श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग


Trimbakeshwarसह्याद्रीच्या पूर्व पायथ्याशी असणारे हे तीर्थक्षेत्र नाशिक पासून २९ कि. मी. वर आहे. त्र्यंबकेश्वराचे मंदीर हे श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी १७५५ ते १७८६ च्या दरम्यान बांधले. त्याकाळी हे मंदीर बांधण्यासाठी १६ लाख रूपये खर्च आला, आणि साधारणत: ३१ वर्षे मंदिराचे बांधकाम सुरू होते. चार प्रवेशद्वारे असलेल्या, फरसबंदी घातलेल्या एका भव्य आवारामधे ते दिमाखाने उभे आहे. उत्तरेच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असून पश्चिम प्रवेशाजवळ (साठवणीची) कोठी आहे. मंदिराच्या महाद्वारा समोरच मोठी दीपमाळ आहे. प्रवेशानजिकच असलेल्या, सुबक कोरीव काम केलेल्या खाबांच्या घुमटामधे महानंदी विराजमान झाले आहेत. गर्भगृहासमोर चौसोपी मंडप आहे.

या मंदिरातील शिवलिंगाचे वैशिष्टय म्हणजे हे शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाते तसेच या लिंगाच्या शीर्षामधे सुपारीएवढया आकाराची तीन लिंगे आहेत. ही लिंगे, ब्रह्मा, विष्णु आणि शिव, म्हणजे, विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या शक्तींची प्रतिके आहेत. ही लिंगे स्वयंभू असून पवित्र गंगा त्यांना अभिषेक करताना दिसते. हे पंचमुखी आराध्य दैवत इथे दिवसातून तीन वेळा पूजिले जाते. मुघलांकडून मिळवलेला पाचू-हिरे जडित मुकूट भाऊसाहेब पेशवे यांनी श्रीं चे चरणी अर्पण केला आहे. हा मुकूट मोघलांनी म्हैसूरच्या राजाकडून बळकावला होता. रुद्र, रुद्री, लघुरुद्र, महारुद्र किंवा अतिरुद्र यांचे पठन करुन त्र्यंबकेश्वरीचा हा शिव पूजला जातो. रुद्राक्षाला धार्मिक महत्व असून भगवान शिवाच्या गळयात रुद्राक्षांची माळ असते. रूद्राक्ष हे फळ असून त्याची झाडे त्र्यंबकेश्वर येथे आढळतात.

Trimbakeshwar Jyotirling त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक उत्सव
१) सिंहस्थ कुंभमेळा : सर्वसाधारणपणे १२ वर्षांतून एकदा, जेंव्हा गुरू हा ग्रह सिंहराशीमधे, (लिओ) असतो.
२) गोदावरी दिन : माघ (फेब्रुवारी) महिन्यातील शुध्द पक्षातील तेजस्वी चंद्रप्रकाशाचे, पहिले बारा दिवस.
३) निवृत्तीनाथ उत्सव : पौष मासातील तीन दिवस, सर्वसाधारणपणे, जानेवारीमधे हा उत्सव येतो.
४) त्र्यंबकश्वरची रथयात्रा : कार्तिक पौर्णिमेस, म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमेस येणारी यात्रा.
५) महाशिवरात्री : माघ कृष्ण त्रयोदशीस. साधारणपणे मार्च महिन्यात येते.

Trimbakeshwar Kushavarta त्र्यंबकेश्वरला कसे जाल?
हवाईमार्ग – जवळचे विमानतळ नाशिक. ३९ कि.मी.
रेल्वेमार्ग – जवळचे रेल्वेस्थानक नाशिकरोड, मध्यरेल्वे पासून ४० कि.मी. अंतरावर.
बसमार्ग – मुंबई- त्र्यंबकेश्वर १८० कि.मी, पुणे – त्र्यंबकेश्वर २०० कि.मी
नाशिक-त्र्यंबकेश्वर २९ कि.मी.
नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून नाशिक-त्र्यंबकेश्वर अशा एस. टी. महामंडळाच्या गाडया दर अर्ध्या तासाने चालू असतात.

त्र्यंबकेश्वर हे नाशिकरोड रेल्वे स्टेशनपासून ४० कि.मी अंतरावर आहे. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बस व टॅक्सी उपलब्ध असतात. तेथे सोयी सुविधांनी युक्त अशा धर्मशाळा मिळतात. तसेच तेथील क्षेत्रोपाध्याय आवश्यकतेनुसार रहाण्याची व खाण्याची सोय करतात.

http://www.trimbakeshwartrust.com