सृष्टीरंग – लेख

आंतरिक्ष पध्दति (संकलन)

Compilation बृहत् संहिता (अ २८ वा पृष्ठ १४)

१) सूर्य उगवतांना डोंगराच्या कडा अतितेजाने तळपतील व पातळ सोन्याच्या रंगा सारखा किंवा वैडूर्यासारखा सूर्य भासेल तर पावसाळयात त्या दिवशी पाऊस पडेल. दुपारी खूप उकाडा होऊन कडक ऊन असेल तरीही पाऊस पडेल.
२) पर्वत काजळासारखे काळे दिसतील, उकाडा खूप होईल.
३) चन्द्राचे परिवेष (खळे) कोंबडयाच्या डोळयांसारखे लाल असेल तर शीघ्र वृष्टि होते.
४) ईशान्य दिशेला वीजा चमकतील तर पाऊस लवकर येतो.
५) कीर व कवडा यांच्या डोळयासारखे तांबूस असून मधासारखा चन्द्र दिसेल तर शीघ्र वृष्टि होते.
६) रात्री गडगडाट होईल, दिवसा रक्तासारखी लाल, दंडासारख्या जाड विजा वर खाली चमकतील, पूर्वेकडून थंड वारा वाहील तर पाऊस लवकर येतो.
७) वेलींचे नवे अंकूर उर्ध्वगमन करतील.
८) ढगांचे रंग : मोर, पोपट, चाव (एक पक्षी) चातक याच्या रंगासारखे, जास्वंदीच्या फुलासारखे किंवा लाल कमळासारखे, लोहितवर्ण, पाण्यातील भोव-यासारखे, किंवा सुसर, मगर, कासव, डुक्कर, मासे, यांच्या आकाराचे दाट ढग संध्याकाळी असतील तर पाऊस लवकर पडतो.

९) आसमंतात अमृत व चन्द्रासारखे पांढरे/श्वेत आणि मध्यभागी काजळ व भुंग्यांच्या रंगाचे काळे असे निर्मळ, दाट, बारीक बिंदू सोडणारे (शिरोमेघ); शिडीच्या पायरीसारखे (स्तरीय मेघ) एका वर एक असे राहणारे, पूर्वेस उत्पन्न होऊन पश्चिमेस जाणारे अथवा पश्चिमेस उत्पन्न होऊन पूर्वेस जाणारे ढग पृथ्वीवर खूप पाऊस पाडतात. भरपूर पाऊस पडतो.
१०) सूर्याच्या अस्तकाळी इन्द्रधनुष्य, परिघ,(अभ्ररेषा); एकाच वेळी दोन सूर्य भासणे, वीज, खळे ही जर होतील तर शीघ्र वृष्टि होते.
११) सूर्योदयाला तितिर पक्षाच्या पंखासारखे (विचित्र वर्ण) आकाश होईल, पक्षी समुदाय आनंदाने किलबिलाट करतील तर रात्रं-दिवस पाऊस पडतो. उदयकाली असतां दिवसा पाऊस पडतो. अस्तमान समयी असतां रात्री पाऊस पडतो.
१२) सूर्यास्त समयी किरणे लांब दिसतील, ढग जमिनीजवळ येऊन गडगडाट होईल तर ते शीघ्र वृष्टिचे लक्षण समजावे.
१३) दंड (वक्ष्यमाण) वीज, मत्स्य, परिघ, परिवेष, इन्द्रधनुष्य, ऐरावत, इन्द्रधनुष्य लांब सूर्य किरण हे संध्याकाळी जर स्निग्ध दिसतील तर शीघ्र वृष्टि होईल.
१४) सूर्य किरणे स्निग्ध, अखंड, सरळ, अशी शुभ्र किरणे हे वृष्टि आणतात – पाऊस पडतो.
१५) पांढरे-काळे, पिगंट, कपिल (सावळे) विचित्र, आरक्त, हिरवे, शबल (शामल) या वर्णाचे सर्व आकाश व्यापून राहणारे सूर्यांचे किरण पाऊस देतात.
७ दिवसांनी थोडे भय होते
अ) तांबडा रंग असतां शस्त्र व अग्नि यांचे भय होते. कपील वर्ण असतां वा-यासह पाऊस पडतो.
भस्मासारखा (राखाडी) रंग असतां अवर्षण होते. पाऊस पडत नाही. कृष्ण नील मिश्रीत रंग असतां अल्प वृष्टि होते.
ब) सायंकाळी चक्री वा-यातील धुळीचा रंग पांढरा असेल तर कल्याण होते ह्याच धुळीचा रंग लाल किंवा काळा असेल तर रोग पीडा (साथीचे रोग) होतात.

