भीमाशंकर मंदिर, ता. खेड, जि. पूणे


Bhimashankarभीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे भीमाशंकर. भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे. या ज्योतिलिंर्गामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे. निर्सगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे.

हेमाडपंती पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे. हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही. मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही. शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत, पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोध्दार केला होता. सभामंडपाशेजारी दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केलेल्या आहेत. आधुनिक कॅमेरे लावून परिसरावर लक्ष ठेवण्यात येते. तसेच मोठा टिव्हीवर थेट गाभा-यातील शिवशंकराचे दर्शन घडते. गर्दी नसल्याने मनसोक्त शंकराचे दर्शन घडले.

भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू, म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.

अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे.
येथील इतर प्रेक्षणीय स्थळे.
गुप्त भीमाशंकर – भीमानदीचे मूळ उगम ज्योतिलिंर्गात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूवेर्ला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.

कोकण कडा – भीमाशंकर मंदिराजवळच पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारणपणे ११०० मीटर इतकी आहे. येथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबीसमुद्रही दिसू शकतो.

सीतारामबाबा आश्रम – कोकणकड्यापासून एक रस्ता या आश्रमाकडे जातो. घनदाट जंगलात हे ठिकाण आहे. गाडीने या ठिकाणी पोहोचता येते

नागफणी – आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून १२३० मीटर इतकी आहे. कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे.

– भरत घोटेकर

काशी विश्वेश्वर मंदिर

करवीर माहात्म्याच्या संरचनेच्या आधीपासून हे मंदिर उभे आहे. महालक्ष्मी मंदिराच्या उत्तरेस, ‘घाटी दरवाज्या’च्या परिसरात ते आहे. काशी विश्वेश्वर म्हणजेच लिंग प्रतिमेतील शिव होय. अगस्ती ऋषी, लोपामुद्रा, राजा प्रह्लाद, राजा इंद्रसेन, यांनी या मंदिरास भेट दिली असल्याचा उल्लेख ‘करवीर माहात्म्या’मधे सापडतो. या मंदिराच्या बांधणीच्या आधी त्या जागेवर ‘काशी’ आणि ‘मन कर्णिका’ ही दोन पावन कुंडे होती. त्यापैकी ‘मन कर्णिके’तील पाणी आता आटले असून, महापालिकेने त्यावर १९६२ सालामधे ‘महालक्ष्मी उद्दयान’ उभे केले. काशी कुंडाची सद्यस्थिती अतिशय दयनीय आहे. मंदिराचा गाभार हा १० चौरस फूट आहे. बाहेरील लहान मंडपात ध्यान-धारणेसाठी एक गुहा असून, ती फार पुरातन आहे, असे म्हटले जाते. प्रवेशद्वारापाशी गणपती, तुळशी इ. देवतांच्या मूर्ती आहेत. या देवळाच्या लगतच जोतिबाचे छोटेखानी देऊळ आहे. हे मंदिर, इसवी सनाच्या ६ व्या ते ७ व्या शतकामधे बांधले असावे. राजा गंध्वाधिक्षाने या मंदिराचा विस्तार केला. घाटी दरवाजा, कार्तिक स्वामी, नवग्रह मंदिर, शेषवर्मा, इ. याच कालावधीशी नाते सांगतात.