सृष्टीरंग

भारतीय उपग्रह : भाग २ – आर्यभट्ट

Indian Satellite Part भारताने १९६३ मध्ये पहिले रॉकेट जरी सोडले गेले असले तरी, पहिला उपग्रह मात्र होता आर्यभट्ट. सुमारे बेचाळीस वर्षांपूर्वी म्हणजे, १९ एप्रिल १९७५ रोजी हा अवकाशात सोडला गेला. आर्यभट्ट् हा भारताने विकसीत केलेला पहिला उपग्रह आहे. पाचव्या शतकातील थोर भारतीय गणितज्ञ व खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव ह्या उपग्रहाला देण्यात आलेले आहे. आर्यभट्टयांचे नाव पहिल्या उपग्रहाला देणे हे निश्चितच उचित आहे. हे महान गणिती होते. पाय याची नेमकी संख्या किती हे त्यांनी शोधून काढले होते. खगोल शास्त्रामध्ये त्यांचे संशोधन अत्यंत मूलभूत संशोधन होते. ग्रहणे, ग्रहांची अंतरे त्यांनी शोधली होती. पृथ्वीचा सायडेरियल (नाक्षत्रिक) काळ त्यांनी अचूकपणे मांडला होता. हया उपग्रहाचे प्रक्षेपण तेव्हाच्या सोविएत संघराज्यातील कापुस्टीन यार ह्या अवकाश केंद्रावरुन कॉसमॉस-३ एम हा उपग्रह वाहक वापरून करण्यात आले. सौर उर्जेवर चालणारा आर्यभट्ट् उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) विकसीत केला होता. सुमारे पाच दिवस पृथ्वी भवती प्रदक्षिणा घातल्यानंतर या उपग्रहाचा इस्रोशी संपर्क तुटला. आणि १७ वर्षांनी ह्या उपग्रहाने ११ फेब्रुवारी १९९२ साली पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला होता. या मोहिमेचा खर्च साधारण ३ करोडपेक्षा जास्त आला होता. त्यावेळी वापरण्यात आलेली अनेक तंत्रे इतकी अचूक आणि प्रगत होती की इस्रो आजही ती तंत्रे वापरते. आपला हा पहिलाच उपग्रह असल्याने आपली उद्दिष्टे स्पष्ट होती. या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे संपूर्णपणे स्वतः डिझाईन करून उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर त्याचे कार्य तपासून पाहणे. अशा प्रकारची मालिका आपण पाठवू शकतो का हे जोखून पाहणे, उपग्रहाशी संपर्क साधून संप्रेषणाकरता जमिनीवर स्थानके बांधणे आणि एक्सरे खगोल विज्ञान, एअरोनोमिक्स आणि सौर भौतिकशास्त्र यांचा अभ्यास करणे. हा उपग्रह षटकोनी आकाराचा होता आणि त्याला २६ बाजू होत्या. १.४ मीटर व्यासाच्या या उपग्रहाच्या सर्व बाजूंना सोलर सेल्स होते. याचे वजन होते ३६० किलो!

पॉवर सप्लायमध्ये समस्या आल्याने इस्रोला प्रयोग थांबवावे लागले होते. या उपग्रहाच्या ट्रॅकिंगच्या उद्देशाने श्रीहरी कोट्टा इथे एक स्थानक देखील उभे करण्यात आले होते. या प्रक्षेपणामुळे एक मौल्यवान अनुभव मात्र मिळाला. याच्या आधारे पुढे अनेक यशस्वी मोहिमा भारताने आखल्या. ११ एप्रिल १९८१ पर्यंत हा उपग्रह त्याच्या कक्षेत फिरत होता.

या आपल्या पहिल्या उपग्रहाच्या सन्मानार्थ पोस्टाची तिकिटे, नोटा यावर या उपग्रहाचे चित्र होते. आर्यभट्ट उपग्रहाच्या अनुभवावर आधारित भारताने नंतर भास्कर नावाचे दोन उपग्रह प्रक्षेपित केले. भास्कर १ हे मिशन प्रायोगिक रिमोट सेन्सिंग मिशन होते. हा उपग्रह ७ जून १९७९ साली प्रक्षेपित केला गेला. तसेच हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह होता. या मिशनचा कालावधी १० वर्षांचा होता. या उपग्रहाला दोन दूरदर्शन कॅमेरे होते. त्यांनी हायड्रोलोजी, वनीकरण आणि भूगोल संबंधित माहिती गोळा करून पाठविली होती. २० नोव्हेंबर १९८० मध्ये भास्कर २ उपग्रह प्रक्षेपित केला गेला. याचाही कालावधी दहा वर्षांचा होता. यातील एक कॅमेरा खराब झाल्याने हा पूर्ण काम करू शकला नाही परंतु दोन हजारापेक्षा अधिक छायाचित्रे या यानाने पाठविली.

या सगळ्या मिशन्सने भारतीय अंतराळ संशोधनामध्ये नवीन नांदी केली.

– सुजाता बाबर