१६) झाडाच्या आकाराचे ढग त्याच्या शेंडयाजवळ दहयाच्या रंगाचा मध्यभागी नीलवर्ण, सूर्यास आच्छादणारा, आकाश मध्यभागी राहणारा, असा ढग पिवळया रंगाने सुशोभित दाट असे ढग असतां फार पाऊस पडतो.
१७) सूर्यास्ताचे वेळी- निळा, पिवळा, कमळ, केसरा प्रमाणे, (पिवळा) अशा रंगाचा ढग, सूर्य किरणांनी युक्त असतां तात्काळ पाऊस पडतो.
१८) गाढव, उंट, कावळा, मांजर, इत्यादींच्या आकाराचे ढग, गंधर्वनगर बर्फ, धूळ, धूम यांनी युक्त संध्याकाळ असतां अवर्षण जाणावे. दु:ष्काळ संभवतो. ही लक्षणे पावसाळयातील जाणावी. पाऊस पडत नाही.
१९) सहा ऋतु सूर्याचे रंग पुढील प्रमाणे असतां शुभ जाणावे.

१. शिशीर – किरमिजी
२. वसंत – पिवळा
३. ग्रीष्म – पांढरा
४. वर्षा – चित्र
५. शरद् – पद्म (कमळासारखा – कुसुंबीरंग)
६. हेमंत – रक्तासारखा

२०) अत्यंत श्वेत (पांढरे) ढगांचे आच्छादन दक्षिणेकडून सूर्यास होईल तर वृष्टि होते.
२१) सूर्यांच्या दोन बाजूंनी परिघ (तिरकस मेघ रेषा) असेल तर खूप पाऊस पडतो. परंतु हा परिघ सूर्याभोवती सर्व बाजूंनी असेल तर पावसाचा थेंबही पडत नाही. मोठा दु:ष्काळ पडतो.

मेघ विचार
२२) ढगांच्या गडगडाटाचा आवाज जर- मोर, चातक, बेडूक, यांच्या शब्दांनी मिश्रीत मधूर व सुंदर असे शब्द करणारे ढग जर आकाशात सर्वत्र असतील तर ते खूप वृष्टि करतात.

२३) पूर्वेकडील उत्पन्न झालेल्या ढगांनी अग्निकोप होतो.
दक्षिणेस उत्पन्न झालेल्या ढगांनी धान्य नाश होतो.
नैऋत्येस उत्पन्न झालेल्या ढगांनी अर्ध्या धान्याचा नाश होतो.
पश्चिमेच्या मेघांनी चांगली वृष्टि होते
उत्तरेच्या मेघांनी परिपूर्ण वृष्टि होते. (पिकांच्या पुष्ठीस उपयुक्त)
ईशान्येच्या मेघांनी धान्य उत्तम येते

वा-यावरून (बृ.सं.अ.२६ श्लोक १३)

२४) रोहिणी योग पूर्वेचा वारा असेल तर सर्वधान्ये येतील
अग्नेय दिशेचा वारा असेल तर अग्निकोप
दक्षिणेचा वारा असेल तर अल्प वृष्टि होते – धान्य अल्प येते
नैऋत्येचा वारा असेल तर मध्यम वृष्टि होते
पश्चिमेचा वारा असेल तर वायूसहित पाऊस पडतो.
उत्तर व ईशान्येचा वारा शुभ वृष्टि होईल.

कृषिपराशर अ.१३ ‘संघोवृष्टि लक्षणम’

२५) जर पाण्यातून (जलाशयातून), पाण्याजवळ (जलाशयाजवळ), जलाशयाच्या (पाण्याच्या) किना-यावर कारंजा फुटेल, दिसेल तर ब्रम्हदेव सांगतात की पृथ्वीला तृप्त करण्यांसाठी अविलंब वृष्टि होते.
२६) आषाढ शु।।९।।ला जर पाऊस पडेल तर वर्षभर पाण्याची कमतरता भासणार नाही. समाधानकारक पाऊस पडेल. न पडल्यास किंवा किंचित् पडल्यास पावसाळयात पाऊस कमी पडतो. अजिबात न पडल्यास दु:ष्काळ जाणावा.

