हल्ली नागरी वस्त्यांतून रात्री मोठे आणि प्रखर प्रकाशाचे दिवे लावण्याची पध्दत रूढ होत आहे. हा प्रकाश असतो तरी किती आणि कसा हे पाहण्यासाठी इटालियन ज्योर्तिर्विद सिनझॅनो यांनी २००१ मध्ये रात्रीच्या कृत्रीम प्रकाशाच्या झगमगाटाची उपग्रहावरून घेतलेली प्रकाशचित्रे प्रकाशित केली. त्यात विशेषत्वाने जपान, पश्चिम युरोप, आणि अमेरिकेतील नागरी वस्त्यांवरचा उजेड म्हणजेच प्रकाशाचा झगमगाट दिसला. रात्रीच्यावेळी पृथ्वीवर एवढे कृत्रिम दिवे लावले जातात की जगातील जवळ-जवळ २/३ लोकांना आकाशगंगा दिसतच नाही. स्वच्छ अंधा-या रात्री जिथे जमिनीवरचा प्रकाश नसेल अशा ठिकाणाहून साधारणपणे २५०० नक्षत्र, तारे वा तारकासमूह साध्या डोळयांनी दिसू शकतात. न्युयॉर्कच्या उपनगरातून जेमतेम २५० तारे दिसतात तर मॅनहॅटमधून १५ जरी दिसले तरी फार झाले. रात्रीच्या आकाशातील नक्षत्र, तारे दिसत नाहीत अशा ठिकाणी म्हणजेच जिथे कृत्रिम प्रकाशाचा झगमगाट असेल तिथे प्राण्यांची नैर्सगिक लय बिघडते. शिकार आणि शिकारी यांच्यातील समीकरण बिघडते असे या विषयावर अभ्यास करणारे शास्त्रज्ञ म्हणतात.
अनेक प्राणी व कीटक नैसर्गिकरीत्या चंद्र आणि ता-यांच्या अंधुक प्रकाशातच मार्गक्रमण करू शकतात. प्रखर प्रकाशाने ते बावचळून जातात. टोरंटो येथील ‘फेटल लाईट अवेअरनेस प्रोग्राम’ या संस्थेचे मायकेल मिझुरेन यांच्या अंदाजाप्रमाणे उत्तर अमेरिकेतील झगमगीत उंच इमारतींवर १० कोटी पक्षी दरवर्षी तरी आपटत असावेत. रात्री उडणा-या पाकोळया कृत्रिम प्रकाशात गोंधळून जातात. वॉशिंग्टन विद्यापिठातील ‘बर्क म्युझियमचे’ कीटकशास्त्रज्ञ रॉड क्रॉफर्ड यांच्या मते एकेकाळी उन्हाळयात विपुल दिसणाऱ्या ‘जायन्ट सिल्क मॉथ’ ची संख्या कमी होण्यामागे त्यांच्या अधिवासाच्या-हासाच्या जोडीने प्रकाश प्रदूषण कारणीभूत असावे. प्रकाशापासून दूर अंतरावर अधिक संख्येने पाकोळया आढळतात याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
फिलाल्डेफियातील डॉक्टर आणि कीटकशास्त्रज्ञ केनेथ प्रँक म्हणतात ‘पाकोळयांना मीलनासाठी जी अल्पकालीन संधी असते ती झगमगीत प्रकाशामुळे हुकते. शिवाय प्रकाशात त्यांची सहजी शिकार होते. झगमगीत प्रकाशामुळे पाकोळयांच्या स्थलांतराच्या मार्गाचा गोंधळ होतो आणि त्या भलतीकडे अंधा-या बेटावर उतरतात.’ वेलस्ली कॉलेजमधील मरिऑन मूर या लिम्नोलॉजिस्ट झू प्लँक्टनचा अभ्यास करीत आहेत. झू प्लँक्टन हे कवचधारी सूक्ष्मजीव रात्रीच्यावेळी खाण्यासाठी जलाशयाच्या पृष्ठभागावर येतात आणि जलशैवाल (Algae) खातात. प्रकाशात शिका-यापासून संरक्षणासाठी ते खोल पाण्यात दडतात. रात्रीच्या वेळच्या परावर्तित प्रकाशाच्या चमचमाटामुळे अधिक काळ त्यांना खोल दडून रहावे लागते. त्यांना चरायला कमी वेळ मिळतो. परिणामी जलशैवाल वाढत राहते व त्यामुळे इतर पाणवनस्पती गुदमरतात. जलाशयातील विविध कीटकांच्या प्रणयक्रीडा आणि मीलनाच्या कार्यक्रमात अडथळा येतो. चंद्रप्रकाशाच्या नैर्सगिक वातावरणात त्यांचे प्रणयी जीवन फुलत असते.
