऊन येतात.
कुणकेश्वरचा समुद्र किनारा अत्यंत स्वच्छ असून सुरक्षितही आहे. मोठया प्रमाणावर मासेमारी चालते. संध्याकाळी सूर्यास्त पाहण्यासाठी न चुकता थांबावे. धार्मिक आणि सहलीचे ठिकाण अशा दोन्ही महत्त्वामुळे कुणकेश्वर चांगलेच प्रगत झाले आहे. इथे घरोघरी राहण्याची आणि जेवणाची सोय करतात. तुमच्याजवळ जर गाडी असेल तर ती पुढे देवगडला पाठवावी आणि किना-याने चालत देवगडला जावे. साधारण दीड ते दोन तासात रमत गमत देवगडला पोहोचता. चालण्याचे श्रमही जाणवणार नाहीत असा हा प्रवास आहे. देवगड कुणकेश्वर रस्त्याने १७-१८ किलोमीटर आहे. ३-४ किलोमीटरवर मिठबाव हे आणखी एक रमणीय ठिकाण आहे.
कुणकेश्वर ते मिठबाव साधारण १२ किलोमीटर अंतर आहे. सध्याचा नवीन पूल बांधल्याने हे अंतर निम्म्याहून कमी झालेले आहे. मिठबावला पांढ-याशुभ्र रेतीचा समुद्रकिनारा असून तो अत्यंत सुरक्षित आहे. मिठबावचा समुद्रकिनारा ६ किलोमीटर इतका लांब पसरलेला आहे. मिठबाव कुणकेश्वर या लांब पसरलेल्या समुद्रकिना-याने चालत जावे. किना-यावर जमलेल्या कोळयांची मासेमारी पाहावी. त्यांच्याकडून ताजे मासे विकत घेऊन कुणकेश्वरला त्या ताज्या माश्यावर ताव मारावा. बस्स! संध्याकाळी रम्य सूर्यास्त पाहावा. पाण्यात मनसोक्त डुंबावे. किना-यावर लहान मुलांच्या बरोबर खूप खेळावे. यापरता दुसरा आनंद कोणता? आंब्याच्या मोसमात रस्त्याच्या दुतर्फा फळांनी लगडलेली आंब्याची झाडे मन मोहून घेतात. आंबे उतरण्याचे काम सुरू असते. मोठमोठया राशी पॅकिंग करून लांब लांब आंबे पाठवण्याचे काम चालू असते. पण तुम्हाला शेतक-याकडून आंबा मिळणार नाही. बिचा-याला स्वत:लाच तो मिळत नाही. कारण बाग अगोदरच विकलेली असते. मात्र जामसांडे, देवगड येथे व्यापा-यांचेकडे आंबा विकत मिळतो.