भारताने पाठविलेल्या अवकाश मोहिमांमधील एक महत्वाची मालिका म्हणजे इन्सॅट. इंडियन नॅशनल सॅटेलाईट सिस्टीम म्हणजेच इन्सॅट किंवा भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली ही दूरसंचार, प्रसारण, हवामानशास्त्र, शोध व बचाव कार्यात मदत करण्यासाठी इस्रोने सुरू केलेली बहुउद्देशीय भूस्थिर उपग्रह मालिका आहे. १९८३ मध्ये कार्यान्वित झालेली इन्सॅट मालिका ही आशिया-पॅसिफिक विभागातील देशातील सर्वात मोठी दळणवळण प्रणाली आहे. ही मालिका अवकाश, दूरसंचार विभाग, भारतीय हवामान विभाग, अखिल भारतीय रेडिओ आणि दूरदर्शन विभाग यांच्या संयुक्त उपक्रम आहे.
इन्सॅट उपग्रह भारतातील दूरदर्शन व संप्रेषण गरजा भागवण्यासाठी विविध बँड मध्ये ट्रान्सपॉन्डर सेवा देतात. ट्रान्सपॉन्डर म्हणजे असे साधन जे रेडिओ सिग्नल प्राप्त करते आणि त्यांचे विविध सिग्नल्समध्ये प्रसारण करते. यामध्ये हवामान विषयक प्रतिमा तर मिळतातच शिवाय भारताचे सागरी किनाऱ्यावरच्या संरक्षणासाठी उपयुक्त असे सिग्नल्स मिळतात आणि बचाव मोहिमांसाठी मार्गदर्शन मिळते.
इन्सॅट उपग्रह मालिकेमध्ये एकूण २४ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. ययापैकी १० अजूनही कार्यरत आहेत. याच्या अनेक सिरीज आहेत जसे इन्सॅट १ A,B,C,D, इन्सॅट २ A,B,C,D, इन्सॅट ३ A,B,C,D. आपल्याला घराघरामध्ये दिसणारा टीव्ही हा या उपग्रह मालिकेमुळे दिसतो. यात प्रामुख्याने दूरसंचार, टीव्ही प्रसारण, हवामानशास्त्र आणि आपत्ती इशारा ही कार्ये होत असतात. एकाच व्यासपीठावर अशा चारही वैविध्यपूर्ण सेवा देणारी ही अनोखी मालिका आहे.
इन्सॅट उपग्रह मालिकेने एकूण ४५० अर्थ सॅटेलाइटस एकमेकांना जोडले आहेत. प्रत्येक आठवड्याला १०० शैक्षणिक कार्यक्रम यातून प्रसारित होत असतात. ग्रामपंचायती, विविध कॉर्पोरेटस, शैक्षणिक संस्था यांनी या सेवेचा पूर्णपणे लाभ घेतला आहे. या मालिकेचा भर हा विशेषतः ग्रामीण विकासावर आहे.
भारतीय शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. यामुळे अचूक अंदाज घेणे महत्वाचे ठरते. यामध्ये ही मालिका योगदान करते आहे. समुद्र किनारा आणि हवामान यामधून निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांची सूचना देण्यामध्ये ही मालिका योगदान देते.
इस्रोची अजून एक महत्वाची मालिका म्हणजे इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटस म्हणजेच IRS. या मालिकेचे मुख्य उद्दिष्ट हे पृथ्वीचे निरीक्षण करणे आणि त्याविषयी माहिती पाठविणे हे आहे. ही मालिका १९८८ मध्ये सुरु करण्यात आली होती. यात एकूण ११ विविध प्रकारचे उपग्रह आहेत. आयआरएस मालिका ही अवकाशीय रिजोल्यूशन, स्पेक्ट्रल बँड आणि विविध प्रतिमा प्रदान करणारी जगातील सर्वात मोठी नागरी रिमोट सेन्सिंग उपग्रह मालिका आहे. यामधून मिळणारी माहिती ही अनेक कारणांसाठी उपयुक्त आहे. शेती, जलस्रोत, शहरी विकास, खनिज संभाव्यता, पर्यावरण, जंगल संवर्धन, दुष्काळ आणि पूराचे अंदाज, महासागरी संसाधने आणि आपत्ती व्यवस्थापन यामध्ये या माहितीचा उपयोग केला जातो. शिवाय नेव्हिगेशन आणि सीमा सुरक्षेसाठी देखील अत्यंत उपयुक्त माहिती या मालिकेमधून प्राप्त होत असते. इन्सॅट आणि आयआरएस या आपल्या देशाच्या उपग्रह मालिका जगामध्ये अत्यंत मोलाचे योगदान देत आहेत. या मालिकांमध्ये अनेक नॅनो उपग्रह देखील आहेत. आजपर्यंत भारताने विविध प्रकारचे लहान मोठे ७८ उपग्रह अवकशात सोडले आहेत. काही अपवाद वगळता यातील बहुतेक मिशन्स ही यशस्वी झाली आहेत
– सुजाता बाबर