वनमाला अध्याय २ रा

२७) ईशान्य दिशेला वीजा चमकतील तर पाऊस पडतो.
२८) पावसाळयात उदयोन्मुख सूर्याचा रंग (उगवता सूर्य) सोन्यासारखा कान्तिमान स्वच्छ माणकासारखा, पोवळयासारखा (मुंगा) असून माध्याही अत्यंत प्रखर तळपणारा असा असेल तर ते शीघ्र वृष्टि लक्षण समजावे.
२९) पावसाळयात हवा स्तंभीत होऊन सूर्य किरणांनी तळपत असेल, तर पाऊस लवकर सुरू होण्याचे लक्षण समजावे.
३०) लोखंडी खांबांना गंज चढतो
३१) पावसाळयाच्या दिवसात – शुभवारी गुरूवार, सोमवार, बुधवारी किंवा शुक्रवारी चन्द्राला खळे पडेल व त्याचा रंग रक्तशामवर्णी (काळपट लाल) असेल तर पृथ्वीवर सर्वत्र पाऊस पडतो.
३२) चन्द्र सूर्याला खळे पडणे (परिवेश) हे शुभ किंवा अशुभ असू शकते शुक्रवारी शुभ मुहूर्तावर होणारा परिवेश शुभ होय त्याचा रंग काळपट लाल असतो.
३३) पावसाळयात चन्द्रांची क्रांन्ती कबूतराच्या डोळयांसारखी किंवा (शुभ्र असता) वृष्टि होते.
३४) पावसाळयात सूर्योदयाला किंवा सूर्यास्ताला आकाशाचा रंग तितर पक्ष्यासारखा भूरकट. (मातकट रंग); त्याच वेळी आकाशात पक्षी किलबिलाट करत असतील तर सर्व दिशांना भरपूर पाऊस पडतो.
३५) आकाशात सूर्योदयाला किंवा सूर्यास्ताला जर प्रति सूर्य दिसेल, किंवा इन्द्रधनुष्यसुध्दा दिसेल किंवा सूर्याला किंवा चन्द्राला परिवेष (खळे) दिसेल, सूर्याच्या चारही बाजूंना वीजा चमकत असतील तर आवश्य सर्वत्र पाऊस पडतो.
३६) जर सूर्याची लांब स्निग्ध किरणे सायंकाळी डोंगरमाथ्यापर्यंत असतील (जी किरणे उज्वल दिसतील, स्निग्ध, मृदु, लांब आणि सरळ किरणांना अभोध किरणे म्हणतात) अभोध किरणे अत्यंत प्रभावशाली असतात.
३७) पावसाळयात शुध्द पक्षातील द्वितीयेला चन्द्राचे उत्तरशृंग उंच असेल तर समाधानकारक पाऊस पडतो. परंतु विपरीत म्हणजे दक्षिणशृंग उंच असल्यास पाऊस पडत नाही.
३८) शुघ्दपक्षातील द्वितीयेचा चन्द्र जर निळया ढगांनी आच्छादिलेला असेल तर सुवृष्टि होते.

मेघमाला (ईश्वर पार्वति संवाद)

अध्याय ९ वा मेघ-विद्युत वात फल (पृष्ट १२२)

३९) सूर्यास्ताचे वेळी पूर्वदिशेला जर आकाश ढगांनी व्यापलेले असेल व ह्या ढगांचे आकार काही सिंह, हत्ती, काही डोंगरासारखे, काही मगरीच्या आकाराचे खवल्या खवल्या सारखे, माशाच्या तोंडासारखे, काही हरणांसारखे असे मेघ असतील तर ५ ते ७ दिवस भरपूर पाऊस पडतो.
४०) सूर्यास्ताचे वेळी उत्तर दिशेला जर पर्वताकार ढगांची माळ दिसेल, त्यांचे आकार जलचर प्राण्यांसारखे असतील (मासे, मगर, कासव, पाणघोडे इ.) तर मध्यरात्री ७ दिवस खंड वृष्टि होते. जर मगरीच्या आकाराचे ढग असतील तर तीन रात्री किंवा सात रात्री पाऊस पडतो, आणि हेच ढग ईशान्य दिशेला पर्वतासारखे काळे असतील तर संध्याकाळीच पाऊस पडतो. जर वायव्य दिशेला ढग असतील तर रात्रीच्या पूर्वार्धात (पहिल्या प्रहरात) पाऊस पडतो.
४१) वा-याच्या दिशेनुसार पर्जन्य ज्ञान – जाणून घेण्यासारखे आहे. पावसाळयात पूर्वेकडचा वारा असतांना सुभिक्ष होते यात संशय नाही. उत्तम पाऊस पडतो. दक्षिणेकडचा वारा क्षेत्र, आरोग्यदायी, नैऋदायेचा वारा-दु:खदायी पश्चिमेचा वारा असेल तर चांगले धान्य उत्पादन होते. वायव्येकडचा वारा असेल तर वायू आकाशातच असल्याने पाऊस पडत नाही. वारा वाहतो. उत्तरेकडचा वारा असतांना शुभ फलदायी इशान्येकडचा वारा संपूर्ण संपदा देणारा असतो.
४२) वीजा + ढग = पूर्व दिशेचे ढग वीजा उत्पन्न करतात, अग्नेय दिशेच्या वीजा ढगातील पाणी शोषण करतात. दक्षिणेकडच्या वीजा पाऊस पाडत नाही. नैत्रदाय दिशेकडच्या वीजा भय उत्पन्न करतात. पश्चिमेकडील मेघ + वीजा = सुभिक्षकारक असते. वायव्ये कडील वीजा आणि ढग सुख संपत्ती देतात. उत्तरेकडचे ढग व वीजा धन धान्य समृध्दि देतात.

