उंब्रज येथे १ (स्थापना शके १५७१)


समर्थ स्थापीत ११ मारुती

Umbraj Maruti समर्थ रामदासस्वामी चाफळहून रोज उब्रंज येथे स्नानाला जात, म्हणून येथील मारूतीची स्थापना झाली असावी. मंदिराच्या जवळ कृष्णा नदीचा घाट आहे. कृष्णा नदीत स्नान करायचे व मग हया मारूतीच्या मूर्तीची पूजा करायची असा समर्थांचा नित्यक्रम असे. हया मूर्तीची स्थापना शके १५७१ मध्ये झाली. हया मूर्तीच्या स्थापनेनंतर समर्थांनी सतत तेरा दिवस कीर्तन केले व नंतर त्यांना शिराळे येथील देशपांडे घेऊन गेले असा ‘विश्रामधामात’ उल्लेख आहे.

समर्थांना शके १५७० मध्ये उंब्रजमध्ये काही जमीन इनाम म्हणून मिळाली होती. त्यामुळे त्यांनी येथे मारूती मंदिर व त्यापाठोपाठ मठही स्थापन केला. उंब्रज हे मसूरच्या पश्चिमेस चार मैलांवर आहे. उंब्रज व मसूर यांच्यामधून कृष्णा नदी वाहते. पुणे बंगलोर महामार्ग उंब्रजमधून जातो.

येथील मारूतींचे देऊळ पूर्वाभिमुख आहे. देवळाचा परिसर आकर्षक वाटत नसला तरी मूर्ती चांगली आहे. हा मारूती समर्थांच्या अकरा मारूतीत सर्वात वयाने लहान, ‘ बालमारूती ‘ वाटतो. हया मूर्तीला चांदीचे डोळे आहेत. हया मूर्तीची उंची सुमारे ६ फूट आहे. ही मूर्ती चुना, वाळू व ताग हया विभागापासून बनविलेली आहे. हया मारूतीला ‘ उंब्रजचा मारूती ‘ किंवा ‘मठातील मारूती ‘ अशी नावे आहेत. हया मंदिराला कळस नाही. मंदिराच्या नावाचा फलक नाही. मंदिर चांगले आहे. परंतु मंदिराचा प्रवेश उत्तरेकडून आहे. हया मंदिराच्या संबंधात दोन आख्यायिका आहेत. पहिली अख्यायिका अशी की एके दिवशी स्नान करीत असताना समर्थ ‘बुडालो, बुडालो’ असे ओरडले. प्रवाहात खालच्या बाजूस स्नान करीत असलेल्या शिष्यमंडळीची गडबड उडाली. शिष्यमंडळी मदतीला येण्यापूर्वीच मारूतीरायांनी खडकावरून नदीच्या पात्रात उडी मारली व समर्थांना बाहेर काढले. ‘श्रीरामांनी तुझा सांभाळ करण्याची मला आज्ञा केली आहे’ असे समर्थांना मारूतीराय म्हणाले. खडकावरून जेथून मारूतीरायांनी उडी मारली तेथे मारूतिरायांचे पाऊल उमटलेले आहे. सध्या मात्र ते वाळूखाली बुजले आहे.

दुसरी अख्यायिका अशी आहे की एक ब्राम्हण समर्थाचा शिष्य बनून त्यांच्याबरोबर राहात होता. त्याला वाटले होते की आपल्याला मठात आरामात राहायला मिळेल. परंतु समर्थ त्याला आपल्याबरोबर जेव्हा जिकडे तिकडे हिंडवू लागले तेव्हा तो कंटाळला व समर्थांना सोडून तुकारामबुवांकडे आला. तो तुकारामबुवांकडे अनुग्रह मागू लागला. तेव्हा तुकारामबुवांनी पूर्वी कोणाचा अनुग्रह घेतला होता काय अशी चौकशी केली. त्याने आपण समर्थांचा अनुग्रह घेतला होता पण तो सोडून आलो आहोत असे तुकारामबुवांना सांगितले. तुकारामबुवा म्हणाले,’ समर्थाकडे जा व त्यांचा अनुग्रह परत करून ये.’ तो ब्राम्हण समर्थाकडे गेला व अनुग्रह परत घेण्याची त्यांना विनंती करू लागला. समर्थांनी त्याला सांगितले, ‘पाण्याची एक चूळ भरून व अनुग्रहाचा मंत्र म्हणून त्या समोरच्या खडकावर टाक, म्हणजे अनुग्रह परत केल्यासारखे होईल.’ त्या ब्राम्हणाने चूळ भरून खडकावर टाकली तेव्हा तेथे रामाच्या त्रयोदशाक्षरी मंत्राची ‘श्रीराम जयराम जय जय राम ‘ ही अक्षरे उमटली. त्याच क्षणी त्या ब्राम्हणाची वाचाही गेली. तो अत्यंत दु:खी होऊन पुन्हा तुकारामबुवांकडे आला. तेव्हा त्याची दया येऊन तुकारामबुवा त्याला घेऊन समर्थांकडे आले व त्याची वाचा परत करण्याविषयी त्यांनी समर्थांकडे रदबदली केली. तेव्हा समर्थांनी त्या ब्राम्हणाला सांगितले, ‘खडकावर उमटलेली ती त्रयोदशाक्षरी मंत्राची अक्षरे चाट, म्हणजे तुझी गलेली वाचा परत येईल.’ त्या ब्राम्हणाने तसे केल्याबरोबर त्याची वाचा त्याला परत मिळाली.

हनुमानाचे पाऊल आणि खडकावर उमटलेला त्रयोदशाक्षरी मंत्र हया दोहोंच्या खुणा अजून तेथे आहेत. मात्र सध्या पात्रात बरीच वाळू वाहून आलेली असल्यामुळे त्या वाळूखाली बुजल्या गेल्या आहेत. त्या दोहोंपैकी एक खूण रामकडयाखाली होती व दुसरी खूण येथील आद्य मठपती केशवस्वामी यांच्या समाधीसमोर होती. येथे केशवस्वामीची पुण्यतिथी सर्वपित्री अमावस्येस साजरी केली जाते. चैत्र शुध्द १५ हया दिवशी हनुमान जयंतीचा उत्सव मोठया थाटात साजरा केला जातो. हनूमानजयंतीच्या आदल्या दिवशी ‘ सांप्रदायिक भिक्षे’ चा कार्यक्रम होतो. येथील मठपती हनुमानजयंतीच्या उत्सवाच्या दिवशी अन्नदानाचीही व्यवस्था करतात.

संदर्भग्रंथ – समर्थ स्थापित अकरा मारुती
(लेखक – पु. वि. हर्षे)