वरील शीर्षक वाचून कदाचित आश्चर्य किंवा हे विधान चुकीचे आहे अशीच भावना होणे शक्य आहे. वेद काळापासून म्हणजे साधारणत: इ.स.४५०० वर्षापासून हया विधानाचा पाठ पुरावा आचार्य ऋषिमुनि, ज्योतिर्विद, खगोलशास्त्रज्ञ यांनी केलेला आहे. ब्रम्हावैवर्त पुराणांत श्री.कृष्ण जन्माध्याय एकवीसावा (सा.वा.ना.संदर्भ…..संस्कृतग्रंथावली) खालील संदर्भ आहे.
सूर्यग्रस्तं च नीरच्च काले तस्मात् समुद्रभव: ।
सूर्या मेघादय: सर्वे विधाता ते निरूपिता: ।।
जलाढकानां सरयानां तृणानाच्च निरूपितम् ।
अवदेsब्देsस्त्येव तत् सर्वं युगे युगे ।।
सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होऊन ढग बनतात व पाऊस पडतो ही निसर्गक्रिया ऋषिमुनिंना माहित होती व ती वर्षानुवर्षे युगानुयुगे चालू राहणार आहे असे सांगतांना ढग, पिके, गवतासारखे तृण यांच्या उत्पत्तीचा सखोल विचार केलेला आढळतो. त्यासाठी कालगणना व कालगणनेनुसार कालानुरूप ऋतु परिवर्तनाचे संकेत सांगितलेले आहे. पुरातन, चिरपरीचीत, बीनखर्चिक पण कष्टपूर्वक परिश्रमाने घेतलेले निरीक्षण नोंद करून न ठेवल्यानेच आज अनेक शेतक-यांना आत्महत्या करण्याची वेळ येत आहे.
वर्ष-अयन-ऋतु-मास-पक्ष-तिथी-प्रहर-घटि-पले-विपले असे सुक्ष्मतेकडे जाणारे, स्थूलातून सुक्ष्मतम शोधणारे ऋषिमुनि तर आपण मात्र भौतिक सुखाच्या मागे धावणारे, केवळ अंधानुकरण करण्याची सवय असलेले २५० वर्षे गुलामगिरीत घालविलेले, यंत्रावर विश्वास ठेऊन स्वत:चा आत्मा गमावून बसलो आहोत. ऋतुपरिवर्तनाचे संकेत ४ प्रकारांनी अनुभवास येतात.
रासायनिक क्रिया
१) रासायनिक क्रिया निसर्गात घडतात. उदा.पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाणी मचुळ होते, चव बदलते.
२) लोखंडी खांबांना (वस्तुंना) गंज चढतो व कच्च्या मांसा सारखा वास येतो.
३) मिठाच्या खडयांना पाणी सुटते
४) ताक आबंट होते.
भौम पध्दती
पशु,पक्षी,किडे यांच्या दैनंदिन जीवनात बदल पडतो हे बदल पावसाळयाची सुचना देतात (पहा- भौम पध्दति – संलग्न)
आंतरीक्ष पध्दती
आकाशातील ढग, वारा, वीजा चमकणे, गडगडाट, इन्द्रधनुष्य, चन्द्र सूर्यास पडणारे खळे (पहा -अंतरिक्ष पध्दती-संलग्न )
दिव्य/गणितीय पध्दती अर्थात ग्रहगणित पध्दती :
ग्रहगणितीय पध्दती – ग्रहांच्या उदय, अस्त व परस्परातील योग नक्षत्र विचार, नक्षत्रावरून नाडी, मंडळ विचार, नक्षत्रानुसार वाहन विचार, प्रत्येक वर्षाचा राजा, प्रधान मंत्री इ.काढण्याच्या गणितीय पध्दती आहेत त्यानुसार पर्जन्याअनुमान काढता येते.
ह्यावरून हेच सिध्द होते की आम्ही भूवासी ह्या निर्सगाच्या हातातील एक छोटेसे बाहूले आहोत व ह्या बाहूल्याला आपले जीवन जगण्यास व त्यासाठी पर्जन्य जाणून घेणे ह्यासाठी निर्सगाची कास धरणे गरजेचे आहे आणि हेच तत्व आकाशाशी जडले नाते हे सिध्द करते.
