सृष्टीरंग – लेख

आपला आयुर्वेद

Ayurved भारताचे प्राचीन वैद्यकीय शास्त्र आयुर्वेद आणि योग आज परदेशात आयुर्वेदा आणि योगा ह्या ग्लॅमरस नावाने लोकप्रिय आहे. आयु म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे शास्त्र. जीवन किंवा शरीराचे शास्त्र जाणणारा आयुर्वेद अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. परदेशात विशेषता अमेरिकेत आयुर्वेदाचा उपयोग complementary and alternative medicine म्हणून केला जातो. आयुर्वेदाचा उगम शोधणे कठीण आहे परंतु असे म्हटले जाते की ६००० वर्षांपूर्वी ऋग्वेदात आयुर्वेदाचा उल्लेख आढळतो. आयुर्वेदाचे जनक म्हणून भगवान धन्वंतरींना मानले जाते. पौराणिक कथांनुसार हे ज्ञान त्यांना खुद्द ब्रम्हदेवाकडून मिळाले. आयुर्वेदानुसार आपले शरीर पृथ्वी, (भूमी), (आप) जल, वायू, तेज (अग्नी) आणि आकाश (ब्रम्हांड) ह्या पंचमहाभूतांनी व्यापले आहे. त्यानुसार वात, पित्त आणि कफ अश्या शरीराच्या तीन प्रकृती आहेत. त्याचप्रमाणे रस, रक्त, मास, मेद, अस्थी, मज्जा, शूक्र असे सप्त धातू आहे. ह्या सप्तधातूंवर वरील तीन प्रकृतीचा प्रभाव असतो. ह्या प्रकृती आणि सप्तधातूंनी तन, मन आणि आत्म्याचे संतुलन साधण्यासाठी आयुर्वेद अत्यंत उपयुक्त आहे. फक्त आजारी पडल्यावरच आयुर्वेदाचा उपयोग न करता एकूणच शारिरीक व मानसिक आरोग्याचे संतूलन राखण्यासाठी आयुर्वेदानुसार आपली दिनचर्या आणि ऋतूचर्या पाळण्यात यावी असे आयुर्वेद सांगतो.

आयुर्वेदाच्या उपचार पध्दतीनुसार मुख्य आठ विभाग विकसित केले गेले – कायाचिकीत्सा (External & Internal medicine), शल्यचिकीत्सा (Surgery), शालाक्यतंत्र (ENT, Opthalmology), अगदतंत्र (Toxicology), कुमारभ्रित्य (Pediatrics), वाजिकरणम (Aphrodisiacs ), भूतविद्या (Psychiatry) आणि रसायना (The science of Rejuvenation). ह्या प्रत्येक विषयासंबंधीची माहिती चरक संहितेत आणि सुश्रूत संहितेत लिहीलेली आहे. ह्या विषयी अधिक माहितीसाठी http://en.wikipedia.org/wiki/Ayurveda

१५०० इ.स.पूर्वी आयुर्वेदाचे दोन मुख्य विभाग झाले अत्रेय आणि धन्वंतरी. अत्रेय पध्दतीचा अवलंब करणारे औषधांद्वारा रुग्णांना बरे करत असत आणि धन्वंतरी वैद्य रुग्णांवर शस्त्रक्रीया करत असत. १००० इ.स.पूर्वी चरक ऋषींनी चरक संहिता लिहीली. अत्रेयांनी लिहीलेल्या संदर्भाच्या आधारे त्यांनी अनेक व्याधींसाठी औषधे लिहीली जी आजच्या काळातही वापरली जात आहेत. धन्वंतरी विभागाच्या सुश्रुत ॠषींनी सुश्रुत संहिता लिहीली. ह्या मध्ये कॉस्मेटीक सर्जरी, सिझेरियन शस्त्रक्रीया, हात, पाय, मेंदू, नाक, कान, डोळ्याची चिकित्सा कशी करायची हे लिहून ठेवले आहे. ५०० इ.स.नंतर वागभटांनी अष्टांग हृदय संहिता लिहीली ज्या मध्ये अत्रेय आणि धन्वंतरी ह्या दोन्ही विभागांचा समावेश आहे.

