सृष्टीरंग – लेख

आकाशाशी जडले नाते धरणीचे

Sky Earth मानवी जीवनात ताण-तणावाच्या, धकाधकीच्या दैंनदिन जीवनात बागेतील फेर-फटका, नदीकाठ, धबधबा, डोंगर माथ्यावर अस्तास जाणारा सूर्य, सूर्याभोवतीचे रंग त्याच्याच सानिध्यात अनेक आकाराचे, प्रकारांचे व विविध रंगांचे ढग, वाहणारा वारा, सायंकाळी घरटयाकडे परतणारे पक्षी, त्यांचा कलकलाट मनाला भुरळ पाडतात व पाहणारा काहीकाळ तरी दैंनदिन व्यथा विसरतो ही नित्याची व प्राय: प्रत्येकाने अनुभवलेली गोष्ट. निसर्ग सानिध्यात रममाण न होणारी व्यक्ती विरळीच.
अहो! हे निसर्ग जर इतके प्रिय, श्रमपरिहार करणारे आमचे मित्र आहेत तर हया मित्राची माहिती आम्हास आहे काय? मित्र म्हटला की त्याच्या आवडी-निवडी, स्वभाव, प्रसंगी मदत करण्याची वृत्ती, संकटांची चाहूल लागताच मित्राला सावध करण्याचा स्वभाव, संकटांची पूर्व सुचना देऊन संकटातून वाचविण्याची कृती या सर्व गोष्टींची आपणांस माहिती हवी. नसल्यास करून घेणे गरजेचे आहे.

आपले पूर्वज वेदकाळापासून अरण्यात निसर्ग सानिध्यात राहिले. निसर्गातील वारा, पाऊस, उन, थंडी, पशु-पक्षी यांचे निरीक्षण केले. हया निसर्गाची भाषा शिकली. त्यांचे संकेत जाणून स्वत:चे व समाजाचे रक्षण केले. अतिवृष्टि, अनावृष्टि, दुष्काळ, यांच्यापासून होणारे दुषपरिणाम, दु:खातून वाचविण्यासाठी निसर्गातील संहितेचा वापर केला. संहिता म्हणजे धर्माप्रमाणे आचरण व कृति. खालील निसर्ग संहितेचे मनन करता लक्षात येते की पशु, पक्षी, किडे, मुंग्या सुध्दा आपआपल्या नियत धर्माचे पालन करतांना काही विशिष्ट परिस्थितीत विपरीत वागतांना दिसतात आणि हेच त्यांच्या नित्य जीवनातील बदल माणसाला पावसाचे संकेत देतात. पाऊस जाणून घेण्यासाठी मुनिंनी ३ पध्दतींचा वापर केला पैकी २ येथे देणार आहोत. हे सकल असून अनेक ग्रंथांच्या वाचनातून संग्रहीत केले आहे. तुम्हीही जाणून घेऊन पर्जन्य तज्ञ होऊ शकता.

पाउस जाणून घेण्याच्या पद्धती

१) भौम पध्दती २) अंतरिक्ष पध्दती

१) भौम पध्दत
पुढील १ ते ७२ निरीक्षणांतून ० ते ५ दिवस आधी पावसाचे संकेत मिळतात. हया पध्दतीस ‘भौम पध्दती’ असे नाव पूर्वजांनी दिलेले आहे.

बृहत् संहिता सघो वृष्टि लक्षणं(अ.२८ पृष्ट १)वरुन
१) आकाशातील रंग गाईच्या डोळयासारखे किंवा कावळयाच्या अंडयाच्या रंगा सारखे दिसतील. दिशा स्वच्छ असतील तर पाऊस लवकर पडतो.
२) मासे भूमीवर येण्यासाठी उडया मारतील.
३) बेडुक वारंवार शब्द करतील (ओरडतील) तर शीघ्र वृष्टि होते.
४) मांजरे नखांनी जमीन उकरतील.
५) मार्गात (रस्त्यात) मुले पूल बांधतील.
६) कामाशिवाय मुंग्या आपली अंडी दुस-या जागी नेतील.
७) सर्प मैथून करतील, झाडावरही चढतील.
८) गाई उडया मारतील तर ते शीघ्र वृष्टिचे लक्षण होय.
९) सरडे झाडाच्या शेंडयावर जाऊन आकाशाकडे पाहातील तर शीघ्र वृष्टि होते.
१०) गायी, बैल, गोठयातून बाहेर पडत नाहीत. त्यांचे कान व पाय कंप पावतील (कापतील/थरथरतील) तर ही शीघ्र वृष्टिची लक्षणे समजावी.
११) कुत्रे रस्त्यावर उभे राहून आकाशाकडे पाहून भुंकतील, पाळलेले कुत्रे घराबाहेर जात नाही. त्यांचे कान व पाय कंप पावतील (कापतील/थरथरतील).
छतांवर चढून आकाशाकडे पाहात भुंकतील.
१२) पाण्यात आणि धुळीत पक्षी आंघोळ करतील तर लवकर पाऊस येतो.
१३) सर्प गवताच्या गंजीवर चढतील तर शीघ्र वृष्टि जाणावी.

कृषि पराशर सघो वृष्टि लक्षणम् अध्याय १३.
१४) मुंग्या जेव्हा आपली अंडी तोंडात घेऊन भिंतीवर (वर) चढतात तेंव्हा पाऊस निश्चित पडतो.
१५) बेडूक टर्र टर्र आवाज करतील तर निश्चित पाऊस पडतो. इकडे-तिकडे पळतात तेव्हा निश्चित पाऊस पडतो.
१६) मांजरी, मुंगुस, साप आणि बिळात राहणारे इतर प्राणी तसेच फुलपाखरे घाबरून इकडे तिकडे पळतात तेव्हा निश्चित पाऊस पडतो.
१७) मुले खेळतांना रस्त्यात, मार्गात मातीचा पूल बनवितात, मोर नाचतात, तेव्हा पाऊस निश्चित पडतो.
१८) दुषित वायुच्या आघाताने जेंव्हा मानवाच्या शरीराला त्रास होतो (अंग दुखू लागते)
१९) साप झाडाच्या शेंडयावर चढतील तर तात्काळ पाऊस पडतो.
२०) जलचर पक्षी जेंव्हा आपले पंख प्रकाशात सुकवतांना दिसतील, रातकिडे आकाशात आवाज करतील,
(डासांचा आवाज होईंल) तर ते पावसाचे लक्षण समजावे.

वनमाला ग्रंथाधारे (ले. जीवनाथ)
२१) सर्व दिशा आणि आकाश स्वच्छ असून – पिण्याच्या पाण्याची चव बदलेली असेल (पाणी मचूळ लागते) मिठाच्या खडयांना
(विकृती मुळे) पाणी सुटते,विरघळते. आकाश गाईच्या डोळयांच्या रंगाप्रमाणे किंवा कावळयाच्या अंडयाप्रमाणे निळसर दिसू लागेल, तर त्या दिवशी पाऊस पडतो.
२२) मासे पृथ्वीवर येण्यासाठी उडया मारतात, बेडूक आवाज करतात, बिळात राहणारे जीव बाहेर पडतात तेंव्हा पाऊस पडतो.
२३) पावसाळयाच्या दिवसात मांजरी नखांनी जमीन (भूमी) जोर – जोराने खोदतील, उकरतील तर पाऊस पडतो.
२४) मुले रस्त्यात, मार्गात गल्लीत मातीत पूल बांधतील.
२५) मुले खेळतांना ऐकमेकांवर बसून घोडेस्वाराचा खेळ खेळतील.
२६) लोखंडाच्या वस्तूंना गंज चढतो. त्या गंजाचा वास कच्च्या मांसासारखा येतो.
२७) डोगंर काळे दिसतात व डोगंराच्या घळईत धुके (बाष्पयुक्त) दिसते. असे दिसते तेव्हा पाऊस पडतो. वरील सर्व लक्षणे पाऊस पडण्याचे संकेत आहेत.
२८) मुंग्या अंडे कारणाशिवाय नेतांना दिसतील.
सर्प झाडांच्या शेंडयावर चढतील किंवा साप मैथून करतांना दिसतील तर पाऊस चांगला समाधानकारक होईल असे जाणावे.
२९) पावसाळयाच्या दिवसात जर चिमण्या धुलीस्नान करतील, मोर नाचतील, आकाशांत कोकीळ ओरडण्याचा आवाज येईल तर निश्चित पाऊस पडतो.
३०) फुलांनी बहरलेली वेल फुलांच्या वजनाने न झुकता आकाशाकडे जाते (ताठ दिसते) असे असतां सर्वत्र पाऊस सुरू होतो.

मेघमाला ईश्वर पार्वति संवाद पृ १२९ कावळयाच्या घरटयावरून वृष्टिज्ञान
३१) झाडाच्या पूर्व दिशेकडील फांदीवर कावळयाचे घरटे असेल तर ” सुभिक्ष” समाधानकारक, उत्तम पाऊस पडतो. धान्य उत्पत्ती चांगली होते.
३२) वृक्षाच्या अग्नेय दिशेस असणा-या फांदीवर कावळयाचे घरटे असेल तर दुष्काळ पडतो. ढग पाऊस पाडत नाहीत.
३३) झाडाच्या दक्षिणेकडील फांदीवर कावळयाचे घरटे असेल तर भंयकर हाहा:कार होऊन देशात विग्रह निर्माण होतो. (बंडाळी होते)
३४) नैऋत्य दिशेकडील फांदीवर कावळयाचे घरटे असेल तर दोन महिने पाऊस पडत नाही. नंतर ओस, धुके पडते (पाला पडता है)
३५) वृक्षाच्या पश्चिमेकडील फांदीवर कावळयाचे घरटे असल्यास पाऊस पडत नाही.
३६) वायव्ये कडील फांदीवर कावळयाचे घरटे असल्यास वा-यासह पाऊस पडतो.
३७) उत्तरेकडील फांदीवर चांगले घरटे कावळयाने बनविल्यास सुभिक्ष, आरोग्य, सुखसंपदा असते.
३८) ईशान्य दिशेकडील कावळयाचे घरटे स्वाति नक्षत्राती पाऊस निर्देशीत करतो. सुख समृध्दी होते.
३९) झाडाच्या मध्यभागी जर कावळयाचे घरटे असेल तर पाऊस पडत नाही.
४०) वारूळाच्या आश्रयाने झाडाच्या बुध्यांजवळ जर कावळयाचे घरटे असेल तर महामारी सारखे साथीचे रोग, चोरांचा सुळसुळाट, पाऊस पडत नाही, दुष्काळ पडतो.
४१) वाळलेल्या झाडावर कावळयाचे घरटे असल्यास महामारी, चोरांचे भय, राज्य विग्रह होतो.
४२) कावळयाच्या घरटयात १ अंडे असतां उत्तम पाऊस पडतो.
-२ अंडे असतां मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो.
-३ अंडे असतां क्षेम व ४ असतां व्याधि उत्पन्न होतात.
-पण हेच २-२ अंडे अलग अलग असतील तर चांगला पाऊस पडतो. एकत्रित असतां अशुभ जाणावे.
४३) चन्द्रोदयाचे वेळी कावळा मैथुन करील तर पाऊस पडेल. ऊन्हाचे वेळी मैथुन करतील तर अग्निभय निर्माण होते.

