तारांगण – (ग्रहगोलांविषयी माहिती देणारे सदर)

मुहूर्त

Muhurt भारतात मुहूर्ताला अतिशय महत्त्व दिले जाते. मुहूर्ताशिवाय कुठलेही शुभ काम केले जात नाही. विवाह गोरज किंवा गोपाळ मुहूर्तावर होतात. मुहूर्त म्हणजे एका विशिष्टय वेळी कोणत्याही शुभकार्याचा आरंभ करण्याची वेळ. या मुहूर्तावर कार्यारंभ केला तर कार्य यशस्वी होते. लाभदायक ठरते अशी आपली कल्पना असते. असा आपला भ्रम किंवा गैरसमजूत असते की काही ‘वेळा’ या शुभ असतात तर काही अशुभ असतात. प्रत्यक्षात कोणतीही वेळ शुभ किंवा अशुभ नसते. ती आपली कल्पना मात्र असते. राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी म्हटले होते की त्यांना राष्ट्रपती शपथविधीची कुठलीही वेळ ही शुभच आहे.

आपल्याला माहितच आहे पृथ्वी स्वत:भोवती फिरत सूर्याला प्रदक्षिणा घालते. तिचा प्रदक्षिणेचा जो कालावधी असतो त्याला आपण वर्ष म्हणतो आणि स्वत: भोवती फिरते त्याला आपण दिवस म्हणतो. आपण दिवस हा तास, मिनिटे व सेंकद यात विभागतो. प्राचीनकाळी भारतात हाच कालावधी प्रहर, घटिका, पळे यात विभागला जात असे. रोजचा हा काळ जीवन सुलभ बनवण्याचा हा एक मार्ग आहे. हे सर्व आपण मानतो. आपले काल विभाजन-वर्ष, दिवस, तास, मिनिटे, सेंकद हे निसर्ग निर्मित नाही. पृथ्वीचे स्वत:भोवती फिरणे व सूर्याभोवती फिरणे व सूर्याभोवती फिरत प्रदक्षिणा घालणे हे जर शुभ किंवा अशुभ नाही तर त्यावरून कल्पना केलेले काल (वेळ) विभाजन शुभ अथवा अशुभ असणे शक्यच नाही हे ध्यानात घ्यावे.

दिशा

Disha मुहूर्त निसर्गनिर्मित नाहीत तशा दिशाही निसर्गनिर्मित नाहीत. काही दिशांना आपण शुभ मानतो तर काही दिशांना अशुभ मानतो व त्यातून निर्माण होणा-या अनिष्ट निवारणासाठी वास्तुशास्त्राची मदत घेतो व हजारो रूपये त्यासाठी मोजतो. आपण दिशांची कल्पना केलेली आहे. दहा दिशा पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, वर, खाली आपण मानतो. पुराणात तर आठ दिशांना आधार देणारे खांब अथवा रक्षण करणारे हत्ती आहेत अशी ही कल्पना आहे. दिशा या शुभ वा अशुभ नसतात. आपण दक्षिण दिशा अशुभ मानतो कारण ती यमाची आहे. सूर्य उगवतो आपण त्याला पूर्व दिशा म्हणतो व सूर्य मावळतो त्याला पश्चिम दिशा म्हणतो. पूर्वेच्या डाव्याबाजूला उत्तर तर उजव्या बाजूला दक्षिण दिशा आपण मानतो. प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना प्रवासात एकदा अदभूत अनुभव आला ते म्हणतात, ”I saw sunrise in the West. It (solar disc) slowly rose, where it had just sink over the western horizion [Time of India 7/12/2004] अर्थात् सूर्यगोळा नुकताच पश्चिम क्षितिजावर जिथं बुडाला होता तिथूनच तो वरती येतांना उगवतांना दिसला. इथे सूर्यास्त व सूर्योदय एकाच ठिकाणी झाला होता. पश्चिम व पूर्व या दिशा एकाच ठिकाणी क्षितीजावर दिसल्या. दिशा या निरपेक्ष नसून सापेक्ष आहेत. भारतीय काव्यात ‘भारत मातेचा मुकूटमणी हिमालय आहे व दक्षिणसागर तिचे पाय धुतो’ असे वर्णन आहे. हिमालय उत्तरेला व दक्षिणेला मध्यसागर आहे हे रूपक आहे. पण मग आपला हिमालय मुकूटमणी चीनच्या पायाशी लोळण घेतो. कारण चीन उत्तरेला व चीनच्या दक्षिणेला भारताचा हिमालय आहे. सारांश दिशा कल्पित मात्र आहेत त्यात शुभ किंवा अशुभता यांचा अंश मात्र ही नाही.

– दिगंबर गाडगीळ