पावसाचा अभ्यास पुराणकाळापासून आपल्या ऋषीमूनींनी करुन ठेवलेला आहे. ग्रंथांनुसार पाऊस म्हणजे (पा)ण्यापासून (उ)त्पन्न झालेला (स)र्वत्र पडणारा तो पाऊस. पाऊस म्हणजेच वर्षा. वर्षातून एकदाच सुरू होणारी आणि घडणारी घटना. सूर्य रोहिणी नक्षत्रांत असता पावसाळा सुरू होतो आणि स्वाती नक्षत्रातून गेला की पावसाळा संपतो. सूर्य १२ राशीतून भ्रमण करून पुन्हा रोहिणी नक्षत्रात येण्यास १२ महिने लागतात आणि पावसाळा सुरू होतो. म्हणूनच आपण मुलांना शिकवतांना हिवाळा, उन्हाळा आणि मग ‘नेमेचि येतो पावसाळा’ असे शिकवतो. ‘नेमेचि’ म्हणजेच नियमित पाऊस सुरू होण्यास सूर्याची नियमित गती कारणीभूत असते.
वराहमिहीर बृहत् संहितेत अध्याय २१, श्लोक ७ मध्ये म्हणतात, “तत्पश्चात् मेघ: प्रसवति” . पावसाला आपण पर्जन्यही म्हणतो. पर म्हणजे अन्य किंवा दुसरा. जन्य म्हणजे जन्मलेला. दुस-या ठिकाणी जन्मलेला तो पर्जन्य.
पाऊस हा उदभिज-उदकापासून जन्मलेला. निसर्गचक्रानुसार समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन आकाशात जाते. ८-१० मैल उंच गेलेली ही वाफ ओबडधोबड आकार घेते. अब्जावधी कण एकत्र येउन ढग बनतात व हे ढग वा-याबरोबर एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात. भूपृष्ठावरील कमी दाबाच्या पट्टयावरून जातांना जमिनीकडे ओढले जातात व पाऊस पडतो. म्हणजेच ‘मेघ: प्रसवति’. प्रसवासाठी गर्भकाल अनिवार्य ठरतो. हा मेघगर्भ कालावधी गणिताने काढता येतो. बृहत संहिता अध्याय २१ श्लोक ७ नुसार
यन्नक्षत्रमुपगतेगर्भश्चन्द्रे भवेत्सचंद्रवशात् ।
पंचनवते दिन शते तत्रैव प्रसवं आयाति।।
अर्थ – ज्या नक्षत्री चंद्र प्राप्त होऊन, जो गर्भ होतो तो १९५ दिवसांनंतर त्याच नक्षत्रास चंद्र येइल तेव्हा प्रसूती पावतो.
पावसाचा प्रसव म्हणजेच पावसाळ्यातला पावसाचा अनुमान पूर्वी भौम पध्दती आणि आंतरिक्ष पध्दतीने काढला जायचा. पशु, पक्षी, किडे यांच्या दैनंदिन जीवनात बदल घडतो. हे बदल पावसाळयाची सुचना देतात, तसेच आकाशातील ढग, वारा, विजा चमकणे, गडगडाट, इन्द्रधनुष्य, चन्द्र आणि सूर्यास पडणारे खळे तसेच पौष महिन्यात वाहणा-या वा-यांवरुनही पावसाचे अनुमान काढता येतात. ह्या विषयीचे अत्यंत अभ्यासपूर्ण लेख आपल्याला http://www.marathiworld.com/paaus येथे वाचायला मिळतात.
भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि आसपासच्या देशात पावसाला ‘मान्सून’ (Monsoon) हा शब्द इंग्रजीत प्रथम वापरला गेला. मान्सून हा इंग्रजी शब्द, मूळ अरेबिक शब्द ‘मौसिम’ आणि मलय भाषेत ‘मुसिम’ ह्या शब्दापासून आला. ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ ‘ऋतू’ .
‘हायड्रॉलॉजी’ च्या शास्त्रानुसार ह्या विशिष्ट मोसमात सातत्याने पाऊस पडणा-या पावसास मान्सूनचा पाऊस म्हणतात. अरबी समूद्र आणि लोएस (Loess) पठारावरुन वाहणा-या वा-यांच्या संशोधनावरुन भूगर्भशास्त्र नुसार मान्सूनचा पाऊस आठ कोटी (million) वर्षांपासून पडतो आहे.
भारताचे हवामान मुख्यता मान्सून वा-यांवर अवलंबून आहे. मान्सूनचे वारे अतिशय प्रचंड जोराने वाहणारे असले तरी ऋतूनुसार आपली दिशा ठरवतात. हे वारे थंड प्रदेशातून उष्ण प्रदेशाकडे वाहतात. थंड हवा गरम हवेपेक्षा अधिक जागा व्यापते. त्यामुळे मान्सून वारे थंडीत जमिनीकडून समुद्राकडे तसेच उन्हाळ्यात समुद्राकडून जमिनीकडे वाहतात.
भारतातली थंडीतले वातावरण उष्ण आणि कोरडे असते. मान्सून वारे ईशान्याकडून वाहतांना आपल्या सोबत थोडासा ओलावाही घेतात. हिमालयामुळे थंड हवा आपल्या खंडात येण्यास मज्जाव होतो आणि त्यामुळे हवामान उष्ण रहाते. भारत कर्कवृत्त आणि विषुववृत्त मध्ये येत असल्यामुळे सूर्याची किरणे सरळ जमिनीवर पडतात त्यामुळे थंडीमध्येही तापमान ११० फॅरेनाईट पर्यंत वाढू शकते. उन्हाळी मान्सूनचे वारे भारतात आग्नेय दिशेने येतात. हे वारे हिंद महासागर मधून आद्रता घेऊन येतात व जून ते सप्टेंवर जोरदार पाऊस पडतो.
मान्सूनचे वारे कधी कधी इतके रौद्र रुप धारण करतात त्याने येणा-या वादळी पावसामुळे माणसांचे भरपूर नुकसान होते. परंतु इतके होऊनही भारतातल्या बळीराजासाठी, वीज निर्मितीसाठी आणि एकूण आर्थिक गणितांसाठी मान्सूनचा पाऊस अत्यावश्यक आहे. तुलनेने पाकिस्तान आपल्यापेक्षा कोरडा प्रदेश आहे. उन्हाळी मान्सूनचे वारे हिंद महासागर मधून आद्रता घेऊन येतात परंतु पाकिस्तान समूद्राच्या उत्तरेला असल्यामुळे खूपच कमी पाऊस पडतो. त्यातही थारचे वाळवंट भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर असल्यामुळे हा पाऊस अधिकच कमी होतो. ह्या विषयी आपल्या अधिक विस्तृत माहिती – http://en.wikipedia.org/wiki/Monsoon, http://www.mrdowling.com/612-monsoon.html ह्या लिंक्सवर छायाचित्रांसह वाचायला मिळते.
आधुनिक काळानुसार पावसासंबंधी अनेक नवीन तंत्रज्ञान व संशोधने विकसीत झाली आहेत. भारतात विशेष हवामान खाते त्यासाठी कार्यरत आहे. ह्या खात्याची दिल्ली, मुंबई, नागपूर, चेन्नई, गुवाहाटी व कोलकत्ता येथे मुख्य कार्यालये आहेत.
http://www.imd.gov.in/ ही हवामान खात्याची साईट अत्यंत माहितीपूर्ण आणि उपयुक्त आहे. येथील बहुतेक मजकूर तक्ते आणि चित्रांद्वारे दाखविण्यात आल्यामुळे समजायला अतिशय सोपा आहे. रोजचे हवामान, पावसाचा अंदाज, चक्रीवादळे, भूकंपाविषयी विस्तृत माहिती, भविष्यातील अंदाज दिले आहेत. काही संभाव्य धोके असल्यास त्याविषयीही साईटवर सुचना दिल्या जातात. त्यांच्या इतर विशेष प्रकल्पांविषयीची माहिती आपल्याला वाचता येते. प्रत्येक सामान्य नागरिकाला उपयुक्त अशी ही साईट आहे. पुढील साईटसवरही आपल्याला पावसाच्या अंदाजासाठी लॉगाइन करायला हरकत नाही – www.mapsofindia.com/maps/india/southwestmonsoon.htm, http://www.monsoondata.org/wx
पाण्याच्या टंचाईचा दिवस अवघ्या पृथ्वी करीता दूर नाही. त्यासाठी पावसाचे जमा करुन, साठवण करुन त्याचा पुर्नवापर करणे शहापणाचे ठरु शकेल. पूर्वी पासून आपल्याकडे गुहेतल्या जलकुंडा मधून पावसाच्या पाण्याची साठवण केली जायची. आता भारतात शेतीसाठी आणि शहरातही अनेक ठिकाणी ‘ रेन हारव्हेस्टिंग’ प्रकल्प आमलात आणले जात आहेत. भारतात वर्षाला शंभर तासांचा पाऊस पडतो. आपण त्याला साठवून ८६६० तास वापरु शकतो. तांत्रिक माहितीसाठी en.wikipedia.org/wiki/Rainwater_harvesting, http://www.rainwaterharvesting.org ह्या साईट्स उपयुक्त आहेत.
पावसाळा तरुणांसाठी स्टाईल स्टेटमेंट असतो. मागच्या पिढयांमध्ये पावसाळयात चिकचिक असते म्हणून फक्त नायलॉनचे मळखाऊ आणि गडद रंगाचे कपडे वापरले जायचे. त्यामुळे पावसाळयात राहणीमानात एक प्रकारचा गबाळेपणा यायचा. बदलत्या ट्रेंडनुसार अगदी कपडयांपासून पासून रेनकोटपर्यंत सारे काही ब्राण्डेड आणि डिसाईनरवेअर असते. मळखाऊ रंगाचे कपडे केंव्हा मागे पडून फ्रेश आणि पेस्टल शेडचे कपडे वापरायची फॅशन सध्या ‘इन’ आहे. निळा, जांभळा, हिरवा, आणि अगदी पांढ-या रंगाचे कपडेही पावसाळ्याचे आकर्षण आहेत. ओली झाल्यास वाळायला त्रासदायक असल्यामुळे जीन्सपॅंटपेक्षा केप्रीज, शॉट स्कर्ट, डंग्रीज, कार्गो पॅंट तसेच ट्रेंडी फूटवेअरला तरुणाईची विशेष पसंती आहे. लेदर आणि कापडी बॅग्ज वापरण्यापेक्षा प्लॅस्टिक किंवा वॉटरप्रुफ बॅग्ज विविध आकार आणि डिसाईन्स मध्ये उपलब्ध आहेत. काळ्या छत्रीनेही केंव्हाच कात टाकली असून वयोगटाप्रमाणे विविध डिसाईन्स, छ्त्रीचे आकार आणि रंग बाजारात आले आहेत. पावसाळ्यात वॉटरफ्रुफ मेकअपला आणि छोटया केसांना अधिक पसंती असते.
पावसाचा आनंद घेत गरमागरम भजी आणि कडक चहा पिण्याचा आनंद काही औरच आहे. हा आनंद सवंगडयांबरोबर वाटून घेण्यासाठी पावसाच्या शुभेच्छा ई-ग्रिटींग्स आणि एसएमएस द्वारा पाठवल्या जातात. ह्या शुभेच्छा मराठीतूनही पाठवायची सोय आहे. त्यासाठी www.123greetings.com , www.bluemountain.com ह्या साईट्सला भेट द्यायला हवी.
नेटवर आपल्याला पावसाचे अप्रतिम फोटो आणि व्हिडीओजही पाहायला मिळतात. त्यासाठी http://specials.rediff.com/news/2008/jun/13slide.htm, http://www.flickr.com/photos/tags/rain , ह्या काही साईट्सना लॉगाइन करा.
पावसाळा म्हणजे कवितांचा काळ. मराठी तरुणांच्या ब्लॉग्ज आणि स्क्रॅप्सवर मराठीतून पावसाच्या अत्यंत तरल आणि भावपूर्ण कविता वाचायला मिळतात. “तुझा हळवा पाऊस आठवतो मला, चिंब सरींनी तयाच्या भिजवतो आज मला … ” , “बालपणीच्या आठवणी घेऊन पाऊस येतो, पाण्यातल्या होड्या नि गाणी तो गातो… ” , “मेघकीनार चंदेरी कशी खुले या नभात, कुणी काजळ भरले मला सांगा या मेघात”… अश्या अनेक कविता आपल्याला विविध ब्लॉग्जवर वाचता येतात. इतर देशातल्या तरुणांच्या अनेक कविता आपल्याला इंग्रजीत वाचायला मिळतात. एका ब्लॉगवरचा इंडोनेशियन कवि म्हणतो :
Let it rain, let it rain
I am feeling the coolness
The freedom through this rain
Let it rain, let it rain
I am running free
For once let me be happy
There is no more pain
It dissolves in the rain.