सृष्टीरंग – लेख

फुलपंखी दुनिया

Butterfly पर्यावरणाचा अभ्यास करताना त्यात जैवविविधता, निसर्गातील विविध प्रजातींचे संतुलन यांचा समावेश होतो. पण जैवविविधतेत आणि परागीभवनात महत्त्वाचा वाटा उचलणा-या कीटकांकडे मात्र अभ्यासकांचे फारसे लक्ष गेलेले नाही. कीटकवर्गापैकीच एक असणा-या फुलपाखरांकडेही त्यांच्या सुंदर दिसण्यापलीकडे लक्ष दिलं जात नाही. भारतात ज्या प्रमाणात प्राणी-पक्षी तज्ज्ञ आढळून येतात, त्या प्रमाणात फुलपाखरं तज्ज्ञ आढळून येत नाहीत. पण गेल्या दहा वर्षात हे चित्र हळूहळू पालटू लागलं आहे. या ‘फुलपंखी’ दुनियेची आपल्याला माहिती करून देणारे युवराज गुर्जर हे फुलपाखरांचा अभ्यास करणा-या मोजक्या व्यक्तींपैकी एक. फुलपाखरांचा जीवनक्रम, त्यांचे स्थलांतर आणि एकूणच त्यांच्या विषयीची रंजक माहिती युवराज गुर्जर यांनी दिली आहे –

फुलपाखरू वर्गातही सामान्यतः दोन प्रकार आढळून येतात, फुलपाखरे आणि पतंग. या दोन्हीतही खूप फरक आढळून येतात. जसे फुलपाखरे दिवसा उडतात, तर पतंग रात्री. झाडांवर बसताना पतंग पंख उघडून बसतात तर फुलपाखरं मिटून बसतात. पतंगाच्या मिश्या कंगव्यासारख्या तर फुलपाखरांच्या मिश्या सरळ आणि टोकाकडे गोलसर असतात. भारतातील फुलपाखरं आणि पतंगं लेपिडोपेट्रा वर्गात येतात. खवल्या खवल्यांनी त्यांच्या पंखांमधील रंग बनलेले असतात. लेपिडो म्हणजे खवले.

प्रत्येक फुलपाखराचं विशिष्ट अन्नझाड ठरलेलं असतं. ती एकाच वर्गातील अन्नझाडे सोडून इतर वर्गातील अन्नझाडांवर अंडी घालत नाहीत. लिंबाच्या झाडावर अंडी घालणारे फुलपाखरू जांभळाच्या झाडावर अंडी घालणार नाही, पण संत्र्याच्या झाडावर घालू शकते. फुलपाखरांची मादी त्या त्या वर्गातील अन्नझाडावर अंडी घालते.

Butterfly फुलपाखरांविषयी फार मोठा गैरसमज आपल्या इथे प्रचलित आहे, तो म्हणजे फुलपाखरं फक्त मध खातात. पण हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. प्राणी-पक्षी यांची विष्ठा, जीवनक्षार, मलमूत्र हेही फुलपाखरांचं खाद्य आहे.

फुलपाखरांचं आयुष्य मुळात खूप कमी असते. काही फुलपाखरांचे आयुष्य ३-४ दिवस तर काही फुलपाखरांचे आयुष्य १ वर्ष इतके असते. त्यांचा अभ्यास करताना सातत्य, dedication महत्त्वाचे असते. इतके कमी आयुष्य लाभल्यामुळे त्यांचा पूर्ण जीवनक्रम अभ्यासून काही निष्कर्ष काढणे अतिशय कठीण असते.

भारतात १५००च्या आसपास फुलपाखरांचे विविध प्रकार आढळून येतात. विशेषतः दक्षिण आणि उत्तर-पूर्व या भागांमध्ये आपल्याला फुलपाखरांचे नानाविध प्रकार सापडतात. मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या भागातही साधारणपणे १५०-२०० प्रकारची फुलपाखरे आढळतात. ठाण्यात येऊरचे जंगल, रायगड जिल्ह्यातील फणसाडचे अभयारण्य इथेही फुलपाखरांचे बरेच प्रकार आढळून येतात.

Butterfly फुलपाखरांचा वंश वाढावा यासाठी निसर्गाने एक खास गुण त्यांना बहाल केला आहे. फुलपाखरांतील काही प्रजाती विषारी असतात. रुईच्या झाडावर वाढणारे प्लेन टायगर जातीचे फुलपाखरू विषारी असते. फुलपाखरांमधील विषारी घटक त्यांना त्यांच्या अन्नझाडांपासून मिळतात. ही फुलपाखरे फक्त त्यांच्या भक्ष्यकांकरता विषारी असतात. याच फुलपाखरासारखे हुबेहुब दिसणारी डेनिड एग फ्लाय जातीची मादी असते. प्लेन टायगर जातीचे फुलपाखरू समजून हीचे भक्ष्य होण्यापासून बचाव होतो. ह्या मिमिक्रीच्या वैशिष्टयामुळे एखाद्या फुलपाखराचा वंश वाढण्यास हातभारच लागतो.

पण फुलपाखरांतील कैसर-ए-हिंद, भुतान ग्लोरी, व्हाईट ड्रॅगन फ्लाय असे काही प्रकार नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी स्मगलिंग आणि habitat destruction बहुतांशी कारणीभूत आहेत. फुलपाखराच्या एका प्रजातीचे ५ हजारापर्यंत पैसे मिळतात. अशा प्रकारचे स्मगलिंगचे काही प्रकार भारतात उघडकीस आले आहेत. अन्नझाडांची कमतरता किंवा झपाटयाने त्यांची संख्या कमी होणे यामुळे काही प्रजाती धोक्यात येऊ शकतात.

प्राणी-पक्षी याप्रमाणे फुलपाखरं स्थलांतरही करतात. अगदी ३००० किलोमीटर पर्यंत फुलपाखरं स्थलांतर करतात. पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करता येतो. कुठून कुठे जातात? किती अंतर किती दिवसांत पार करतात? प्रवासादरम्यानचे त्यांचे टप्पे? पक्ष्यांमध्ये झालेले बदल? असे कितीतरी मुद्दे पक्ष्यांचे स्थलांतर या विषयावर विचारात घेतले जातात. फुलपाखरांविषयी असा अभ्यास करताना त्यांच्या थव्यांचा पाठलाग करणे शक्य नसते, निदान अजूनतरी भारतात ही पध्दत अवलंबली जात नाही. काही फुलपाखरं ताशी ४५ किलोमीटर वेगानेही उडू शकतात. या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी आता काही नवीन पध्दती शोधून काढण्यात येत आहेत, त्यामुळे कदाचित येत्या काही वर्षात फुलपाखरांचे स्थलांतरण या विषयाची सखोल माहिती आणि संकलन आपल्या इथेही होऊ शकते. पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतुंमध्ये मोठया संख्येने फुलपाखरं दिसण्याचा संभव असतो. त्यामुळे फुलपाखरं अभ्यासकांच्या दृष्टीने हे दोन्ही ऋतू महत्त्वाचे असतात.

Butterfly या विषयाचा अभ्यास करणारे भारतभर आणि भारताबाहेरही ठिकठिकाणी विखुरलेले आहेत. पण त्यांनी एकत्र येऊन या विषयात काही संघटीत प्रयत्न अजूनतरी झालेले नाही. कीटकांविषयीची समग्र माहिती देणारे एकही पुस्तक मराठीत उपलब्ध नाही. त्यामुळे अभ्यासकांनाही पाश्चात्य पुस्तकांवर आणि संस्थांवर अवलंबून राहावे लागते. पण हे चित्र हळूहळू बदलू लागले आहे. फुलपाखरांचा अभ्यास करू इच्छिणा-यांसाठी, या विषयात रूची असणा-यांसाठी, पर्यावरणाचा अभ्यास करणा-यांसाठी, तज्ज्ञांसाठी अगदी १० वर्षापूर्वीपर्यंत पुस्तकं उपलब्ध नव्हती. पण आता कृष्णमेघ कुंटे, आयझॅक किहीमकर, मीना हरिबल यांसारख्या तज्ज्ञांमुळे आणि त्यांनी परिश्रम घेऊन लिहिलेल्या पुस्तकांमुळे फुलपाखरांचा अभ्यास करणे तितकेसे कठीण राहीलेले नाही. या विषयासंदर्भातले पुढचे पाऊल म्हणजे ‘बटरफ्लाय-इंडिया’ हा याहू ग्रुप. ४ ऑक्टोबर, २००१ रोजी भारतातील फुलपाखरं वेडयांनी एकत्र येऊन ‘बटरफ्लाय इंडिया’ हा याहू ई-ग्रुप सुरू केला.
आपापसातील माहिती, चित्रं, फोटो यांची देवाण-घेवाण करण्याचा प्राथमिक उद्देशाने ग्रुप मेंबर्स एकत्र आले आहेत. सुरुवातीच्या काळात या ग्रुपचे भारत आणि भारताबाहेरचे मिळून ३५३ मेंबर्स झाले आहेत. ह्यावर्षी केरळच्या अरालम जंगलात १६ ते १८ सप्टेंबरला या फुलपाखरं वेडयांची ‘बटरफ्लाय मीट’ आयोजित करण्यात आली होती. ज्यांना फुलपाखरांच्या जगाविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल त्यांनी या ग्रुपचा मेंबर होऊन आपली इच्छा पूर्ण करावी. त्यासाठी ButterflyIndia- subscribe@yahoogroups.com किंवा yuwarajg@yahoo.com येथे मेल करा.

– युवराज गुर्जर