पौष्टिक पदार्थ

प्रत्येक ऋतू बदलतांना हवामानात बदल होत असतो. आणि बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होत असतो. म्हणून हवामानाच्या बदलाबरोबर आपल्याला आपल्या आहारातही बदल करावा लागतो.

उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे भारतातील एका वर्षात क्रमाने येणारे ऋतू आहेत. आपले आरोग्य चांगले टिकवायचे असेल तर या ऋतूमानानुसार आपला आहार ठेवला पाहिजे आणि आशा तऱ्हेने आहारात सतत बदल करणे फार महत्वाचे आहे. उन्हाळयाचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. वसंत ऋतूमध्ये उन्हाळयाची तीव्रता कमी असते. ग्रीष्म ऋतूमध्ये ती वाढते. उन्हाळयात खोकला घशाचे विकार, ताप इत्यादी रोग कफामुळे उद्भवतात. म्हणून कफ कमी करणाऱ्या आहाराची आवश्यकता असते. उन्हाळयात तेलकट, तुपकट, लोणी, दूध, तूप इत्यादी स्निग्ध पदार्थांचे प्रमाण कमी करावे. ह्या दिवसांत आहारात धान्याचे प्रमाण वाढवावे. कांदे आणि कडू रसाच्या भाज्यांचे प्रमाण वाढवावे. दही व आंबट पदार्थांचे प्रमाण कमी करावे. फार थंड पेयांनी शरीरीतील कफ वाढतो म्हणून बर्फातील पेय, आईस्क्रीम बेतानेच घ्यावी. आल्याचा रस, मध, इत्यादींचा उपयोग करावा. उन्हाळयातील अन्नपदार्थ हे नेहमी पचायला सोपे, नजरेला आनंद देणारे, करायला सोपे व अगदी ताजे असावे. आपल्याला शक्य असेल तेवढी फळे व पातळ पदार्थ ह्यांचा जेवणात अंतर्भाव करावा. उन्हाळयात गुलकंद, लोणी, खडीसाखर, ताजे ताक, अमसुलाचे, लिंबाचे, कलिंगडाचे, कैरीचे, किंवा अननसाचे सरबत, कांद्याची कोशंबीर, करवंदाचे लोणचे, तऱ्हेतऱ्हेची रायती, उसाचा रस घालून केलेल्या दशम्या, काकडीचे व पपईचे पदार्थ अत्यंत हितावह असतात. वेगवेगळी सॅलडस् , दहीभात, कैरीभात, लिंबूभात, फ्राईड राईस, पुलाव हे पदार्थ या दिवसांत करावे. तसेच आंब्याचेही अनेक पदार्थ करावेत. कोल्ड कॉफी व थंडगार केलेली फळे ही मुलांची फार आवडती असतात. उन्हाळयात घाम बराच येतो. घामाबरोबर शरीरातील मीठ बाहेर टाकले जाते. म्हणून ह्या दिवसांत आहारातील मिठाचे प्रमाण थोडे वाढवावे. अति उष्णतेमुळे ह्या दिवसांत शरीर जरा अशक्त व म्लान होते. म्हणून उन्हाळयात फार व्यायाम व कष्ट करू नयेत. उन्हाळयात वाळा घातलेले पाणी प्यावे. आवडत असल्यास व प्रकृतीला सोसत असल्यास थंड पाण्याने स्नान करावे. शक्य असेल तर जलविहार व पोहणे हे अत्यंत हितकर असे व्यायाम करावे.

पावसाळयात सूर्यकिरण प्रखर नसतात. त्यामुळे सहाजिकच रोगाचा प्रदुर्भाव जास्त होतो. पावसळयात पावसाबरोबरच गार वारे वाहतात. त्याचा शरीरप्रकृतीवर फार परिणाम होतो. पावसाळयात उत्साह कमी असतो. अग्निमांद्य होते. पचन चांगले होत नाही. म्हणून या दिवसात आहार हलकाच असावा. थोडे कमीच खाण्याची प्रवृत्ती असावी. खाण्यापिण्याचे पदार्थ अगदी स्वच्छ, ताजे व गरम असावे. ह्या दिवसांत अहारात कांदा, लसूण, हिंग व सुंठ ह्यांचा उपयोग करावा. त्यामुळे पचनाला मदत होतेच व इतर अनेक विकारांचा त्रास होत नाही. पावसाळयात लसूण जास्त खावा. त्यामुळे पोट फुगणे किंवा पोट दुखणे हे विकार कमी होण्यास मदत होते. आहारशास्त्राच्या दृष्टीने कांदा व लसूण हे चांगले अन्नपदार्थ असूनही जून्या धर्म शास्त्राप्रमाणे हे पदार्थ चार्तुमासात निषिध्द मानले आहेत. बरेचसे धार्मिक सण, व्रतवैकल्ये ही चार्तुमासात असतात. पावसाळयात जास्त बाहेर जाता येत नाही म्हणून धार्मिक गोष्टी ठेवल्या आहेत. पावसाळयात तुरट व कडू भाज्या खाणे चांगले; पडवळ, कार्ली इत्यादी. पावसाळयात उपवास व धान्यफराळ करावे. त्यामुळे पचनाला मदत होते. ह्या दिवसांत मक्याची कणसे मिळतात. ती खावीत. कणसाला तूप, मीठ किंवा लोणी व मीठ लावून खावे. वांग्याचा मसालेभात, कडबू, भरली भेंडी, भरली मिरची हे पदार्थ बदल म्हणून करावेत. खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप स्वच्छता ठेवावी. पावसाळयात नद्यांना नवीन पाणी येते. नद्या, तलाव, विहिरी ह्यांचे पाणी ह्या दिवसांत अपायकारक असते म्हणून पाणी नेहमी गाळून उकळून स्वच्छ करून प्यावे.

थंडी पडू लागली की आपण लगेच गरम कपडे वापरायला काढतो. कपडयांत जसा बदल करतो तसा आहारातही करायला पाहिजे. थंडीत घाम येत नाही. भूक चांगली लागते व पचनही चांगले होते. म्हणून आयुर्वेदाप्रमाणे ह्या दिवसांत मधुर, आम्ल व लवण ह्या रसांचे भरपूर सेवन करावे. हिवाळयात रात्र मोठी व दिवस लहान असतो. म्हणून हिवाळयात धुंधुरमास करावा असे आपले जूने लोक म्हणतात. धुंधरमास म्हणजे सकाळी लवकर जेवणे. जेवण्यात मुगाच्या डाळीची खिचडी, तूप, बाजरीची तीळ लावलेली भाकरी वांग्याची भाजी वैगरे पदार्थ ठरलेले असत. ह्या पदार्थात खूप कॅलरीज् आहेत. म्हणजे हे उष्णता देणारे पदार्थ आहेत. जून्या काळच्या लोकांना कॅलरीज् कदाचित माहीत नसतील पण आहारशास्त्राच्या दृष्टीकोनातून धुंधुरमास व त्यासाठी ठरविलेले पदार्थ योग्य आहेत असे आढळते. संक्रातीच्या सणाला आपल्याकडे तीळ व गुळ यांचे महत्व असते, व ते अगदी योग्य आहे. संक्रांतीला तीळाचे पदार्थ व गुळाची पोळी करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. तांदूळ, बाजरी, मूग, उडीद, बटाटे, रताळी, वांगी, वाटाणा, घेवडा, केळी, खजूर मनूका, सूके अंजीर, दाणे, तीळ, काजू, तेल, तूप, लोणी वैगरे पदार्थ भरपूर उष्णता देणारे आहेत. ह्या पदार्थांचा थंडीच्या दिवसांत भरपूर उपयोग करावा. थंडीच्या दिवसांत हरतऱ्हेच्या भाज्या बाजारात उपलब्ध असतात. त्यामुळे ह्या दिवसांत स्वयंपाकातील नानाविध प्रकार करता येतील. ह्या दिवसात फिश चांगला मिळतो. बिर्याणी, अंडयाचे पदार्थ व मोंगलाई डिशेस करण्याचा हा सीझन उत्तम. तसेच ह्या दिवसांत नाना रंगाची व विविध वासांची फळे मिळतात. संत्री, मोसंबी, सफरचंदे, डाळींबे, सिताफळे, पिअर व नाशिकची द्राक्षे ह्या सीझनमध्ये भरपूर मिळतात. हिवाळयात व्यायाम भरपूर करावा. तेलाने शरीराला मालिश करावे व गरम पाण्याने स्नान करावे. दिवाळीतील तेल, उटणी व अंघोळ यांचे महत्व आता ध्यानात येईलच. शेवटी थोडक्यात असे सांगता येईल, की ऋतुमानानुसार आपल्याला अन्नात बदल केला पाहिजे. बाजारात काय मिळते आहे व त्यातले आपल्या पैशात काय बसते आहे, हे प्रथम पाहायला हवे. म्हणून अत्यंत शहाणपणाने व योग्य रीतीने अंदाजपत्रक आखावे आणि त्यानुसाराने योग्य ते पदार्थ करावे.

डिंकाचे लाडू

dinkachey ladoo साहित्य – २ वाटया डिंक, ३ वाटया सुक्या खोबर्‍याचा कीस, २ वाटया खारकाची पूड, आर्धी वाटी खसखस, १ वाटी कणिक, २ वाटया तूप, ३ वाटया गूळ किसून, १ वाटी पिठीसाखर, १ जायफळाची पूड.

कृती – डिंक जाडसर कुटावा, खारका कुटून बारीक पूड करावी. बदाम सोलून पूड अथवा काप करावेत, खसखस गुलाबी रंगावर भाजून तिचा बारीक कूट करावा. कणिक तूपावर खमंग भाजावी, खोबरे किसून भाजून हाताने कुस्करून घ्यावे. कढईत तूप गरम करूल थोडा थोडा डिंक घालून फुलवून तळून घ्यावा. परातीत तळलेला डिंक, खारीक पूड, बदाम काप, कुटलेली खसखस, जायफळ पूड, खोबरे सर्व एकत्र चांगले कालवावे. त्यात तीन वाटया किसलेला गुळ व साखर मिसळावी. फार कोरडे वाटले तर २ चमचे साजूक तूप गरम करून घालावे व मध्यम आकाराचे लाडू वळावेत.
वरील साहित्यात २०-२२ लाडू होतात.

अळीवाचे लाडू

ahliwachey ladoo साहित्य – २ नारळ खरवडून, ५० ग्रॅम अळीव, अर्धे जायफळ किसून, २ वाटया गूळ चिरून, अर्धी वाटी साखर, ५-६ वेलदोडयांची पूड.

कृती – २ नारळ खरवडून घ्यावेत, अळीवात बारीक खडे असतात, अळीव स्वच्छ निवडून नारळामध्ये मिसळून एका कल्हईच्या जाड बुडाच्या पातेल्यात ३-४ तास झाकून ठेवावे. अळीव नारळाच्या ओलसरपणामुळे फुलून आले की त्यात जिरलेला गूळ व साखर घालावी व गॅसवर मंद आचेवर शिजायला ठेवावे. मधून मधून ढवळावे, लाडू होत आले की कडेने मिश्रण सुटू लागते. गॅस बंद करून मिश्रण कोमट असतांना तूपाचा हात लावून लाडू वळावेत. वरील साहित्यात मध्यम आकाराचे १५ लाडू होतात. हे लाडू जास्त टिकत नसल्याने एकावेळी जास्त प्रमाणाचे करू नयेत.

दही मेथीची चटणी

dahimethi chatani साहित्य – मेथ्या १ चमचा, तेल १ चमचा, दही १ वाटी, साखर १ १/२ चमचा, मीठ १ १/२ चमचा.

कृती – मेथ्या तेलावर परतुन घ्या व लाल होऊ द्या. पोळपाट-लाटणे वर किंवा मिक्सर वर बारिक करा. भरडलेल्या मेथीत दही, साखर आणि मीठ मिसळा. आवडत असेल तर कोथिंबीर बारिक चिरून टाका. ही चटणीपराठे, खाकरे, वरण भात, खिचडी, बटाटे वडा, उडीद वडा आणि चकली बरोबर छान लागते.

फायदे

  • दह्यामुळे लेक्टिक एसिड मिळते.
  • मेथ्या पाचक व वातहारक आहेत.
  • मेथी वायूला शांत करणारी कफनाशक व ज्वरनाशक आहे.
  • मेथी कृमी, शूळ, गोळा, संधिवात, कंबरेचे दुखणे, चमक येणे इ. विकारांवर गुणकारी असते .
  • मेथी वातांवर अत्यंत उत्तम समजली जाते.
  • सुश्रुत मेथीला रक्त शुद्ध करणारी समजतात.
  • मेथी रसधातूला बलवान बनवते.
  • मेथी स्त्रियांसाठी अत्यंत उपयुक्त असते.

मेथीच्या सेवनाने स्त्रियांचा अशक्तपणा दूर करून त्या सुदृढ बनतात व त्यांचा जठराग्नी प्रदीप्त होतो. मेथी आमटी-भाजीच्या फोडणीत नेहमी वापरली जाते. वातनाषक औषधी म्हणून मेथी चा उपयोग केला जातो. पाण्याचा निचरा होणारी व काळी जमीन पण. मेथीला अनुकूल असते. मेथीची लागवड भारतात सर्वत्र होते. मेथीच्या भाजीत रक्त शुद्ध करण्याचा गुणधर्म आहे. राजस्थानात मेथी दाण्याचीही भाजी करतात. मेथी मध्ये जे तेल असते त्याचा वात नाडी वर सुयोग्य परिणाम होतो. मेथ्याचे लाडू, बेसन घालून भाजी, लसूण फोडणी घालून केलेली तुरीच्या डाळीचे वरण असे भरपूर पर्यत मेथी सोबत उपलब्ध आहेत. शिवाय आजकाल हॉटेल्स मध्ये सर्रास कसुरी मेथी चा वापर होतो. मेथी ची एक खास चव आहे तो तिचा पानातला कडवट पण पदार्थांना वेगळीच लज्जत आणतो.

– डॉ. संध्या सुखात्मे