आता उत्तरार्धात पौष महिना अशुभ का? ते पाहू
विश्वाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत दिवस व रात्री ही नियमीत होतात. ह्या दिवस रात्रीची गणना करण्यासाठी ज्योतिर्विदांनी खगोल शास्त्रज्ञांनी अहर्गण साधन केले. त्यातून वर्ष, महिने, दिवस, घटि-पले (तास/मिनिटे) मोजली हे मोजत असतांना लक्षात आले की, काही दिवस जास्त तासांचे व रात्री लहान असतात तर काही दिवस लहान व रात्री मोठया असतात.
खगोलाच्या अध्ययनात लक्षात येते की प्रत्येक ग्रह सूर्यमालिकेत आपआपल्या लंबवर्तुळाकार मार्गाने एकाच गतीने फिरत असतो ह्यात बुध, शुक्रसारखे अंतर्वर्ती ग्रह आहेत तर मंगळ, गुरू, शनिसारखे बहिर्वर्ती ग्रह आहेत. ह्या सर्वांची गती मोजण्यासाठी आरंभ स्थान म्हणून क्षितीजावर असलेल्या अश्विनी नक्षत्रापासून केली जाते. महाभारत काळात ही गणना कृतिका नक्षत्रापासून होत असावी कारण तसा उल्लेख महाभारतात आढळतो. (आकृती १ व २ पहा)
पृथ्वीचा भ्रमणमार्ग
पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने फिरते. सूर्य s हया बिंदूवर आहे. वर्तुळाकार मार्गावरून फिरतांना ग्रह समान वेळेत समानक्षेत्र आक्रमण करतात ह्या केप्लरच्या सिध्दांतानुसार पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास १ वर्ष लागते पृथ्वी आपल्या भ्रमणमार्गावरून जात असतांना पृथ्वीची दिशा सूर्यावरून पाहिल्यास प्रत्येक क्षणाला बदलतांना दिसेल,त्यामुळे कोनीय गती सारखी नसेल आपण पृथ्वीवरून निरीक्षण करतो म्हणून पृथ्वीच्या संदर्भात सूर्य प्रत्येक क्षणाला गती बदलत पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने जातांना दिसतो.
c हा पृथ्वीचा मध्यबिंदु आहे. पृथ्वीच्या संदर्भाने हा लंबवर्तुळाकार परीघ सूर्याचा भासमान भ्रमण मार्ग ठरतो व त्या मार्गावरील a,e,f,b,g,a हया सूर्याच्या स्थिती पृथ्वीच्या पूर्वी निर्देशीत A,E,F,B,G,A स्थितीशी समान असतील (आ.३) ह्यावरूनच सूर्य एक वर्षात १ फेरी पूर्ण करतो असे अनुभवास येते व ह्या सूर्याच्या पाठीमागे अनंत नक्षत्र तारे असल्याचे दिसते ह्यालाच भूगोलातील क्षितीजीय वर्तुळ म्हणतात (ecliptic-great circle)
ज्या लंबवर्तुळाकृती कक्षेशी भूकक्षेचा (ecliptic-great circle) लंबवर्तुळाच्या कक्षेचा छेद u आणि v ह्या ठिकाणी होतो. (आकृती ५ पहा) c हा भुगोलातील क्षितीजीय लंबवर्तुळाचा मध्य बिंदु आहे. क्षितीजीय लंबवर्तुळाचा मध्यबिंदु आहे. ह्या भुगोलाचा विषुवृत्तीय अक्ष आणि उत्तरधृव p काढलेला आहे. पृथ्वीचा २३ १/२ अंश कललेला अक्ष व भूप्रदक्षिणा कक्षा अशी दाखविलेली आहे. भूमध्यापासून आपण निरीक्षण करीत आहोत असे मानले तर मध्यातून घेतलेले वेध हे ग्रहांचे निश्चित स्थळ,सूर्य भ्रमणमार्गावर आरोपीस करून आकृती ५ बघितल्यास परिणामत: तीनही लंबवर्तुळाकृती गोलांचा मध्य c बिंदुतूनच जातो. (ही निरीक्षणे विषुनवृत्ता वरून घेतलेली असावी) ही परिस्थिती सूर्य ज्यावेळी अश्विन आंरभ बिंदूपासून २४० अंश ते २७० अंश असतो त्या कालखंडात म्हणजेच पौष महिन्यात असते, म्हणून पराशर मुनिनी सुत्र तयार करून
सार्थ दिनव्दयामानम् कृत्वा पौषादिंनाम् बुध:।
गणयेत् मासिकी वृष्टी अवृष्टीम् वनिलक्रमात्।। (कृषिपराशर अ.३)
असे सांगितले कारण वृष्टी मूला: कृषि सर्वा वृष्टीमूलाच्च जीवनम्।
तत्समात् आदौ प्रयत्नेन वृष्टीज्ञानम् समाचरेत्।।
पुढे येणा-या पावसाचे,अनावृष्टीचे ज्ञान ६-७ महिने आधी व्हावे हा उद्देश. आता ह्या सूत्रानुसार पौष शु ।।१।। २० डिसेंबरला सूर्यास्तानंतर १९.३१ वा.सुरू होतो.२.५ दिवसाचा १ महिना म्हणजेच ६० तासात =३० दिवस अर्थात २ तासांचा १ दिवस.ह्यातील पहिला तास दिवस व दुसरा तास रात्र समजावी असा संकेत आहे.
आपल्या महाराष्ट्रात पाऊस ज्येष्ठ महिन्यात सुरू होतो, म्हणजेच पौष कृ.।।१।। पासूनची निरीक्षणे (दि.४ जानेवारी २००७ ते १६ जानेवारी २००७)पावसाळा व नंतरचे काही दिवस आपल्याला पाऊस कसा,केव्हा,किती पडेल हे सांगतो.कोणत्या दिवशी पाऊस पडणार नाही हे जाणून घेता येईल.
पावसाची प्रश्नकुंडली
अन्नम् प्राणा: अन्नम् बलम अन्नम् सर्वार्थ साधनम्।
देवाsसुर मनुषाच्च सर्वे अन्नोप जीविन:।।
…तस्मात् आदौ प्रयत्नेन वृष्टिज्ञानम् समाचरेत् – कृ.प.
समुद्र चक्र
१) मेष संक्रतीला असलेले नक्षत्र प्रथम समजून समुद्रात दोन नक्षत्रे लिहावीत, १ तटावर १ संधी १ शृंग व १ संधी ह्याप्रमाणे २८ नक्षत्रे लिहून चक्रपुर्ण करावे. ह्यात रोहिणी नक्षत्र जेथे असेल त्याप्रमाणे पाऊस पडतो.
समुद्रात नक्षत्र आल्यास अतिवृष्टि होते तटावर असल्यास अवर्षण संधी किंवा शृंगावर नक्षत्र आल्यास खंड वृष्टि होते असे पूर्वाचार्यांचे मत आहे. शनी व चन्द्र स्थित नक्षत्रे शृंगावर असतां पाऊस पडतो तसेच रवि व मंगळाचेही जाणावे.
२) कृतिका नक्षत्रापासून आंरभ करून क्रमश: समुद्रात दोन तटावर एक संधीत १ शृंग १ संधी १ व पुन्हा ह्याच प्रमाणे सव्य मार्गाने २८ नक्षत्रे लिहावीत. विचाराधीन दिवस नक्षत्र जेथे असेल त्यावरून पर्जन्यानुमान सांगावे.
३) सूर्य ज्या नक्षत्रात असेल त्या नक्षत्रापासून सुरूवात करून २८ नक्षत्रे सव्य मार्गाने पूर्ण करणे ह्यात
४ समुद्र = ८ नक्षत्र , ४ तट ,८ संधी व ४ शृंग असे २८ नक्षत्रे लिहावी.
रविचे नक्षत्र समुद्रात आहे. त्यावरून दिवस नक्षत्र कोठे येते ते तपासले व त्या वरून अंदाज वर्तविता येतो. ह्या तीनही पध्दतीत ८०% बरोबर येतात. काही का चुकतात कारण मिळालेले नाही.
सप्त नाडी चक्र
ह्या ७ नाडी आहेत. १) चण्डा २) वायु ३) दहना ४) सौम्या ५) नीरा ६) जाण आणि ७) अमृता. पहिल्या ३ अशुभ आणि शेवटच्या ३ शुभ. मधली सौम्या नाडी मध्यम फलदायी आहे. ह्या नाडीचे स्वामी क्रमश: शनि, सूर्य, मंगळ, गुरू, शुक्र, बुध आणि चन्द्र असे आहेत.
ग्रह ज्या नाडीत असतात त्याप्रमाणे पावसाचे फलीत देतात. नाडी चक्रात जास्तीत जास्त ग्रह ज्या नाडीत असतील त्याप्रमाणे पर्जन्याचे अनुमान करावे. ३,४,५, ग्रह शुभ नाडीत असता, शुक्र तीन किंवा ५ दिवस पडतो. नीरा नाडीत क्रुर ग्रह असतां अनावृष्टि होते. चंद्र, रवि,गुरू शुभ नाडीत असता भरपूर पाऊस पडतो. मंगळ एकटा ज्या नाडीत असेल त्या नाडीप्रमाणे फल देतो.
मंडल
ज्याप्रमाणे नाडीवरून आकाशस्थ ग्रहांची स्थिती (राशी नक्षत्र, नवांश ३०) कळते त्याचप्रमाणे मंडलावरून वायुमंडल, आद्रर्ता, तापमान, प्रभावित क्षेत्र असल्याचे पूर्वांचर्यांना ज्ञात होते व ह्या वायु, आर्द्रता तापमानाचा उपयोग पर्जन्य जाणून घेण्यासाठी त्यांनी केलेला आहे हे अनुभवास येते.
पूर्वी धार्मिक विधींना फार महत्व होते म्हणून कोणतेही धार्मिक विधी पौषात न करता, तस्मात्, आदौ, प्रयत्नेन ३ वेळा जोर देऊन निरीक्षण करावी असा आदेश दिला व पौष अशुभ घोषित केला. वास्तविक पौषात सूर्य एक राशी चालतो,चंन्द्र १२ राशीतून भ्रमण करतो,७ वारांचाच आठवडा असतो. ३० तिथी असता,२७ नक्षत्रे करण,योग सुध्दा इतर महिन्यासारखेच असतात. खगोलीय ज्योतिष शास्त्राप्रमाणे पौष महिन्यात अशुभ काहीही नसून केवळ समाजाचे भले व्हावे शेतक-यांना आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये, समाजाया धार्मिक भावनांना तडा जाऊ नये म्हणून धर्माच्या धर्मरक्षकांनी प्रवर्तकांनी पौष अशुभ घोषित केला व अहोरात्र,अष्टौप्रहर वा-याचे सूक्ष्म निरीक्षण करा. धार्मिक विधीत गुंतून राहू नका, नोंदी ठेवा व पाऊस केव्हा पडेल,केव्हा पडणार नाही हे जाणून घ्या.
सर्वत्र: सुखिन: संतु सर्वे सन्तु निरामय:।
सर्वेभद्राणी पश्यन्तु माकश्चित् दु:खमाप्नुयात।।
संदर्भ
१. सुलभ ज्यो.शास्त्र लेखक सोमण….पृ १०८
२. ओरायन् लो.टिळक पृ.२००
३. Spherical Astronomy by W.N.Smart Chapter 2, Artical 25, Page 38 to 40
कृषिपराशर, कादंम्बिनी, बृहत्संहिता व वनमाला ह्या ग्रंथाचाही संदर्भ आहे. हे विचार वरील संदर्भ ग्रंथानुसार आहेत.
संकलन – सुधाकर रघुनाथ जोशी देवळाली, नाशिक
सदर लेखाचे इंग्लिश रुपांतर वाचण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा