यशस्वी मंगलयान आणि पहिला खगोलीय उपग्रह अॅस्ट्रोसॅट यामुळे भारत देशाचे नाव अवकाश विज्ञानामध्ये झळकत आहे. या निमित्ताने भारताने पाठविलेले कृत्रिम उपग्रह किंवा सॅटेलाइटस यावर आपण बोलणार आहोत. भारतामधील बुद्धिमत्ता तसेच अवकाश आणि तंत्रज्ञान यातील विकासाचा अवाका याची कल्पना असलेले डॉ. विक्रम साराभाई आणि डॉ. होमी भाभा यांनी अतिशय द्रष्ट्या नजरेने भारतीय अवकाश कार्यक्रम आखले होते.
१९६३ मध्ये थुंबा येथे थुंबा इक्वेटोरीयल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन स्थापन केले आणि २१ नोव्हेंबर १९६३ रोजी पहिले रॉकेट अवकशात सोडले गेले. या रॉकेटने सर्वात बाहेरच्या स्तरातील वातावरणाचा आणि आयनोस्फियरचा अभ्यास केला. यामुळे आपल्या देशातील हवामानाचा अंदाज घेणे आणि रेडीओ कम्युनिकेशन यासाठी फायदा झाला.
भारतीय अवकाश कार्यक्रमासाठी एका संस्थेची स्थापना झाली ती म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो. इस्रो किंवा भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही अंतराळ संशोधन करणाऱ्या जगातील अग्रगण्य संशोधन संस्थांपैकी एक, अशी मूलभूत संस्था आहे. अवकाश तंत्रज्ञानाचा विकास करणे व त्याचा उपयोग विविध राष्ट्रीय कार्यात करणे हा इस्रोचा मूळ उद्देश. भारतीय अंतराळ विकास कार्यक्रम डॉ. विक्रम साराभाई करत होते. म्हणून त्यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक समजले जाते. इस्रोचे मुख्य कार्यालय बंगलोर इथे आहे. इस्रोची स्थापना १९६९ मध्ये झाली. इस्रोने आपला पहिला उपग्रह तयार केला तो म्हणजे आर्यभट्ट. रशियाच्या मदतीने १९ एप्रिल १९७५ रोजी तो अवकाशामध्ये सोडला गेला. यानंतर महत्वाचा उपग्रह होता रोहिणी.
१९८० मध्ये हा उपग्रह सोडला गेला आणि यासाठी पहिले भारतीय उपग्रह प्रक्षेपण यान वापरले गेले. त्याचे नाव होते, एस एल व्ही ३. लॉन्चिंग व्हेइकलच्या सहाय्याने उपग्रह अवकाशामध्ये नेले जातात आणि सोडले जातात. इस्रोने दोन उपग्रह प्रक्षेपण यानं तयार केलेली आहेत. एक म्हणजे पोलर सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल किंवा PSLV म्हणजेच धृवीय उपग्रह प्रक्षेपण यान. हे यान म्हणजे इस्रोच्या कामगिरीतला हा मानाचा तुरा आहे. केवळ भारतीयच नव्हे तर इतरही देशांचे उपग्रह अवकाशात पाठवून परकीय चलन मिळवण्यात आणि अवकाश स्पर्धेत भारताला आघाडीत आणण्यात याचा महत्त्वाचा वाटा आहे. या प्रक्षेपकाची उंची ४४ मीटर तर, वजन २३० टन आहे. २००८ मध्ये “इस्रो’ने याचा वापर करून एकाच वेळेस दहा उपग्रह प्रक्षेपित करून विश्व विक्रमाची नोंद केली होती. हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे आहे हे विशेष. पी.एस.एल.व्ही. भूस्थिर कक्षेत किंवा Geostationary Transfer Orbit (GTO) उपग्रह देखील वाहून नेऊ शकते.
आतापर्यंत १९ भारतीय तर २२ विदेशी असे ४१ उपग्रह इस्रोने अवकाशात यशस्वीरीत्या पाठवले आहेत. पी.एस.एल.व्ही. च्या एका उड्डाणाचा खर्च साधारण १.७ कोटी अमेरिकन डॉलर इतका असतो. दुसरे यान आहे जिओस्टेशनरी सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल किंवा भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान (GSLV). भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान (GSLV) ही भारताने विकसित केलेली, त्याच्या इन्सॅट उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी विकसित केलेली व त्यास भूस्थिर करण्याची एक प्रणाली आहे. त्याद्वारे विदेशी रॉकेटवर भारताला विसंबून राहण्याची गरज नाही. सध्या ते इस्रोचे सर्वात मोठे उपग्रह प्रक्षेपण यान आहे. त्याद्वारे सुमारे ५ टनाचा उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत स्थापित करण्याची त्याची क्षमता आहे.
– सुजाता बाबर