चरक संहिता मूळ संस्कृत भाषेत असून त्यात ८,४०० श्र्लोक आहेत. पूर्वीच्या काळी एकमेकांना मुखोदगत ज्ञान दिले जायचे. त्यामुळे संहिता अश्या प्रकारे लिहीली गेली आहे. चरकांनी अत्रेय पध्दतीनुसार तन, मन आणि आत्म्यासाठी कायाचिकीत्सानुसार आंतर व बाह्य उपचार पध्दती लिहीली. त्यामुळे उपचाराआधी निदान करण्यावर त्यांनी भर दिला. इतका की एखाद्या रोगाचे निदान करण्यासाठी काळ, वेळ, प्रादेशिक रचना, बाळाचा जन्म इत्यादी विचारात घेण्यासाठी सुचवल्या. एखाद्या रोगाची सुरुवाती पासून ते वक्त होण्याचे चरकांनी आठ पाय-यांमध्ये (क्रमां) मध्ये वर्णन केला आहे. चरकांनी वनौषधी गोळा करतांनाची वेळ आणि पध्दतही विचारात घेण्यासाठी सुचवले आहे.

सुश्रूत ऋषीनी आयुर्वेदाच्या सहाय्याने शस्त्रक्रीया करण्याच्या पध्दती सुश्रूत संहितेत गद्य आणि पद्यात लिहीलेल्या आहेत. ह्यात मुख्य पद्य अधिक आहेत कारण पूर्वीच्या काळी पाठांतराने ह्या पध्दती एकमेकांना शिकविल्या जात. असे म्हटले जाते त्या काळी होत असलेल्या युध्दांमुळे आयुर्वेदाचा हा विभाग अधिक विकसीत झाला. सुश्रुतांना सर्जरीचा पिता संबोधले जाते. सुश्रूत संहितेत कॉस्मेटीक सर्जरी, सिझेरियन शस्त्रक्रीया, हात, पाय, मेंदू, नाक, कान, डोळ्याची चिकित्सा कशी करायची हे लिहून ठेवले आहे. आजही दुभंगलेल्या ओठाची शस्त्र्क्रीया त्यांच्या पध्दतीनुसार केली जाते. सुश्रुतांना प्लॅस्टिक सर्जरीचा जनक संबोधले जाते. सुश्रुतांनी वेगवेगळ्या शस्त्रक्रीयेसाठी १२५ विविध उपकरणे वापरायला सांगितली आहेत. ही उपकरणे दगड, लाकूड, धातू अश्या नैसर्गिक वस्तूंपासून बनवलेली असत. असे म्हणतात, आजच्या मॉडर्न सायन्सला ह्यातील काही गोष्टींची उकल अजून व्हायची आहे. मानवी डोळ्याची रचना आणि कार्य मांडणारे सुश्रूत वैद्यकीय शाखेचे जगातील पहिले वैद्य होते. त्यांनी डोळ्याच्या ७२ आजारांविषयी लिहून ठेवलेले आहे. त्याकाळी त्यांनी शरीराच्या विविध भागांच्या शस्त्रक्रीया केल्या आहेत.

संशोधनांती असे सिध्द झाले आहे की आयुर्वेदामुळे जगभरातल्या अनेक वैद्यकीय पध्दती जन्माला आल्या. त्या काळापासून सुश्रूत संहिता, चरक संहिता आणि अष्टांग हृदय संहिता ह्या महान ग्रंथांच्या आधारे आयुर्वेदाचार्य औषधे तयार करत असत तसेच शस्त्रक्रीया करत असत. ४ थ्या शतकाच्या पूर्वार्थ समुद्री व्यापारादरम्यान इजिप्तियन लोकांनी भारतीयांकडून आयुर्वेद शिकून घेतला होता. प्रसिध्द युनानी उपचार पध्दती ह्यातूनच उदयास आली. ८०० इ. स. नंतर आयुर्वेद इस्लामीक भाषेत रुपांतर करण्यात आला. पूर्वेकडे आयुर्वेदाचा प्रसार बौध्द लोकांनी केला. त्यामुळे तिबेटीयन आणि चीन औषधी व वनस्पतींवर आयुर्वेदाचा प्रभाव दिसून येतो. इंग्रजांमुळे आयुर्वेदाचा प्रभाव कमी होऊन ऍलोपॅथीला अधिक महत्त्व आले. पण आता परत भारतीयांना आयुर्वेदाचे महत्त्व लक्षात आल्यामुळे आयुर्वेदाला पुनरज्जीवन मिळाले आहे.

परदेशी लोकांना आयुर्वेदाचे आकर्षण आणि कौतूक आहे. भारतात आयुर्वेदाला पुनरज्जीवन मिळाल्यामुळे अनेक परदेशस्थ मेडीकल टुरिझम किंवा (आयुर्वेद आणि योग) शिकण्यासाठी भारतात दाखल होतात. आयुर्वेदाचे प्रथम परदेशी अभ्यासक आहेत रॉबर्ट स्वोबोदा. १९७२ साली रॉबर्ट अफ्रिकेत गेले असतांना अतिसाराने बेजार झाले होते. त्यावेळी त्यांना अफ्रिकन खेडूताने दिलेल्या वनौषधींनी बरे वाटले. त्यावेळेला परंपरागत उपचार पध्दती विषयी त्यांचे कुतूहल जागे झाले. त्यासाठी भारताइतके योग्य ठिकाण कुठलेच नव्हते. त्यांनी लगेचच ओकलाहोमा विद्यापीठातले वैद्यकीय शिक्षण बाजूला सारुन पुण्याच्या टिळक आयुर्वेदीक महाविद्यालयात प्रवेश घेतला. तन, मन आणि आत्म्याचे संतुलन करणा-या आयुर्वेदाचा त्यांनी अभ्यास केलाच त्याच बरोबर ज्योतिषशास्त्र आणि योगाचाही अभ्यास केला. ‘लाईट ऑन लाईफ’ हे रॉबर्टचे ज्योतिषशास्त्रावरचे पुस्तक आजही उत्कृष्ट मानले जाते. त्यांनी अघोरी तंत्रविद्याही भारतातून शिकून घेतली. त्यांना भारतात वैद्यकीसाठी अधिकृत परवाना मिळाला आहे. दुर्दैवाने हा परवाना अमेरिकेत ग्राह्य नसल्यामुळे त्यांना तेथे रुगणांसाठी आयुर्वेदा सेवा देता येत नाही. पण तरी सुध्दा आयुर्वेद, योगा आणि ज्योतिषशास्त्राच्या प्रसारासाठी त्यांनी अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अशिया खंडातून अनेक दौरे केले आहेत. त्याचबरोबर ह्या विषयावर उपयुक्त अशी अनेक पुस्तके लिहीली आहेत.

आयुर्वेदाचा अवलंब संपूर्ण भारतात होत असला तरी केरळ राज्याने आयुर्वेदाला परदेशी पर्यटकांपर्यंत सर्वाधिक पोहोचवले आहे. इतकेच नव्हे तर भारतात राहणारा माणूसही ‘केरला आयुर्वेदीक्स’ ने भारावून जातांना दिसतो. मूळ संस्कृत मध्ये लिहीलेला आयुर्वेद विद्यार्थ्यांना आपआपल्या मातृभाषेत शिकविला जातो. अगदी उत्तरेत आणि महाराष्ट्रातही सारखेच ज्ञान असले तरीही ‘केरळ आणि आयुर्वेद’ हे समीकरण पक्के झाले आहे. ह्याचे कारण म्हणजे तिथल्या लोकांनी जपलेली परंपरा, पूर्वापार चालत आलेले ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायची तळमळ आणि आयुर्वेदाचे उत्तम ‘ब्रॅंडींग’ हे होय. काही घरांमध्ये तर आयुर्वेदीक वैद्यांची परंपरा आहेत. केरळ मधे कोटकल्ल येथे असलेली वैद्य वारियर ह्यांच्या आर्य वैद्यशाळेने शंभरी पूर्ण केली आहे. त्यांच्या आज भारतात १६ शाखा आहेत. केरळ मधल्या आयुर्वेदाची माहिती घ्यायची असल्यास www.keralaayurvedics.com/category/ayurveda-history/kerala-traditional-vaidyas ही साईट अत्यंत उपयुक्त आहे. महाराष्ट्रातही वैद्यांची उज्जवल परंपरा आहे. अनेकांनी आयुर्वेदाच्या प्रसारासाठी कार्य केले त्यात आजच्या काळात श्री.बालाजी तांबेंचा उल्लेख करावा लागेल. तांबे आणि त्यांच्या उपचार पध्दती विषयी www.balajitambe.com ह्या साईटवर माहिती उपलब्ध आहे.

आयुर्वेदाचा इंटरनेटवर सर्च केल्यास अनेक साईट्स सापडतात. काही साईटसवर माहितीही उत्कृष्ट आहे. काही साईट्स मोफत सल्ला किंवा आयुर्वेदीक औषधांची विक्रीही ऑनलाईन करतात. परंतु कुठलीही उपचार पध्दती स्वतः करण्याआधी त्याविषयी खात्री करुन घेणे किंवा तज्ञांचा सल्ला घेणे अधिक श्रेयस्कर आहे.

– भाग्यश्री केंगे