महाराष्ट्राच्या समुद्र किना-यावरील दक्षिण टोकाचे शेवटचे गाव म्हणजे रेडी. रेडीला लागूनच गोव्याचा तेरेखोल किल्ला आहे. तेरेखोलची खाडी ओलांडली की, गोव्याच्या समुद्रकिना-यावरील ‘केरी’चे सुरूबन लागते. पूर्वी रेडीबंदर प्रसिध्द होते. परदेशी जाणा-या येणा-या बोटी इथे थांबत. सध्या मोठया बोटींची वाहतुक बंद आहे. त्यामुळे छायाचित्रात दिसणा-या जेटीजवळ बोटी दिसत नाहीत. रेडी हे खाणीसाठी देखील प्रसिध्द आहे. ‘उषा इस्पात’ हा प्रचंड प्रकल्प येथे आहे. वर्षानुवर्षे या मँगेनीजच्या खाणी असंख्य लोकांना रोजगार देत आलेल्या आहेत. रेडी खाणीच्या मुखाशी ऐतिहासिक यशवंतगड किल्ला आहे.
सावंतवाडीपासून रेडी बंदर साधारण ३५ ते ३८ किलोमीटर अंतरावर आहे. येथून २-३ किलोमीटरवरच गोव्याची हद्द सुरू होते. तेरेखोल किल्ला ३/४ किलोमीटरवर असून, त्या किल्लयामध्ये राहण्याची सोय आहे- मात्र बरीच खर्चिक. शिरोडा १०/१२ किलोमीटर अंतरावर असून तेथे जेवणाची व राहण्याची सोय होऊ शकते.
रेडी येथील हे गणपती मंदिर म्हणजे, एक जागृत देवस्थान आहे. ही मूर्ती पांडवकालीन आहे. मंदिर मात्र आधुनिक आहे. रेडी गावाच्या बाहेर, बंदराच्या जवळ, हे मंदिर उभारलेले आहे. एप्रिलमध्ये, चैत्र शुध्द पंचमीला येथे गणपती उत्सव होतो. याच्या जवळच माऊली मंदिर आहे.
शिरोडा हे ऐतिहासिक ठिकाण आहे. १९३० मध्ये महात्मा गांधींच्या आदेशानुसार येथेही मिठाचा सत्याग्रह झाला होता. येथील सत्याग्रहाचे नेतृत्त्व धर्मानंद कोसंबी आणि मामासाहेब देवगिरीकर यांनी केले होते. शिरोडा किनारा खूपच लांबवर पसरलेला आहे. हे गाव म्हणजे, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक वि. स. खांडेकर यांची कर्मभूमी. अद्यापही त्यांची शाळा या गावात आहे.
शिरोडा किनारा – आयुष्यभर ‘जीवनासाठी कला’ या ध्येयाने लिखाण करणा-या भाऊसाहेब खांडेकरांना या अथांग सागरानेच जीवनवादी बनविले नसेल ना?
शिरोडा सुरूचे बन – रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारळी-पोफळीच्या बागा, मोठमोठी मिठागरे, यामुळे या गावाला वेगळेच सौंदर्य लाभलेले आहे. समुद्र किना-यावरील लांबच लांब पसरलेले सुरूचे बन अत्यंत आकर्षक आहे.
शिरोडयाच्या जवळच १/२ किलोमीटरवर आरवली हे गाव असून त्याच्या शेजारीच आजगांव आहे. आरवलीचा वेतोबा प्रसिध्द आहे. अत्यंत सुंदर मंदिर आणि आत लाकडची भव्य मूर्ती. जयवंत दळवींची ही जन्मभूमी त्यांच्या कादंब-यांमधून अजरामर झाली आहे. पत्रकार पु. वा. बेहेरे इथलेच.
मिठागरासाठी साठवलेले पाणी – शिरोडा-रेडी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशी अनेक मिठागरे आहेत. पाणी आटून गेल्यानंतर सर्वत्र मिठाच्या राशी दिसतात.
