मराठी संत

संत ज्ञानेश्वर

sant-dnyaneshwar महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे महत्त्व खूपच मोठे. कष्टकरी जनसामान्यांच्या वारकरी संप्रदयात “माऊली” उच्चारताच लगेच संत ज्ञानेश्वर महाराज वारक-यांच्या मनात येतात. वारकरी संप्रदायामध्ये माऊलींचे कार्य अलौकिक आहे. त्यांनी आपले सर्व जीवन पांडुरंगाच्या भक्तीत तसेच लोककार्यासाठी वाहून दिले. त्याकाळी ज्ञानोबा व त्यांच्या भावडांना खूप मोठ्या त्रासाला तोंड दयावे लागले. संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी व आई रुखमिणी यांनी संन्यास सोडून गृहस्थाश्रम स्विकारल्याचे प्रायश्चित म्हणून गावक-यांनी त्यांना देहांताची शिक्षा दिली. आपल्या मुलांवर समाजाने टाकलेला बहिष्कार परत घ्यावा ह्यासाठी उभयतांनी इंद्रायणीत आपला देहत्याग केला.

संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाचे तेज लहानपणापासूनच जाणवायचे. त्याकाळी संस्कृत भाषेत असलेले ज्ञान केवळ विशिष्ट वर्गातच सिमित होते त्यासाठी वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ लिहिला. संत ज्ञानेश्वरानी भगवतगीतेचे सार सामान्यांसाठी मराठीत लिहिले. त्याव्यतिरिक्त हरिपाठ व पसायदान असे अध्यात्मिक लिखाणही लोकांसाठी केले. लहानपणी आळंदी येथे वास्तव्यास असतांना ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे माधुकरी मागून जीवन कंठीत असत. एके दिवशी भाक-या थापण्यासाठी खापर कोणी दिले नाही. त्यावेळी छोटया मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर भाकरी थापल्या. योगी चांगदेव वाघावर बसून माउलीकडे निघाले त्यावेळेला ज्ञानेश्वर त्यांचा अहंकार मोडण्यासाठी आपल्या भावंडासह अर्धवट बांधलेल्या भिंतीवर बसून चाल करुन गेले . कर्मठ पंडीतासमोरही ज्ञानेश्वरांनी रेडयाच्या मुखी वेद बोलून दाखवला. असे अनेक प्रसंग ज्ञानेश्वरांचे मोठेपण आणि दिव्यशक्तीचा प्रत्यय देतात. उभ्या महाराष्ट्राच्या ह्या माऊलींनी केवळ २२ वर्षांचे असतांना जीवंत समाधी घेतली.

संत मुक्ताबाई

sant-muktabai महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले त्यात पुरुष बरोबरीने महिला संतांनीही समाज प्रबोधनात खूप मोठा हातभार लावलेला आहे. संत मुक्ताबाई यांचा उल्लेख त्यात करावाच लागेल. संत मुक्ताबाई या महाराष्ट्रातील संत-कवयित्री होत्या. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे त्यांचे थोरले भाऊ होते.

संत मुक्ताबाई ह्या संत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या बहीण म्हणून सर्वांना परिचित आहेत. परंतु त्यांचे स्वतःचेही स्वतंत्र व्यक्तीमत्व होते. त्यांनी रचिलेले ताटीचे अभंग हे त्यांच्या नावावर नोंदविलेले आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी संत ज्ञानेश्वरांना काही बोध दिला आहे. त्या योगी चांगदेवांच्या गुरू होत्या. त्यांनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे असे संशोधनांती स्पष्ट होते. ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आलेला आहे. त्या समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते.

त्यांचा जन्म शके ११९९ किंवा शके १२०१ मध्ये आश्विन शुद्ध प्रतिपदेला (घटस्थापना) झाला असा उल्लेख आहे. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा, मातापित्यांचा देहत्याग, ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस दिलेली सनद, विसोबा खेचर यांचे शरण येणे हे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग. शुद्धिपत्र मिळविण्यासाठी चौघे भावडं पैठण गावी आले. “ताटी उघडा ज्ञानेश्वरा” अशी आर्जव मुक्ताईने ज्ञानेश्वरांना केली होती. ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरीची निर्मिती करण्यातही मुक्ताबाईचा मोलाचा वाटा आहे. मुक्ताबाईने चांगदेवाना ‘पासष्टी’चा अर्थ सांगितला. त्यानंतर चांगदेव महाराज मुक्ताबाईचे पहिले शिष्य झाले. मुक्ताबाईंवर गोरक्षनाथांच्या कृपेचाही वर्षाव झाला होता. त्यानंतर मुक्ताबाईला अमृत संजीवनीची प्राप्ती झाली.

मुक्ताबाई यांची अभंग निर्मितीही अतिशय अर्थपूर्ण आणि समाजाभिमुख आहे. त्यांच्या अभंगातून सर्वांच्या जीवनाच्या अनुषंगाने उल्लेख आढळतो. अशा या संत मुक्ताबाईस विनम्र अभिवादन.

संत नामदेव

sant-namdev संत नामदेवांचे कुटूंब वारकरी संप्रादयाचे होते. जवळ- जवळ अठरा माणसांचे कुटुंब पांडुरंगाच्या भक्तीत लीन होते. घरच्या या वातावरणाचा प्रभाव संत नामदेवावर झाला. बालपणी झालेले संस्कार आयुष्यभर त्यांच्या सोबत होते. नामदेवांचे वडील दामाशेठी व आई गोणाई हे प्रामाणिक विठ्ठल भक्त होते.

संत नामदेवांची भक्ती सर्वश्रुत होती व ते भगवान विठ्ठलाचे सर्वात लाडके होते. एकदा त्यांचे वडील बाहेर काही कामानिमित बाहेर गेले होते तेव्हा देवाचा नैवेद्य घेऊन नामा गेले तेव्हा त्यांनी स्वतःच्या हातांनी पांडुरंगाला जेऊ घातले यामुळे ते लोकांत प्रसिद्ध झाले. संत नामदेवांनी आपले सगळे जीवन वारकरी सेवेत घालवले त्यांना कधीही अहंकार आला नाही. ते नेहमी देवाच्या गुण नामातच रमले. संत ज्ञानेश्वर, निवृतीनाथ, सोपानदेव, गोरोबा, मुक्ताई, चोखामेळा हे त्यांचे समकालीन संत होते. त्यांचे अध्यात्मिक गुरु विसोबा खेचर होते. आपल्या वारकरी जीवनात अनेक प्रकारचे अभंग, गौळणी अशा अनेक प्रकारचे लिखाण नामदेवरायांनी केले. संत जनाबाईंना त्यांच्या घरी आश्रय दिला गेला व त्यांना देखील अध्यात्मिक ज्ञान दिले. हे सर्व नामदेवरायामुळे झाल्यामुळेच जनाबाईचा उल्लेख नेहमी, ‘ दासी जनी नामयाची’ असाच होतो.

नामदेवरायांचे कीर्तन हे त्यावेळेला चर्चेचा विषय ठरत असे. खुद्ध विठ्ठल भगवान कीर्तनाला हजर राहत असे.

‘नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग ।’

इतकी शक्ती त्यांच्याकडे होती. त्यांचा शुद्ध भाव होता जो देवाला देखील आवडत असे.

भागवत धर्माची पताका त्यांनी महाराष्ट्राबाहेर नेली लोकांना भक्तीत आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. श्री गोविंद ग्रंथ साहिब या शिख लोकांच्या पवित्र ग्रंथात नामदेवरायांची अभंग व वर्णने केलेली आहेत. पंजाब, राजस्थान, हरियाना या ठिकाणी नामदेवरायांची मंदिरे देखील बांधलेली आहे. त्याकाळी भक्ती बरोबरच देशप्रेमाचे बीज लोकांच्या मनात रुजवण्याचे काम केले.