माणसाच्या सोयीसाठी प्रखर प्रकाश योजना आवश्यक आहेत. त्यामुळे पर्यावरणात हे लहानसहान बदल होतात, त्याचा एवढा बाऊ करायचे कारण नाही, असे काही लोक म्हणतात. पण प्रकाश प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर देखील परिणाम होतो हे त्यांच्यासाठी सांगितले पाहिजे. ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिटयूट’ च्या पत्रिकेत २००१ साली दोन वेगवेगळे संशोधन निबंध प्रसिध्द झाले होते. त्यावरून रात्रीच्या वेळी दीर्घकाल कृत्रिम प्रकाशात राहिल्याने छातीच्या कर्करोगाची शक्यता वाढते, असे म्हटले होते. सिएटलमधील ‘फ्रेंड हाचिन्सन कॅन्सर रिसर्च सेन्टर’ च्या शास्त्रज्ञांनी १६०६ स्त्रियांचे परीक्षण केले असता ज्या स्त्रिया रात्रपाळीला काम करतात, त्यांच्यामध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण ६०% अधिक सापडले होते. वर्षानुवर्षे रात्रपाळीसाठी घालवलेल्या तासांच्या प्रमाणात हे प्रमाण अधिक वाढते असे दिसले. बोस्टनमधील ‘ब्रिगहॅम ऍन्ड विमेन्स हॉस्पिटल’ मधील संशोधकांनी ७८५६२ नर्सेसच्या आरोग्य इतिहासाची तपासणी केली असता तसाच पण कमी प्रमाणात संबंध असल्याचे आढळले होते. १ ते २९ वर्षे रात्रपाळीला काम करणा-या नर्सेसमध्ये स्तनाच्या कर्करोगाची क्षमता ८% तर ३० वा अधिक वर्षे रात्रपाळी केलेल्यांच्या बाबतीत ती ३६% वाढलेली होती.
प्रकाश हे औषध
दृकपटलावर पडणा-या प्रकाशामुळे शरीरातील मेलॅटोनिन तयार होण्याचे प्रमाण कमी होते. या हार्मोनवर सिरकॅडियन चक्र अवंलबून असते. मेलॅटोनिनमध्ये ऍंटीऑक्सीडंट गुणधर्म आहेत. काही सस्तन प्राण्यांमध्ये मेलॅटोनिनमुळे एस्ट्रोजेन एस्ट्रॅडिओलची निर्मिती थांबते. हे हार्मोन स्तनाच्या कर्करोगाशी संबंधित आहेत. ‘प्रकाश हे एक औषध आहे पण त्याचा गैरवापर करून आपण आपल्या प्रकृतीशी तडजोड करतो’ असे टेक्सास विद्यापिठातील रसेल रीटर हे शास्त्रज्ञ म्हणतात. त्यांनी मेलॅटोनिनच्या रोगप्रतिबंधक शक्तीवर संशोधन केले आहे.
सर्व त-हेचे प्रकाश सारख्याच प्रखरतेचे असले तरी त्यांच्या सारखा प्रकाशीय आणि जैव परिणाम दिसत नाही. फ्लोरेसेंट बल्ब मंद व हलाइडचे दिवे, आणि उच्च दाबाचे मर्क्युरी दिवे (जे स्टेडियमवर वापरले जातात) ते जंबूपार (Ultraviolet) किरण सोडत असतात. त्याचा प्रदीपनासाठी (Illumination) फारसा उपयोग नसतो. पण त्यामुळे जवळपासच्या वेधशाळांच्या कामावर परिणाम होतो. नेहमीचे दिवे अवरक्त (Infrared) किरण सोडतात, त्यामुळे तिथे अधिक उष्णता निर्माण होते. पण त्यांची प्रकाशक्षमता घटते. रस्तोरस्ती बसविलेले उच्च दाबाचे सोडियम दिव्यांचा वर्णपट विस्तृत असतो. तो नैसर्गिक भासतो. त्यामुळे पतंग, पक्षी किंवा काही प्राणी आकर्षित होतात. कमी दाबाचे सोडियम दिवे अधिक कार्यक्षम असतात. ते पिवळा प्रकाश टाकतात,त्यामुळे त्यांचा पर्यावरणीय दृष्टया विपरीत परिणाम होत नाही. कीटक वा पक्षी त्याकडे आकर्षित होत नाहीत.
पर्यावरणीय दृष्टीने सौम्य पिवळा प्रकाश हितावह असला तरी लोकांच्या मते झगझगीत प्रकाशात अधिक चांगले दिसते. आणि प्रामुख्याने त्यामुळे अधिक सुरक्षितता लाभते असे त्यांना वाटते. मंद प्रकाशात चोरीमारीचे प्रकार जास्त होतात म्हणून प्रखर प्रकाश असावा अशी मागणी केली जाते. पण दीप्तीमुळे दृश्यमानता वाढत नाही उलट अतिप्रखर प्रकाशात डोळे दिपतात हे लक्षात ठेवले पाहिजे.
‘अमेरिकेत इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन’ ही संस्था काम करते. ठिकठिकाणी अतिप्रकाशामुळे प्रकाशाचे होणारे प्रदूषण कमी व्हावे यासाठी ते काम करतात. प्रकाशयोजना करताना आवश्यक असेल तेवढयाच भागावर प्रकाशाचा झोत असला तरी वाटसंरूचे डोळे दिपतील अशी रचना नसावी. बाहेर लावल्या जाणा-या दिव्यांचे वॉटेज कमी ठेवावे असे सुचवितात. गेल्यावर्षी कॅलगरी अल्बर्टा (लोकसंख्या ९ लाखाहून अधिक) या शहराने प्रकाशाचे मान कमी करण्यास सुरूवात केली. २०० वॉट ऐवजी १०० वॉट आणि २५० च्या जागी १५० वॉटचे दिवे तिथे लावले. हा बदल १० लोकांना भावला तर एका माणसाची तक्रार आली. वयस्क नागरिकांनी प्रकाश कमी केल्यामुळे गुन्हे वाढतील अशी ओरड केली. पण पोलिसांच्या दृष्टीने कमी उजेडात अधिक गुन्हे व प्रखर उजेडात कमी गुन्हे असे समीकरण आढळले नाही. घरफोडीचे प्रमाण दिवसा जेव्हा घरातील लोक कामावर गेलेले असतात, त्याचवेळा वाढलेले असते, अशी पोलिसांची आकडेवारी सांगते.
विविध दिव्यांची तुलना
दिव्याचा प्रकार | आयुष्य | वॉटेज | प्रखरता | सर्वोच्च तपमान (फॅ) | कार्यक्षमता (प्रति वॉट) |
नेहमीचे दिवे | ३००० तास | १८९ | २९०० ल्युमेन्स | ३४०० फॅ | १५.३ |
फ्लोरोसेंट नळया | १०००० तास | १६२ | ७७५० | ८०० फॅ | ४७.८ |
पा-याची वाफ | २४००० | ४०० | १९१०० | ७५२० फॅ | ४७.८ |
मेटल हलाईड | १०००० | १००० | ७१००० | ९३२० फॅ | ७१ |
अतिदाबाचे सोडियम दिवे | २४००० | ४०० | ४५००० | ७५२० फॅ | ११२.५ |
कमीदाबाचे सोडीयम दिवे | १८००० | १८० | ३३०० | ३०२० फॅ | १८३.३ |
दिव्यांचा प्रकाश कमी केल्याने उधळपट्टी कमी होईल त्याचबरोबर प्रखर प्रकाशाने होणा-या प्रदूषणास आळा बसेल हे लक्षात घेतले पाहिजे.