कादम्बिनी आंतरिक्ष पध्दती

४३) सूर्योदयाला पश्चिम दिशेला इंद्रधनुष्य दिसेल तर जलनक्षत्री
जलनक्षत्र – हस्तचित्रा, स्वाती, मूळ, पूर्वाषाढा, श्रवण, पूर्वा भाद्रपदा, रेवती, भरणी, तिन्ही उत्तरा आणि रोहिणी.
४४) निळया रंगाचे ढग सूर्याभोवती असून सूर्याला खळे पडलेले असेल तर आणि दिवसा ईशान्य दिशेला वीजा चमकत असतील तर शीघ्र वृष्टि होते.
४५) सूर्योदय किंवा सूर्योस्ताला सूर्यांची किरणे, कुंडल लाल असेल, वीजा चमकत असतील तर सूर्याभोवती परिघ असेल तर शीघ्र खूप पाऊस पडतो.
४६) श्रावण महिन्यात प्रात:काळी मेघगर्जना होतील, जलपृष्ठावर माशांचा भास होईल तर २ दिवसांत पृथ्वी जलमय होईल इतका पाऊस पडतो.
४७) श्रावण महिन्यात शुघ्द पक्षात कोणत्याही दिवशी दक्षिणेकडचा जोराचा वारा वाहील तर शततारका नक्षत्रांत खूप पाऊस पाडतो. (श्रावण कृष्ण पक्षात शततारका नक्षत्र येते)
४८) पूर्वेकडचा वारा असून इतर दिशांना धुके असेल, धूम्रवर्ण असतील तर १२ तासांत पाऊस पडतो.
४९) रात्री गडगडाट, दिवसा, लाल रंगाच्या जाड वीजा चमकतील, पश्चिमेचा थंड वारा असेल तर शीघ्र वर्षा होते. पाऊस पडतो.
५०) सूर्यास्ताच्या वेळी पर्वताकार ढग दिसतील तर दुस-या दिवशी सूर्योदयाला पाऊस पडतो.
५१) पूर्व दिशेला धुरकट ढग जर सूर्यास्ताचे वेळी काळे झालेले दिसतील आणि उत्तरेला विखूरलेले ढग असतील तर लवकर पाऊस पडतो.
५२) सूर्योदयापूर्वी सर्व दिशा स्वच्छ असतील, दूपारी खूप गरम वाटेल (उष्णता वाढते/तर मध्यरात्री संतोषकारक पाऊस पडतो.)
५३) खूप जोराचा वारा वाहणे किंवा अजिबात वारा नसणे, अत्यंत गरम होणे किंवा खूप थंडी वाजणे, आकाशात खूप ढग असणे किंवा अजिबात ढग नसणे, अशी सहा लक्षणे ढगा विषयी सांगितलेली आहेत.
५४) वारा वाहणे किंवा जोराचा वारा असून गरमी पडणे, चारही दिशांनी वारा दिशा बदलणे (सव्य भ्रमण – उजव्या बाजूने वारा असल्यास पाऊस पडतो, वारा अपसव्य – डाव्या बाजूने असता पाऊस पडत नाही.) ह्या सर्वांना कारणीभूत होत सर्वत्र पसरलेले ढग असणे किंवा जरूर पाऊस पाडतात.
५५) वर्षाकाल प्रांरभी (रोहिणी नखत्रांत सूर्य असतांना) दक्षिणेकडचा वारा, ढग व वीजा असतील तर पाऊस निश्चित पडतो.
५६) शुक्रवारी दिसलेले ढग शनिवारी तसेच दिसत राहिले तर रविवारी खूप पाऊस पडतो.
५७) उत्तरेला ढगांचा गडगडाट, पूर्वेचा वारा असेल तर आवश्य पाऊस पडतो.
५८) इतर दिशांना वाहणारा वारा जर पूर्वेकडून वाहू लागला आणि त्यावेळी पूर्वेला ढग असतील तर निश्चित पाऊस पडतो.
५९) पूर्व दिशेला वीजा चमकतील वायव्य आणि पूर्वेकडचा वारा असेल, चातक पक्षी ओरडत असेल तर अचानक खूप पाऊस पडतो.
६०) स्तरीय मेघांनी (एकावर एक थर असलेले) आकाश झाकलेले असेल, चारही दिशांची हवा स्तब्ध असेल तर शीघ्र खूप पाऊस पडतो.
६१) गरमीमुळे जीव घाबरत असेल, वायु (वारा) प्रतिकूल नसेल तर शीघ्र खूप पाऊस पडतो.
६२) संपूर्ण रात्रभर आकाशात ढग असतील, सकाळी उकाडा होत असेल, ढगांचा गडगडाट होईल तर रात्रीपर्यंत पाऊस सुरू होऊन कित्येक दिवस पाऊस पडतो.
६३) जर दोन ढगांची टक्कर होईल तर ४-६ तासांनंतर जोराची वृष्टि होते.
६४) सांयकाळचे वेळी अनेक थर असलेले ढग (खवल्यांचे) असतांना मोर नाचतील, इन्द्रधनुष्य दिसेल, लाल रंगाचे ढग असतील, जलचर प्राण्यांच्या आकाराचे ढग असतील किंवा डोंगरासारखे ढग असतील तर शीघ्र वृष्टि होते. पाऊस पडतो.
६५) ढगांच्या कडा किंवा टोक पांढरे, निळे, स्निग्ध असून ढग स्तरीय असतील तर शीघ्र पाऊस पडतो.
६६) तितर पक्ष्याच्या रंगाचे चित्रविचित्र ढग सकाळी किंवा संध्याकाळी दिसतील किंवा रात्रं-दिवस दिसतील तर खूप पाऊस लवकर पडतो.

सारांश : निसर्ग निरीक्षणातून, अनुभवाधिष्ठित ज्ञानातून ऋषिमुनिंनी पावसाचे आडाखे बांधले. सर्व सामान्यांसाठी श्लोकबध्द केलेले हे श्लोक संस्कृत भाषेत असल्याने विशिष्ट वर्गाच्या आधिन झाले. परंपरागत पध्दती, उच्चार भेद, -हस्व दीर्घाचा लोप, अर्थात हयामुळे चुकीचे संकेत मिळू लागले व पूर्वापार चालत आलेले हे ज्ञान लोप पावले. आपण प्रयत्नपूर्वक निसर्ग निरीक्षणे, त्यांच्या नोंदी ठेवल्यास प्रत्येक व्यक्ती पर्जन्यता अंदाज घेऊ शकेल हयात संशय नाही. माणूस खोटे बोलू शकतो पण पशु-पक्षी, निसर्ग तसे करीत नाही. निसर्ग सानिध्याने पशु-पक्षी किडे, मुंग्यांना विशेष संवेदना शक्ती प्राप्त असते परिणाम सुनामीच्या वेळी मनुष्य हानी जास्त झाली, पशु-पक्ष्यांची नाही, असो.

संर्दभ : सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामया:

संकलन – सुधाकर रघुनाथ जोशी देवळाली, नाशिक

सदर लेखाचे इंग्लिश रुपांतर वाचण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा