सृष्टीरंग – लेख

मंत्रजप

Mantra Jaap पूर्वी पासून भारतात मंत्र व जप सामर्थ्य मानले गेले आहे. आपले ऋषीमुनी तपश्चर्या करून दिव्य सामर्थ्य मिळवित आणि त्याच्या जोरावर शाप किंवा वर देत. मंत्रोच्चार करून दिलेल्या शापाने दु:ख भोगावे लागे तर वराने सुख प्राप्त होत असे. याचे वर्णन पुराणत व प्राचीन साहित्यात आहे. दुर्वास ऋषी हे अत्यंत शीघ्रकोपी आणि शाप देण्यात प्रसिध्दच होते. भस्मासूर व हिरण्यकशपू यांना देवांकडून वर मिळाले होते, त्यामुळे ते उन्मत झाले होते या आणि अश्या कथा प्रसिध्दच आहेत. अहिल्या, इंद्र, कर्ण, शंकुतला यांना ऋषींकडून मिळालेले शाप सर्वांना माहिती आहेतच या मंत्रोच्चारात किती तथ्य आहे ते पाहू या.

मंत्र कसे निर्माण होतात? काही ध्वनी एका विशिष्ट पध्दतीने एकत्र आणले की त्यातून उत्तेजक अथवा आल्हादकारक स्वरमाला तयार होतात तसेच ध्वनी वेगळया पध्दतीने एकत्र गुंफले तर त्यांच्या उच्चाराने अनिष्टांचा व अशूभांचा नाश करता येईल या भावनेतून मंत्राची निर्मिती झाली. गायत्री मंत्राने सर्व ठीक होईल, सुख मिळेल असे मानले जाऊ लागले.

मंत्राची उपासना अथवा जप करून काहीतरी चमत्कार घडून सुख सहज चालून येते असे आजपर्यंत सिध्द झालेले नाही, मंत्रामध्ये इतके अदभूत सामर्थ्य असते तर शत्रूंचा नाश करण्यासाठी, दु:ख निवारण्यासाठी, सुख प्राप्त करण्यासाठी मंत्राचाच आश्रय घेतला गेला असता. पण मंत्र असा कोणताही चमत्कार घडवू शकत नाहीत. मंत्र हे नुसते शब्द आहेत. शब्द सार्थक ध्वनीप्रतीकांचा समूह असतो. त्यांना अंगभूत स्वत:चे सामर्थ्य नसते. ध्वनीप्रतीके [sound-symbols] हे ऐच्छिक/स्वच्छंद [arbitrary] असतात.

जगात ध्वनी, आवाज खूप व विविध त-हेचे असतात. भांडणे, घासणे, कपडे धुणे, घंटानाद, झ-याचा खळखळ आवाज, गिरणीचा भोंगा, टाईपरायटरचा आवाज इत्यादि. यांचा भाषा निर्माण करण्यास उपयोग नसतो. आपल्या मुखातून ही अं हं रव्वाक् चक् असे अनेक निरर्थक ध्वनी बाहेर पडत असतात. अनेक ध्वनीतून काही ध्वनी निवडून त्यांना आपण ध्वनरप्रतीके बनवतो. मनुष्याला विशिष्ट स्वरयंत्र रचना व श्रेष्ठ मेंदू [Super Brain] लाभला आहे. त्यामुळे त्याला भाषा निर्माण करता आली. [माणूस व माकड यांच्यात खूप साम्य असूनही व मानवाचा पूर्वज असूनही माकडाला विशिष्ट स्वर यंत्ररचना व श्रेष्ठ मेंदू न लाभल्याने त्याला माणसासारखे बोलताही येत नाही] अनेक ध्वनीतून आपण एका ध्वनीला ‘क’ चे ध्वनीप्रतीक बनवतो. इंग्लिशच्या रोमन लिपीत ‘क’साठी c k q ch [cat, king, queen, chemistry] ही ध्वनीप्रतिके आहेत. ही ध्वनीप्रतिके मानवनिर्मित आहेत. निसर्गनिर्मित नाहीत. निसर्गनिर्मित जसे कान, डोळे, नाक आहे तसेच ही ध्वनी प्रतीके असती तर जगाची एकच भाषा झाली असती व भाषेवरून दंगे पेटले नसते. राम या शब्दात अशी र्+आ+म्+अ चार सार्थक ध्वनी प्रतीके आहेत. मानवात जर दैवी अदभुत शक्ती नाही तर मावननिर्मित शब्दात ती कोठून येणार?

दुसरे असे की भाषा हे गौण उत्पादन [सब प्रॉडक्ट] आहे. कसे ते पाहा.

माणूस श्वासोच्छवास करतो. श्वास आत घेतल्यावर हवेतील प्राणवायू शोषला जातो व माणूस जिवंत राहतो. उच्छ्वासावाटे मनुष्य दूषित हवा बाहेर टाकतो श्वासोच्छवास हे माणसाचे प्रमुख कार्य आहे. उच्छवासावाटे बाहेर जी दूषित हवा टाकली जाते ती जिभ, दात, ओठ या स्थानी अडवली जाते व त्यावर जिभेने हलकासा दाब दिला जातो. कंठय, तालव्य, मूर्धन्य, दंन्त्य, ओष्टय (क च ट त प या वर्गांची) ध्वनीनिर्मिती होते. त्यातून भाषा निर्माण होते अशा प्रकारे भाषा ही जर मनुष्याची गौण निर्मिती असेल तर त्यात दिव्य चमत्कार घडविणारे सामर्थ्य येणे शक्यच नाही. ओम हा सुध्दा मानवनिर्मित सार्थक ध्वनीप्रतीक समूह आहे. त्यात दैवी सामर्थ्य नाही हे लक्षात घ्यावे.

– डॉ. सुधाकर कलावडे