कादम्बिनी दिव्य निमित्ताध्याय (अंतरिक्ष पध्दती) पृ. २२२
पावसा संबंधी प्रश्न कुंडली विचार –
१) पावसाळयात – जलराशीचे लग्न (४,८,१२) लग्नात वरूण नक्षत्र (जल नक्षत्र) उदीत असतांना, लग्नावर शुभ ग्रहांची दृष्टी असतां किंवा केन्द्रातील चन्द्र, शुक्रावर शुभग्रहांची दृष्टी असतां शीघ्र वृष्टि होते.
२) प्रश्न लग्नी जल राशीत चन्द्र असेल तर खूप पाऊस पडतो. जर प्रश्न लग्नी शनि, बुध चन्द्र असतील तर गारांचा पाऊस पडतो.
जलनक्षत्रे – हस्त, चित्रा, स्वाति, मूळ, पू.षाढा श्रवण, पूर्वा भाद्र, रेवति, भरणी.
३) तिन्ही उत्तरा आणि रोहिणी – आहेत.प्रश्न लग्नी मंगळ असतां खूप विजा चमकतात, आणि घनघोर गर्जनेसह खूप पाऊस पडतो.
४४) ग्रहयोगांसाठी ग्रहयोगाध्याय पहा संदर्भ ”ऋतुज्योतिष” आकाशात ढग असतांना मोर आनंदाने नाचतांना दिसतील तर पाऊस लवकर पडतो.
४५) माठात ठेवलेले पाणी कोंबट होईल, सर्व वेलींची तोंडे (अंकूर) वर होतील, कुंकुमा सारखा लाल रंग दिशांना दिसेल, पक्षी आंघोळी करत असतील, गिधाडे संध्याकाळी ओरडत असतील. सात दिवस आकाशात मेघाच्छादित राहील, रात्री काजवे चमकतील व हे काजवे पाण्याकडे, पाण्याजवळ पांथळ जागेवर उडत असतील तर ही सर्व पावसाची लक्षणे आहेत.
४६) मुंग्या कारण विरहीत अडचणी व्यतिरिक्त एखाद्या उंच ठिकाणाकडे अंडे घेऊन जातांना दिसतील तर ती पावसाची पूर्व सुचना आहे.
४७) झाडावर साप चढणे, सर्प मैथुन, गाईचे कुदणे (उडया मारणे) चन्द्राची सावली दिसणे ही पुढे होणा-या पावसाची लक्षणे आहेत.
४८) शेणात किडे होणे, (गांडूळ इ.) अत्यंत गरमी होणे, चातक पक्षी सूर्याकडे टक लावून पाहाणे हे पाऊस लवकर सूरू होण्याची लक्षणे आहेत.
४९) डोंगर धुरकट दिसतात, चामडे ओलसर होते, ताक जास्त आंबट होते हे शीघ्र वृष्टि लक्षण होय.
५०) पाणी मचूळ होणे, मासे जमिनीकडे येण्यासाठी उडया मारणे, बेडूक मोठयाने ओरडू लागतील तर शीघ्र वृष्टि होते.
५१) मांजरी नखांनी जमीन खूप खणू लागतील.
५२) लोखंडाला गंज चढेल व त्याचा वाईट वास येईल तर शीघ्र पाऊस पडतो.
५३) पर्वत व डोंगर काळे दिसतील. घळईतुन धुके दिसेल, दरीतून वाफा निघत आहे असे वाटले तर शीघ्रवृष्टि होते.
५४) सरडे झाडाच्या शेंडयावर चढून जर सूर्याकडे पाहात असतील, गाई सूर्याकडे पहात असतील तर शीघ्र पाऊस पडतो.
५५) पशु (गाय, बैल) आणि कुत्रे आपले कान, पंजे, खुरे सारखे हलवितात (कापरे सुटते) गोठयाच्या किंवा घराच्या बाहेर जात नाही, शीघ्र वृष्टि होते.
५६) घराच्या छतावर चढून कुत्रे भुंकतात, आकाशाकडे साशंक नजरेने पहातात शीघ्र पाऊस येण्याचे लक्षण समजावे.
५७) बगळे जर पंख पसरून इतस्तत: बसलेले असतील तर ३-४ तासात पाऊस पडतो.
५८) चिमण्या मातीत अंघोळ करतात (धुलीस्नान) टिटवी पाण्यात अंघोळ करते.
५९) साप झाडावर चढून फुत्कारतात- आवाज करतात, बेडूक जोरात ओरडतात, चातक पक्षी ओरडतात.
६०) चातक पक्षी ओरडतात, मोर नाचतात, हे शीघ्र वृष्टि लक्षण समजावे.
६१) माठात (मातीच्या भांडयात) लोणी, आफू, गूळ यांना पाणी सुटेल, पघळतील तर वृष्टि होते.
६२) बकरी वा-याच्या दिशेने तोंड करून उभी राहील, लहान लहान साप झाडावर चढतील तर शीघ्र वृष्टि होते.
६३) दाढी, मिशा ओलसर होतील, चमकदार – नरम होतील, प्राणी उष्णतेने व्याकूळ होतील, माणसात आळस, ढिलाई, झोप येणे ही लक्षणे शीघ्र पावसाची जाणावी.
६४) शेणात किडे पडतात. मुंग्यांच्या पंखाचा आवाज होतो. सरडयाचा रंग बदलतो असे होत असतांना आवश्यक पाऊस पडतो.
६५) जर चातक पक्षी, मोर, आणि कोल्हे रडू लागतील, मध्यरात्री कोंबडे आरवतील तर शीघ्र पाऊस पडतो.
६६) खूप माशा उडू लागल्या, भुंगे सारखे उडू लागतील, आणि शेणाचे लहान लहान गोळे घेऊन उडताना दिसतील तर निश्चित पाऊस पडतो.
६७) काशाच्या भांडयाला गंज चढू लागला, जलचर प्राणी व्याकूळ होतील, गटारातील किंवा नालीतील पाणी गरम होईल..
६८) थोरांच्या पानांना (ब्रम्हकमळाच्या पानांना) जागोजागी अंकूर फुटतील तर त्याला पाऊस आणणा-या वा-याचे बोलावणे समजतात.(बोलणारे -निरोप- समजतात)
६९) जर झाडे वेली, झुडपे, त्यांची पाने छिद्र विरहीत, स्नेग्ध अशी दिसतील तर चहूबाजूंनी दोषरहित पाऊस आणणारे वारे वाहतात.
७०) पित्त प्रकृतीचा मनुष्य गाढ झोपत असेल, तर पाऊस आणणारा वारा वाहतो.
७१) वातपित्त प्रधान व्यक्तीचे डोके भणभण करत असेल तर वृष्टिकारक वारा वाहतो.
७२) कागदावर शाई पसरू लागली, प्रयत्न करूनही वाळत नसेल तर वृष्टिकारक वा-याचे लक्षण समजावे. कल्शाचे भांडे चमकू लागते, जलचर प्राणी विहार करतांना दिसतात, गटारातील पाणी थंड होते, तेव्हा पाऊस पडत नाही.

संकलन – सुधाकर रघुनाथ जोशी देवळाली, नाशिक

सदर लेखाचे इंग्लिश रुपांतर वाचण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा