दर चार वर्षांनी येणारा – २९ फेब्रुवारी

आज २९ फेब्रुवारी, म्हणजे दर चार वर्षांनी  एकदा येणारा लीप दिवस. सूर्याभोवती पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी लागणार काळ म्हणजे आपले एक वर्ष. हे ३६५ दिवस असं आपण म्हणत असलो तरी प्रत्यक्षात हा वेळ आहे ३६५ दिवस, पाच तास, ४८ मिनिटे, ४५ सेकंद. हे अतिरिक्त साधारण ६ तास चार वर्षात २४ तास म्हणजे एका  दिवसाएवढे झाल्याने दर  चार वर्षांनी हा अधिकचा  एक दिवस घेऊन समायोजन केले जाते.

ज्या वर्ष संख्येला ४ ने  निःशेष भाग जातो त्या वर्षात असा अधिक दिन घेत त्याला  लीप वर्ष म्हटले जाते. वर्ष २०२४ हे असेच लीप वर्ष. वर्ष संख्येतील शेवटचे दोन आकडे ०० असे असतील(१००, ९००, १९००) तर ते वर्ष लीप वर्ष घेतले जात नाही. पण  अशा वर्षाच्या शेवटून तिसऱ्या व चौथ्या आकड्यांनी होणारी संख्या चारने पूर्णतः भागता आली(४००, ८००, १२००, १६००, २०००) तर ते वर्ष लीप वर्ष असते.

तरी प्रश्न उरतो कि हा लीप दिवस वर्षाच्या शेवटी किंवा सुरवातीला न जोडता फेब्रुवारीतच का ? इतर महिन्यांना ३०/३१ दिवस असताना फेब्रुवारी ला मात्र २८ दिवस का ? याच उत्तर कॅलेंडरच्या इतिहासात आहे. रोमचा संस्थापक  सम्राट रोमलसच्या काळातील प्रारंभिक रोमन कॅलेंडर ३०४ दिवसांचे होते .प्राचीन रोमनांची १० आकड्यावर श्रद्धा असल्याने वर्षात  मार्टियस, एप्रिलिस, मायस, ज्युनिअस, क्विंटिलिस, सेक्स्टिलिस, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे  दहा महिने होते. वसंत ऋतूत सुरु  होणारे वर्ष डिसेंबर मध्ये संपून पुढचे कडाक्याच्या थंडीचे ६१ दिवस  चक्क सोडून दिले जात असत.

इ.स.पूर्व ७१५ मध्ये राज्यावर आलेल्या नुमा पॉम्पिलियस याने या कॅलेंडर  मध्ये सुधारणा केली.  प्रत्येकी २८ दिवसांचे फेब्रुवरी आणि जानेवारी ह्या दोन महिन्यांची भर घातली. कॅलेंडर चांद्रवर्षा इतके म्हणजे ३५४ दिवसांचे झाले.पण रोमन  संस्कृतीमध्ये सम संख्या अशुभ आणि विषम संख्या शुभ मानीत असत. यामुळे  शेवटचा महिना जानेवारीमध्ये एक अतिरिक्त दिवस जोडत वर्ष ३५५ दिवसांचे झाले.आता जानेवारी २९ दिवसांचा  झाला पण फेब्रुवारी २८ दिवसांचा राहिला.

रोमन कॅलेंडर मधल्या कमी दिवसांमुळे महिने आणि ऋतू यांच्यातील साहचर्य गडबडले.
इ.स.पूर्व ४५० च्या सुमारास  डेसिमव्हीरी  या दहा सदस्यांच्या मंडळाने कॅलेंडर मध्ये पुन्हा सुधारणा केली. महिन्यांचा क्रम बदलत जानेवारी नंतर फेब्रुवरी महिन्याला स्थान दिले गेले. १०-११ दिवसांची तफावत भरून काढण्यासाठी अधिक महिन्याची (Mercedonius ) कल्पना मांडण्यात आली. फेब्रुवारी हा वर्षाचा शेवटचा महिना असल्याने त्यातील शेवटचे ५ दिवस वेगळे काढून त्यात आणखी २२/२३ दिवस जोडून अधिक महिना जोडला गेला .परिणामी  एका वर्षातील सरासरी दिवस ३६६. २५  होत कॅलेंडर  आता सांपातिक  वर्षाच्या जवळपास गेले.

पुढे  रोमन साम्राज्यात राज्यसत्ते ऐवजी प्रतिनिधी मंडळाकडे राज्याचा  कारभार आला.इसपु १५८ पासून प्रतिनिधी मंडळाने सत्ताग्रहण करण्याचा दिवस  १ जानेवारी हा वर्षाचा आरंभदिन मानला जाऊ लागला.परिणामी जानेवारी हा पहिला तर फेब्रुवारी हा दुसरा महिना झाला. अधिक महिना घेण्याचे , वर्ष आरंभ घोषित करण्याचे अधिकार सर्वोच्च धर्माधिकारी(Pontifex Maximus) याना होते.धर्मगुरू आणि अमीर -उमरावांच्या हातात हे अधिकार जात त्यांच्या सोयीने अधिक महिना जोडला जात असे. कालगणना हे राजकीय हत्यार बनत रोमन कॅलेंडर मध्ये अनेक दोष साठत गेले.

