मंदिरे/तीर्थक्षेत्रे


येवतेश्वर व कास तलाव

मराठी माणूस तसा भाविक. गणेशस्थाने, अष्टविनायक, दत्तांची स्थाने, पंढरी, शिर्डी इ. जागा बारा महिने जाण्यासाठी लोकप्रिय. परंतु शंकराची मंदिरे बव्हंशी वेगळया भौगोलीक स्थानावर, अनगड जागेवर, उपेक्षित, शांत आणि भयाण. खिद्रापूरचं कोपेश्वर, साता-याजवळचं पाटेश्वर, पाचवडजवळचं मेरूलिंग, रतनवाडीचं अमृतेश्वर… एक ना दोन. शंकराची लोकप्रिय पर्यटनस्थाने म्हणजे, घृष्णेश्वर, भीमाशंकर वगैरे.

सातारा शहरातून अदमासे ५-६ किमी. वर असंच एक शांत स्थान आहे… येवतेश्वर! इथे येण्यासाठी बस-रिक्षाची मुबलक सोय साता-याहून आहे. साता-याहून हे ठिकाण अदमासे पाच किमी. वर आहे. पावसाळयाच्या दिवसात शुध्द हवा, उत्तम रस्ता आणि थंडगार डोंगरमाथा हा संगम अवर्णनीय असतो. मंदिरापर्यंत वाहन जात असल्याने चांगली सोय होते.

येवतेश्वर मंदिर शांत जागेवर असून प्रवेशद्वारापासून थोडेसे खाली उतरावे लागते. गाभारा नेहमीच्या शंकराच्या मंदिरासारखाच धीरगंभीर असून चहुकडे मजबूत भिंतीची तटबंदी आहे. प्रदक्षिणा घालताना मागील बाजूस एक मोठी बांधीव विहिर दिसते. सध्या मंदिराकडे कोणाचे फारसे लक्ष नसल्याने विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नसावे. चहुकडे झाडी माजलेली दिसते. पण एक प्रकारची गूढ शांतता आसमंतात किणकिणत असते. येवतेश्वरावर ब-यापैकी झाडी असल्याने थंडावा नेहमीच जमून असतो. येथून जरंडेश्वर, अजिंक्यतारा, मेरूलिंगाचा डोंगर इ. रांगा स्पष्ट दिसतात.

येवतेश्वराला डावीकडे वळण्याऐवजी तसेच सरळ गेलात की, अंदाजे १८-२० किमी. वर आपण एका मोठया तलावाशी येऊन पोहोचतो. हाच तो बहुचर्चित कास तलाव. येवतेश्वर ते कास हा रस्ता म्हणजे, अपरिमित आनंदाचा ठेवा. अनेक प्रकारची आणि रंगीबेरंगी (बेरंगी नाहीच!) फुलपाखरे, पावसाचे पाणी आकंठ पिऊन तृप्ततेने डवरलेले वृक्ष, असंख्य नवनवी झुडुपे आणि अत्यंत आल्हाददायक वातावरण. पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर हे घाटावरचे जिल्हे पावसाळयात नेहमीच असा रूबाब धारण करून असतात. या सर्वांच्या जोडला भारद्वाज, कोकीळ, बुलबुल, खंडया, बंडया, कोतवाल, रॉबिन, दयाळ असे अनेक पक्षी चिमणी-कावळयांच्या संख्येने आपली साथ देत असतात.

Kaastalav कासकडे जाताना सज्जनगड, उरमोडी नदीचा प्रवाह आणि त्याचे अडवलेले पाणी, (उरमोडी प्रकल्प) यांचे दृश्य केवळ अप्रतिम! कास तलाव इंग्रजांच्या काळात बांधण्यात आला असून तलावाजवळ कास गाव आहे. भरपूर मोठया असलेल्या या तलावाच्या आजूबाजूला चांगली झाडी आहे. कोतवाल, दयाळ, बुलबुल, रॉबिन असे अनेक पक्षी, कधीतरी उंच झाडाच्या शेंडयावर पंख वाळवत बसलेला पाणकावळा दिसतो. अचानक कधीतरी जोरात सूर मारून चोचीत मासा पकडून पुन्हा झाडावर बसतो. ही कृती तासन् तास पाहायला मनाला अतिव समाधान लाभतं.

तलावाच्या बाजूनेच रस्ता येत असल्याने एखाद्या शांत जागेवर वहान थांबवून ओलंकंच्च वातावरण अनुभवावं, बरोबरच्या चहा-फराळाचा यथेच्छ समाचार घ्यावा, बाजूच्या झाडीतली रंगीबेरंगी फुलपाखरं पहावीत… पर्यटन ह्याला म्हणतात… असं माझं स्पष्ट मत आहे. उन्हाळयात मात्र तलावाच्या आजूबालूला रखरखीत जमीन, पाणी कमी झालेलं असा काहीसा नजारा पाहायला मिळतो.

कास तलाव व येवतेश्वर ही सहल खरं तर पावसाळयात अर्ध्या किंवा एक दिवसाचीच आहे. परंतु या सहलीने मिळणारं समाधान वर्षभर नव्या जोमाने काम करण्यास आपल्याला उभारी देऊन जाते, हे मात्र नि:संशय!

– प्रसाद टिळक

नरसिंहवाडी

Narsinghwadi पुरातन काळी इथे घनदाट जंगल होते. नरसिंह सरस्वती स्वामी हे भगवान दत्ताच्या १६ व्या अवतारांमधील एक. कुरूंदवाड ही त्यांच्या तपश्चर्येची जागा. इ. सन १०३४ ते १९८२ या दीर्घ कालावधीमधे, रामचंद्र योगी, नारायण स्वामी, मौनी महाराज, टेंबे स्वामी, महादबा पाटील या तपस्वी जनांच्या समाधी ‘वाडी’ येथे बांधल्या गेल्या. हया ठिकाणी कृष्णा-पंचगंगेच्या संगमावरती असलेल्या मंदिरास ५०० ते ६०० वर्षांची परंपरा लाभली आहे.

नित्य उपासनेमधे सोन्याचा मुकुट मूर्तीला घालून, पाने ग्रहण करण्याचा विधी असलेली, रोज पहाटे होणारी ‘महापूजा’ पाहण्यासारखी असते. चातुर्मास वगळता रोज रात्री देवाच्या पालखीची मिरवणूक निघते. हया मिरवणूकीच्या पूर्वी निरनिराळया मंत्रांचे उच्चारण होते, तेंव्हाचे मंगल, धार्मिक वातावरण प्रभावशाली असते.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या ‘भक्त मंडळा’मार्फत, हया मंदिराची सर्व व्यवस्था ठेवली जाते. दत्त संप्रदायाच्या वस्तूंची दुकाने तसेच मिठाईची दुकाने नरसिंहवाडीला आहेत. पैठण प्रमाणेच या ठिकाणचा घाट देखील संत एकनाथांनी बांधून घेतला. कान्यगत अवसर असताना, तसेच प्रत्येक पौर्णिमेस इथे जत्रा भरते. हे ठिकाण कोल्हापूरपासून, ४० किमी. वर आहे. आदिलशहा भाविक होता, व त्याने अनेक भू-भाग दान केल्याविषयी माहिती इथे सापडते. दरवर्षी १० लाख भाविक या जागेस भेट देतात. इथे ग्राम पंचायत असून, दळणवळणाची सुविधा आहे.