दशावतार हा प्रकार म्हणजे, सिंधुदुर्गाचा सांस्कृतिक ठेवा आहे. रात्रभर चालणारा हा नाटयप्रकार म्हणजे केवळ करमणूकीची भाग नसून इथल्या स्थानिक कलाकारांच्या कलागुणांचा विकास साधण्याचे फार मोठे साधन आहे. गणेशोत्सव, शिमगा इ. उत्सवामध्ये या नाटयप्रयोगांचे गावोगावी खेळ होतात.
कोकणातील देवळे अत्यंत वैशिष्टयपूर्ण आहेत. अत्यंत स्वच्छ, नीटनेटकी, आणि प्रशस्त अशी रचना असलेल्या या देवळांनी इथलया समाजाची केवळ भक्ती भावनाच जतन केलेली नाही तर, सांस्कृतिक मूल्ये वाढविण्याचे महान कार्यही गेली कित्येक वर्षे केलेले आहे. त्यामुळे केवळ देवदर्शनासाठीच ही देवळे नाहीत. रात्र-रात्र येथे भजने चालतात.
दशावताराबरोबरच इथल्या पिंगुळी गावातील ठाकर समाजाची चित्रकथा हा एक अनोखा सांस्कृतिक ठेवाही या लोकांनी जतन केलेला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयाने देशाला अनेक मौल्यवान रत्ने दिलेली आहेत. कोकणचे गांधी- अप्पासाहेब पटवर्धन, साहित्य क्षेत्रामधले दिग्गज- नाटककार र. के. खाडीलकर, न. चिं. केळकर, ग. त्र्यं. माडखोलकर, जयवंत दळवी, मामासाहेब वरेरकर, वि. स. खांडेकर, मराठीवृत्तपत्रांचे आद्य जनक- ‘दर्पण’कार- बाळशास्त्री जांभेकर, ‘आरती प्रभू’ या नावाने कविता लिहीणारे, चिं. त्र्यं. खानोलकर, कवी वसंत सावंत, मधु मंगेश कर्णिक… किती नावे घ्यावीत? या साहित्यिकांनी कोकणची भूमी आणि कोकणी माणसाचा अख्या मराठी जगाला परिचय करून दिला आहे. साहित्याबरोबरच इतर क्षेत्रातही इथल्या लोकांनी नाव-लौकिक मिळवला आहे. त्यामध्ये संगीतकार वसंत देसाई, चित्रपट कलावंत हंसा वाडकर, रॉयल सर्कसचे नारायण वालावलकर, क्रिडा क्षेत्रातले विजय मांजरेकर, दिलीप वेंगसरकर, सुनील गावस्कर, संजय मांजरेकर.
शिरोडयापासून ५/६ किलोमीटरवर असलेला एक विस्तीर्ण किनारा. या किना-यावर ‘सागरतीर्थ’ हे तंबू निवास आहे. उजवीकडील डोंगराच्या माथ्यावरून वेंगुर्ल्याचे दर्शन होते.
अत्यंत समृध्द असा निसर्ग असूनही भौगोलिक परिस्थितीमुळे इथे प्रचंड दारिद्रय नांदायचे. त्यामुळे मुंबईच्या मनी-ऑर्डरवरच चरितार्थ चालायचा. मात्र आता ही परिस्थिती बदलायला लागली आहे. हापूस आंब्याने जगभरात आपला नाव-लौकिक राखला आहे, आणि त्याचबरोबर कोकणी माणसाचे दैन्य दूर करायला हातभारही लावला आहे. फलोत्पादनामध्ये झालेल्या नवनवीन प्रयोगांची मधुर फळे, या माणसांना आता चाखायला मिळू लागली आहेत. फळावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग आता सुरू झाले आहेत. कोकण रेल्वेने सर्व जग आता कोकणी माणसाच्या परसात आले आहे. मात्र त्याचबरोबर काही धोकेही त्याचे दार ठोठवायला लागलेत. इथल्या भूमीपुत्राची जमीन वाटेल ती किंमत देऊन विकत घ्यायला पैसेवाले कोकण रेल्वेनच इथे अवतरले आहेत. वेळीच सावध झाला नाही तर हा कोकणी माणूस या भूमीलाच परका व्हायला वेळ लागणार नाही.