कालमापनातील हे मानवी हस्तक्षेप कमी करत ऋतुचक्राशी सतत जुळत राहणाऱ्या कॅलेंडरची गरज तीव्रतेने भासू लागली. इ.स.पूर्व ४६ मध्ये यादवी युद्धात विजयी होऊन सत्तेवर आलेल्या ज्युलियस सीझरने ही गरज पूर्ण करत कॅलेंडर मध्ये आमूलाग्र बदल केले. जानेवारी, सेक्स्टिलिस आणि डिसेंबरमध्ये दोन तर एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये एक अतिरिक्त दिवस जोडण्यात येऊन  वर्ष सरासरी  ३६५.२५  दिवसांचे झाले. फेब्रुवारीत बदल न झाल्याने तो २८ दिवसांचा राहिला. सीझरने खगोलशास्त्रज्ञ सोसिजेनेस यांच्या मदतीने लीप वर्ष प्रणाली सुरू केली.दर चार वर्षांनी फेब्रुवारीत एक अधिक दिवस घेत सांपातिक वर्षाशी सांगड कायम राहिली.आतापर्यंत साठलेल्या दिवसांची भरपाई करण्यासाठी इ.स.पूर्व ४६ हे  वर्ष ४४५ दिवसांचे केले  गेले. पण हे अतिरिक्त-दीर्घ वर्ष “गोंधळाचे शेवटचे वर्ष” ठरले .१ जानेवारी इ.स.पूर्व ४५ पासून सुधारित ज्युलियन  कॅलेंडर सुरु झाले. जनतेला धर्माधिकारांच्या मर्जीने अवलंबून अस्थिर  कॅलेंडर ऐवजी खगोलशास्त्रावर आधारित स्थिर कॅलेंडर मिळाले.

ज्युलियस सीझरच्या मृत्य नंतर  लीप वर्ष ठरवण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी चुकीने चार ऐवजी दर तीन वर्षांनी लीप वर्ष घ्यायला सुरवात केल्याने ज्युलियन  कॅलेंडर पुन्हा गडबडले. सम्राट ऑगस्टसने यात सुधारणा करत चार ने भाग जाणाऱ्या वर्षाला लीप वर्ष मानण्याची प्रथा सुरु केली.

ज्युलियन कॅलेंडरचे वर्षमान ३६५.२५ दिवस होते. ऋतुचक्राचा संबंध असणाऱ्या सांपातिक वर्षाचे दिवस ३६५.२४२२ असतात. दोघातील ०.००७८ दिवसांचा फरक शुल्लक वाटत असला तरी  त्याचा परिणाम साठत जाऊन १६व्या शतकापर्यंत ज्युलियन वर्ष आणि  सांपातिक वर्षातीळ फरक तब्बल १० दिवसांचा झाला. परिणामी  पुन्हा एकदा  कॅलेंडर सुधारणेची गरज भासू लागली. यावेळी हि भूमिका तत्कालीन पोप  १३वे  ग्रेगरी यांनी पार पाडली. त्यांच्या आदेशाने १५८२ साली गुरुवार ४ ऑक्टोबर नंतर पुढचा दिवस ५ ऑक्टोबर न घेता त्याला १५ ऑक्टोबर  मानले गेले. यामुळे १० दिवसांची पडलेली तफावत दूर झाली. लीप वर्ष मानण्याचे  नियम बदलण्यात आले.दर चौथे वर्ष लीप असताना  १०० ने भागले जाणारे वर्ष लीप मानले जात नाही .  पण ४०० ने भागले जात असल्यास ते लीप मानावे असा नियम करण्यात आला.

ह्या सुधारणा कॅथलिक पोपकडून झालेल्या असल्याने ख्रिश्चन धर्माचे वेगळे पंथ मानणाऱ्या देशांकडून त्यांना मान्यता मिळायला बराच  वेळ लागला.प्रॉटेस्टंट पंथीय ब्रिटनने हा बदल १७५२ साली स्वीकारला तर ऑर्थोडॉक्स चर्च मानणार्‍या रशियामध्ये ही सुधारणा मान्य  व्हायला १९१८ साल उजाडावे लागले. आणि अखेर व्यावहारिक उपयोगासाठी  ग्रेगोरियन कॅलेंडर जगमान्य ठरले. आज आपण वापरतो ते हेच  कॅलेंडर.

आज  दर चार वर्षांनी येणाऱ्या २९ फेब्रुवारीचे स्वागत करताना हा इतिहास नक्की आठवायला हवा !!! लीप दिनाच्या शुभेच्छा !!!

विनय मधुकर जोशी
vinayjoshi23@gmail.com