धामापूर- तलावाच्या काठाला बांधलेले भगवती देवीचे मंदिर.
धामापूर- तलाव
गोडया पाण्याचा प्रचंड जलाशय. या तलावाच्या किनाऱ्याला शासनाची रोपवाटिका असून हिवाळयात जलाशयाच्या दलदलीच्या भागात अनेक पक्षी स्थलांतर करून येतात. हे पाणी धामापूर काळसे गावास वापरण्यासाठी पुरविले जाते. कुडाळ-मालवण रस्त्यावर कुडाळपासून १३-१४ किलोमीटरवर नेरूरपार खाडीच्या पुढे हा तलाव आहे.
सिंधुदुर्ग किल्ला – होडीतून. शिवराजांच्या दूरदृष्टीचे प्रतिक
किल्ल्यावरील शिवाजी राजांचे मंदिर
मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला हे या जिल्ह्याचे वैभव. मालवणपासून एक ते दीड किलोमीटरवर समुदात हा किल्ला वसलेला असून बोटीने किल्ल्यावर जाण्याची सोय आहे. शिवाजी राजांचे एकमेव मंदिर या किल्ल्यात असून महाराष्ट्रात इतर कोठेही शिवाजी राजांची मूर्ती देवळात बसवण्यात आलेली नाही. या मंदिराचा मंडप छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेला आहे. किल्ल्याच्या चारी बाजूंनी अद्यापही बऱ्यापैकी तटबंदी शिल्लक आहे. किल्ल्यावर गोडया पाण्याच्या विहिरी आहेत. १६६४ मध्ये शिवाजी राजांनी ‘कुरटे’ बेटावर हा किल्ला उभारला. ४४ एकर क्षेत्रावर हा किल्ला बांधायला ३ वर्षे लागली.
कुडाळ-मालवण रस्त्यावर ८-९ किलोमीटरवर कर्ली नदीच्या खाडीवर हा पूल बांधल्याने कुडाळ ते मालवण अंतर निम्म्याने कमी झाले आहे. मालवण हे एके काळी गजबजलेले बंदर होते. आता तेथे मासेमारीचा व्यवसाय मोठया प्रमाणात चालतो. मालवणी जेवण तर अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. येथे जेवण्याची व राहण्याची चांगली सोय आहे. मालवणी ‘खाजे’ हा एक वेगळा खाद्यपदार्थ पर्यटक येथून न्यायला विसरत नाहीत.
नेरूरपार खाडी, पुलावरून खाडीचे चित्र
सर्जेकोट. झाडीत लपलेले गाव. जेटीवरून घेतलेले चित्र.
तालुक्याचे मुख्यालय असलेले हे मालवण माश्याच्या जेवणासाठी महाराष्ट्राबाहेरही प्रसिध्द आहे. आरसे महाल हे शासकीय विश्रामगृह समुद्राच्या काठालाच आहे. मालवण जवळ ओझर येथे ब्रह्मानंद स्वामींचे सुंदर मंदिर आहे. जवळच्या अंगणेवाडीची जत्रा हा साऱ्या कोकणचा कौतुकाचा विषय असतो. मुंबई मालवण अंतर ५२० किलोमीटर असून मुंबई-गोवा महा मार्गावरील कसाल गावापासून मालवण ३२ किलोमीटर आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी शिवरायांनी त्याच्या भोवती पद्मगड, राजकोट, सर्जेकोट, भरतगड, भगवंतगड असे छोटे छोटे गड वसवले होते.
सर्जेकोट बंदरामध्ये थांबलेल्या मासेमारीच्या होडया. होडीतून खाडीपलिकडे पसरलेल्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावर जाता येते. पलिकडे दिसतो तो तोंडवळीचा किनारा.