पावसाच्या आगमना बरोबरच बाजारात अनेक ध्वनीफिती पाऊस ह्या संकल्पनेवर दाखल होतात. ह्या भाऊगर्दीत सागरिका अकॉस्ट्रॉनिक्स ह्या कंपनीची ‘पाऊस’ ही ध्वनीफित आपले वेगळेपण जपणारी व निश्चितच ऐकण्याजोगी. पाऊस हा थेट हृदयाशी नाते सांगणारा, जणू तुम्हा आम्हा सर्वांचा सोबती. आपल्या वेगवेगळया मूडस्चा पाऊस हा साक्षीदार असतो. पाऊस ध्वनीफिती मधली आठ गाणी सुध्दा वेगवेगळया मूडस्ची. प्रत्येक गाण्याची रचना आणि संगीताचा बाज नुसताच भिन्न भिन्न नाही तर लक्षात यावा इतका परस्परांपासून वेगळा आहे.
पारंपारिक तसेच आधुनिक साज देऊन गाणी श्रवणीय झाली आहेत. अवधूत गुप्ते ह्याच्या आवाजातलं ‘पावसा ये रे पावसा’ हे गीत तरुणांना नक्कीच भावणारं. वैशाली सामंत तसेच अवधूत गुप्ते ह्या दोघांच ‘सोनेरी उन्हात हिरव्या रानात’ हे पारंपारिक बाज असणार द्वंद्वगीत निश्चितच ठेका धरायला लावणारं. साजणाला साद घालणारे ‘अंगणी माझ्या मनाच्या’ हे शब्द वैशालीने खटयाळ शैलीत श्रवणीय केले आहेत. ह्या गीतांबरोबरच ‘असा पाऊस मनमानी’, ‘पावसाची सरसर’, ‘रिमझिम श्रावण’, ‘उनाड पाऊस’, ‘जा घनांनो जा’ ही पारंपारिक तसेच अधुनिक सुरावटींची गाणी लक्षात राहण्याजोगी झाली आहेत.
गीतकार चंद्रशेखर सानेकर यांची शब्दरचना वैशाली आणि अवधूतने प्रत्येक गीतांचा मूडस् सांभाळत आपल्यापर्यंत पोहचवली आहे. मराठी संगीत क्षेत्रातलं एक गुणी कलावंत म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं त्या वैशाली सामंतने ‘अंगणी माझ्या, पावसाची सरसर आणि सोनेरी ऊन्हात’ ह्या गीतांद्वारे तिच्यामधील वैविध्य सिध्द केले आहे.
अवधूत गुप्ते ह्या उभरत्या कलाकाराने ‘पावसा येरे पावसा’ तसेच ‘पाऊस मनमानी’ ह्या भिन्न प्रकृतीच्या गाण्यांना सहजतेनं आणि आत्मविश्वासाने पेलले आहे. संगीत दिग्दर्शक म्हणूनही त्याने ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. लय, शब्द, ताल-सूर आणि गायकी अशा सर्वांगांनी परिपूर्ण अशी ही ध्वनिफित आपल्या संग्रही निश्चितच असायला हवी. भविष्यातही ‘सागरिका’ लय, शब्द, ताल-सूर आणि गायकी ह्या सर्वांगांनी परिपूर्ण आणि श्रवणीय ध्वनिफिती मराठी रसिकांसाठी बाजारात आणतील ही अपेक्षा.
पाऊस | |||
गायक – वैशाली सामंत व अवधूत गुप्ते संगीत – अवधूत गुप्ते गीतकार – चंद्रशेखर सानेकर संगीत संयोजक – निलेश मोहरिर व अवधूत गुप्ते रिदम– अतुर जोशी बासरी – अश्विन |
|||
पहिली बाजू | दुसरी बाजू | ||
१. पावसा ये रे पावसा
दे जिवाला दे भरवसा
धीर नाही रं फारसा
अंबराचा तुझा देश सोडून ये |
१. रिमझिम श्रावण, रिमझिम श्रावण
रिमझिम श्रावण, रिमझिम श्रावण
मोहरलेली हिरवी कांती
आनंदाच्या या सोहळयाला
पाऊस हा सोनार कसबी
धरती अपुले रूप न्याहाळे |
||
२. अंगणी माझ्या मनाच्या
अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले
अशा चिंब ओल्या क्षणी
गार वारा मन भरारा |
२. सोनेरी उन्हाती उन्हात, हिरव्या रानात
सोनेरी उन्हाती उन्हात,
हवेत हलतो,
इथून तिथून वेगाने येई तो करीत चाल
विराट पाऊस अफाट पाऊस
उदार होवून |
||
३. असा पाऊस मनमानी
असा पाऊस मनमानी
झाडाझाडांना झिंजाडे
रंग आभाळाचा करडा |
३. उनाड पाऊस, अशांत पाऊस
उनाड पाऊस, अशांत पाऊस
हाक तृषेची येता कानी
अमृतमय जलधारा पाऊस
पहाड, राने, नदी, सरोवर, |
||
४. पावसाची सरसर
पावसाची सरसर
धीर तिला नाही साधा
कुणाच्या गं विरहाने |
४. जा घनांनो जा
तृप्तीचा फुलवीत पिसारा
तहानलेल्या तप्त जिवाला
नवल फुलले नवसृजनाचे |