ई – पुस्तके

२७ फेब्रुवारी २००० रोजी ‘मराठीवर्ल्ड.कॉम’ला सुरुवात झाली. तेव्हापासून विविध विभाग, नवनवीन माहिती ही आम्ही सातत्याने रसिक वाचकांना देत आलो आहोत. आता ई-पुस्तक या विभागात आम्ही तुमच्यासाठी प्रकाशित तसेच अप्रकाशित मराठी साहित्य ई स्वरुपात देणार आहोत.

सय…

ह्या ई पुस्तकातील १९६१ सालच्या कै. डॉ. भरत सोहोनी ह्यांच्या कविता जुन्या काळातल्या असल्या तरी त्यातले काव्य आजच्या इतकच ताजं आणि टवटवीत आहे. ‘सय…‘ ई-बुक साठी येथे क्लिक करा

सावळ्या रे

हा काव्यसंग्रह राधा, कृष्ण आणि मीरा यांच्यातील नात्यांचा मागोवा आहे. तरल, भावस्पर्शी असे हे दीर्घकाव्य वियोगातील प्रेमाचे तसेच सफळ प्रेमाचे अनेक पदर उलगडत नेते. ‘सावळ्या रे‘ ई-बुक साठी येथे क्लिक करा

मराठीवर्ल्ड ई दिवाळी अंक

मराठीवर्ल्डच्या नवनव्या स्तुत्य उपक्रमांमधे मेरूमणी म्हणून शोभून दिसेल, असा एक अभिनव उपक्रम म्हणजे मराठीवर्ल्डचा ई-दिवाळी अंक!

हितगुज लेकीशी

मुलगी असो किंवा मुलगा ‘तारुण्यात पर्दापण’ हा दोघांच्या आयुष्यात एक महत्वाचा काळ आहे. डॉ. अरुण गद्रे ह्यांना ह्या विषयाची आवश्यकता आणि महत्त्व लक्षात आले आणि त्यांचे ‘हितगुज लेकीशी‘ हे ई-पुस्तक तयार झाले.डॉ. अरूण गद्रे मुलाखत

डॉ. अरुण गद्रे

मुलगी जेव्हा ‘स्त्री ‘ होते
hitgujमुलगी असो किंवा मुलगा ‘तारुण्यात पर्दापण’ हा दोघांच्या आयुष्यात एक महत्वाचा काळ आहे. मुलींच्या आयुष्यात मासिक पाळी सुरु होणं हा खूप महत्वाचा टप्पा असला तरी मासिक पाळी सुरु होणं हा एकच बदल तारुण्यांच चिन्ह आहे असं समजणं चुकीचं आहे. या काळामध्ये जे अनेक बदल होत असतात त्यापैकी तो एक आहे. ह्या सगळया बदलांची शास्त्रीय माहिती मुलीला समजविण्याआधी आईने स्वत: ती द्यायला हवी. निसर्गक्रमाने होणारी ही एक सहज घडणारी गोष्ट आहे असा सकारात्मक दृष्टिकोन आईने मुलीला दिला पाहिजे. आईची भूमिका या वयात, या वेळी फार महत्वाची ठरते. साधारण वीस वर्षापासून नाशिक जवळ लासलगावला डॉक्टरकी करणाऱ्या डॉ. अरुण गद्रे ह्यांना ह्या विषयाची आवश्यकता आणि महत्त्व लक्षात आले आणि त्यांचे ‘हितगुज लेकीशी’ हे पुस्तक तयार झाले.

मासिक पाळी आणि तारुण्यातले बदल हे अत्यंत सोप्या आणि तरीही शास्त्रीय भाषेत लेखकाने मांडले आहे. मराठीवर्ल्ड.कॉम आपल्या करिता ह्या पुस्तकाचे ई-बुक घेऊन आले आहे. ई – बुक हे आजच्या आईला आणि मुलीला कळेल अश्या स्वरुपात मांडतांना लेखकाने आवश्यक तेथे इंग्रजी शास्त्रीय शब्दांचा वापर केला आहे. मासिक पाळी कडे घृणा, किळस, भीता, जाचक बंधन अश्या भावनेतून बघायचं नाही हे लेखकाने आईच्या भूमिकेतून छान मांडले आहे. मातृत्व प्राप्त होण्याकारता निसर्गाकडून स्त्रीला मिळालेलं हे वरदान आहे. तसेच शारिरीक बदल हे ‘स्त्री’ पणाच्या वैशिष्टयांची, सौदंर्याची जाणीव मुलींना हे पुस्तक वाचल्यावर (आईने वाचून) होईल अशी आशा आहे.

ई – बुकच्या निमित्ताने डॉ. अरुण गद्रेंशी ह्या विषयांवर दिलखुलास गप्पा झाल्या डॉक्टर आहे म्हणून गद्रे यांना लेखक होता आले की लेखनाची आवड डॉक्टर झाल्यामुळे पूर्ण झाली हा संभ्रम मनाला पडला. पण लक्षात आले गद्रे हे सृजनशील आणि Observer असल्यामुळे कुशल स्त्रीरोग तज्ञ तसेच दर्जेदार लेखक आहेत.

डॉ. गद्रे तुम्हाला हे ‘हितगुज लेकीशी’ हे पुस्तक का लिहावेसे वाटले?

१९८१ साली मी प्रसुतीशास्त्र ह्या विषयात एम.डी. करीत होतो. माझी चुलत बहिण त्यावेळेला पौगंडावस्थेतून जात होती. तारुण्यावस्थेतले बदल आणि विशेषता ‘मासिक पाळी’ बद्दलची शास्त्रीय अचूक माहिती तिच्या आईला आपल्या मुलीला सांगतांना गोंधळयासारखे आणि संकोचल्यासारखे होत होते. काकूने ही समस्या माझ्यापुढे मांडल्यावर मला देखील अकरा वर्षांच्या मुलीला हे सारे सोप्या भाषेत कसे सांगावे हा प्रश्न पडला. त्या वेळेला मला ह्या विषयाचे गांभीर्य, आवश्यकता आणि आयांची गरज जाणवली आणि मी हे चॅलेंज स्वीकारले.

मी लिहीत गेलो पण निबंधासारखे एकसुरी लिहीणे मनाला अजिबात पटत नव्हते. आई मुलीशी संवाद साधते आहे. अश्या स्वरुपाचे लिखाण करावे असे मनानी निश्चित केले. शिक्षणतज्ञ असणाऱ्या माझ्या वडिलांनी मला प्रोत्साहीत केले आणि लिखाण पूर्ण झाले. मी प्रतिक्रियांसाठी माझ्या आईच्या पारंपारिक विचार सरणीच्या मैत्रिणींना वाचनासाठी दिले. काहीना लिखाण खटकले, अति शास्त्रीय वाटले आणि काहीना अश्लील सुध्दा ! पण अनेक लिखाणांनंतर, बदलानंतर पुस्तक तयार झाले. पुस्तकाच्या ‘कार्बन’ प्रति (त्यावेळेला झेरॉक्सची सोय मुंबई सारख्या शहरात उपलब्ध नव्हती) ओळखीच्या ‘आयांमध्ये’ वाटण्यात आल्या आणि पुस्तकाची गरज भासू लागली.

कुठलाही प्रकाशक अश्या वेगळया विषयांवर पुस्तक छापायला तयार नव्हता शेवटी मीच पुस्तक छापण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेला मला दरमहा ४५०/- रुपये पगार होता मी ५००/- रुपये खर्च करुन पुस्तकाच्या ५०० प्रती छापून घेतल्या.

पुस्तकाला कसा प्रतिसाद मिळाला ?

प्रतिसाद अतिशय थंड आणि नाउमेद करणारा होता एकीकडे आयांना हे पुस्तक आवडत होत तर दुसरीकडे कुठलाही दुकानदार आपल्याकडे विक्रीला ठेवायला तयार नव्हता. केवढा हा विरोधाभास !

शेवटी मी शांळामध्ये फिरायचे ठरवले आणि माझ्या शाळेपासून सुरुवात झाली. प्राचार्यांनी कौतुक केले पण सहावीच्या मुलींच्या आयांना भेटण्याची परवानगी नाही दिली. बाकीच्या शाळांची पण तीच कथा त्याच दरम्यान ‘लोकविज्ञान चळचळ’ ह्या संस्थेशी माझा संर्पक आला. त्या लोकांनी माझी पुस्तक इतर आरोग्यपुस्तकाबरोबर हातगाडीवर, रस्त्यावर विक्रीला ठेवली आणि काय आर्श्चय एका आठवडयात ५०० प्रतिंची धडाकेबाज विक्री तर झालीच आणि २५% नफा सुध्दा ! तर माझे पुस्तक ‘बेस्टसेलर’ ठरले होते. प्रकाशकांच्या बायकांनी पुस्तक अत्यंत उपयुक्त असल्याचे मला पत्राने कळवले पण त्यांचे नवरे (प्रकाशक) छापण्यास तयार नव्हते.

पंधरावर्षानंतर मी प्रस्थापित लेखक झाल्यावर माझ्या कादंबऱ्या प्रकाशित करणाऱ्या संस्थे कडे ‘हितगुज’ चा विषय मांडला काय आश्चर्य, संपादक डॉ. सौ. सुलोचना राम देशमुख (वय वर्षे ७५ फक्त) ह्यांनी ते पुस्तक आनंदाने छापले सुलोचनाबाई ह्या डॉक्टरेट होत्या आणि त्यांच्या प्रबंधाचा विषय होता ‘कुमारी माता’ तसेच त्यांच्या गाईड होत्या ‘इरावती कर्वे’!

माझे पुस्तक मी मी र.धो. कर्वेंना अर्पण केले आहे. माझ्या आयुष्यातला हा सर्वात मोठा योगायोग आहे. पुस्तकाला आयांकडून आणि उच्चशिक्षित (intellectuals) लोकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला हे पुस्तक आजही प्रदर्शनात धडाकेबाज विक्री करते.

डॉ. गद्रे पुस्तकाची उपयुक्तता कशी आहे ?

स्त्रीरोगतज्ञ म्हणून पंचवीस वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत मला दिवसेंदिवस ह्या पुस्तकांची गरज अधिक भासते आहे. आपण फक्त लैंगिक शिक्षणाची गरज ह्याबद्दल बोलतो पण प्रत्यक्ष कृती मात्र फार थोडे पालक करतात. माझ्यामते लैंगिक शिक्षण हे फक्त शास्त्रीय किंवा तांत्रिकपणे सांगून चालणार नाही तर त्याचे आपल्या आयुष्यातले महत्त्व सांगणे महत्त्वाचे ह्या नाजूक विषयावर आईशिवाय कोण अधिक प्रेमळपणे बोलू शकेल? शिक्षक किंवा डॉक्टर माझ्या मते आईची जागा घेऊ शकणार नाहीत.

पुस्तकातला दुसरा भाग अतिशय महत्त्वाचा असून तो लैंगिकता आणि प्रजनन ह्या विषयी माहिती देतो. ह्यात मुल्यशिक्षणाचाही अंर्तभाव आहे. आजची वाढती प्रलोभने आणि माध्यमांचा भडिमार ह्या स्थितीत प्रत्येक आईने ‘लग्नाआधीच्या लैंगिकतेला ठाम नकार द्यायला मुलीला सांगितले पाहिजे. एक डॉक्टर म्हणून माझेही तेच मत आहे. भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण, शारिरीक आकर्षण कुठल्या मर्यादेपर्यंत असावं, त्या पलिकडे ते गेले तर त्यातले संभाव्य धोके कुठले याची जाणीव हे पुस्तक करुन देत. ‘हितगुज लेकीशी’ हे पुस्तक कित्येक आई आणि मुलींना मार्गदर्शक ठरले आहे. ज्येष्ठ लेखिका दुर्गा भागवतांनी त्या काळी ‘काळाजी गरज’ म्हणून पुस्तकाचे कौतुक केले होते. काळ बदलला, नवी काळाची गरज म्हणून ‘हितगुज लेकीशी’ हे पुस्तक ‘ई – बुक’ रुपाने जगभरातल्या प्रत्येक आई मार्फत मुली पर्यंत पोहोचेल ही सदिच्छा.

– भाग्यश्री केंगे