लेख १ | असे पुस्तक असलेच पाहिजे | लेख ७ | टी.व्ही.वरचा सुंदर कौटुंबिक कार्यक्रम |
लेख २ | फळांची तोड - एक रम्य अनुभव | लेख ८ | सुपरमार्केट शॉपिंग गाईड |
लेख ३ | बॅकपॅकर्स | लेख ९ | न्युझीलँड मधील ’सॅंटा परेड’ मिरवणुक |
लेख ४ | गराज सेल - एक उपयुक्त संकल्पना | लेख १० | धार्मिक स्थळ |
लेख ५ | रस्ते कसे ओलांडाल? | लेख ११ | वृक्षवल्ली |
लेख ६ | वाचाल तर वाचाल | लेख १२ | कृती करूया |
श्रावण संपता संपता गणपती-गौरी येणार याकडे डोळे लागलेले असतात. पुण्या-मुंबईसारख्या शहरातून सार्वजनिक गणपतीसाठी कार्यकर्त्यांची धावपळ, तर कलाकारांची सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी धावपळ. पोलीस व म्युनिसिपल कार्पोरेशनचे कार्यकर्ते यांच्यावर सुरक्षितता आणि विसर्जनाच्या मिरवणुकीचे भले मोठे ओझे असते. मिरवणुकीचे नियंत्रण, ती वेळेवर संपविणे, रहदारीची कमीतकमी अडचण होऊ देणे असले प्रश्न वारंवार चर्चिले जाऊन प्रयत्नांना थोडेफार यश येऊ घातले आहे. या सगळया पार्श्वभूमीवर ऑकलँडमधे अनुभवलेली प्रचंड मिरवणुक, त्याचे व्यवस्थापन, शिस्त इत्यादी गोष्टी किती विरोधाभासी आहेत हे मी अनुभवले आहे. काय आहे हा अनुभव?
नाताळ हा इथे साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव. नाताळच्या दोन-तीन आठवडे आधी ‘फार्मर्स’ नावाची कंपनी ‘सँटा परेड’ नावाची एक मिरवणूक आयोजित करते. विविध देशातून आलेले स्थलांतरित नागरिक आपापल्या देशाचा एक समूह करून या मिरवणुकीत सामील होतात. आपापले पारंपारिक कपडे घालून, पारंपारिक वाद्ये वाजवीत हा समूह मिरवणुकीत सामील होतो. देशीय लोकांचाही चांगलाच सहभाग असतो. दरवर्षी फार्मर्सचे आयोजक विविध दृष्ये निवडून त्यासाठी लागणारे कलाकार व इतर सामुग्री निर्माण करतात.
जुलै महिन्यातच फार्मर्सच्या जाहिराती पेपरात येतात. मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आम जनतेला आवाहन केलेले असते. ४ वर्षाच्या मुलापासून ते ८० वर्षाच्या वयोवृध्द व्यक्तींपर्यंत लोक त्यात भाग घेतात – एकदाच नव्हे वर्षानुवर्षे सहभागी होणारे लोक असतात. फार्मर्सचे कॉस्चुम डिझायनर हा एक मोठा उद्योगच आहे. हजार प्रकारचे ड्रेसेस तिथे शिवले जातात. विदूषक, प-या, टेडी बेअर, चक्रम शास्त्रज्ञ, ससे, हरणे, चित्रकार, हिमगौरी व सात बुटके, वादक….. यांचे वेगवेगळया मापाचे कपडे शिवले जातात. सहभागी होणा-यांसाठी कपडे बरोबर बसतात किंवा नाही यासाठी ट्रायलही होते. प्रत्येकाचे काम निश्चित केले जाते. मिरवणुकीच्या आधी त्यात्या ग्रूपला बोलावून नक्की काय करायचे याविषयीची रंगीत तालीम होते. शेवटी मिरवणुकीचा दिवस उजाडतो. बहुदा तो नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडयातील शनिवार अथवा रविवार असतो. मिरवणुक दुपारी 1 वाजता सुरू होणार असते. कलाकारांना 11 वाजता एका मोठया हॉलमधे जमायला सांगितले जाते. प्रत्येक कलाकाराला त्याचा रोल, किती वाजता, कुठे जमायचे याविषयीची पत्रे घरी पाठविली जातात.
साधारणत: ४००० कलाकार तिथे जमतात. एका मजल्यावर मेक-अपची सोय असते. प्रत्येकाने आपला रोलअसलेले कार्ड दाखवून आपला मेक-अप करून घ्यायचा. ब्युटीपार्लर्सचे शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी मेक-अप करण्याची ही संधी घेतात. मेक-अप झाला की वरच्या मजल्यावर जाऊन आपापला ड्रेस घ्यायचा. पत्रामधे तुमच्या ड्रेसचा क्रमांक दिलेला असतो. हजारो कपडयांच्या स्टॅंडवरून आपला ड्रेस शोधणे त्यामुळे अगदी सोपे असते. शिवाय ड्रेसवर नावाची चिठ्ठीही लावलेली असते. ड्रेसच्या रिकाम्या पिशवीत आपले कपडे-पर्स ठेवून मिरवणुकीच्या जागी जमा व्हायचे. पर्सेस अगदी सुरक्षित रहातात. हजारो मुले, त्यांचे पालक, नातेवाईक तिथे जमलेले असतात. अत्यंत आनंदाचे उत्साहाचे वातावरण असते. पण गडबड-गोंधळ मात्र बिल्कुल नाही. आया मुलांना खाऊ-पिऊ घालून, फोटो घेऊन आनंदाने मिरवणूकीकडे धाडतात.
बरोबर एक वाजता मिरवणुक सुरू होते… एक मिनिट उशीर नाही …. पाऊस असो, ऊन्ह असो… बर्फ पडणार असो… वेळेवर मिरवणूक सुरू होणारच! तसेच ती ठरलेल्या वेळीच संपणार. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लाखो लोक जमलेले असतात. रस्त्यावर फूटपाथजवळ रेघा मारलेल्या असतात. प्रेक्षकांनी या रेघा ओलांडून पुढे जायचे नाही. उत्साहाच्या भरातही माणसे हा नियम मोडत नाहीत. प्रेक्षकांमधून आरोळया, अभिवादने येत असतात. सहभागी कलाकार त्यांना छानसा प्रतिसाद देत असतात. कलाकार नाचत जात असतात. चित्रकाराच्या हातात रंग-ब्रश असतो. प्रेक्षकातील लहान मुलांना कुठे नाकावर एखादा ठिपका काढ, हौशी मुलीला मिशा काढ असल्या करामती करत तो पुढे जातो… मुले खूश होतात. परी येऊन एखाद्या रडव्या मुलाला फुगा देऊन हसती करते. हे कलाकार पुन्हा पळत पळत जाऊन आपापल्या ग्रूपमधे सहभागी होतात.
मिरवणुकीत कुठेही गॅप पडू दिली जात नाही. लाखो प्रेक्षक असले तरी पोलीस किती ? जास्तीत जास्त १५ ते २०.त्यांचे काम जास्त करून हरवलेली मुले आपापल्या पालकांपर्यंत पोचविण्याचे. मुले पोलिसांना घाबरत नाहीत. उलट त्यांना छान हस्तांदोलन करतात. मिरवणुकीत फुगे, जाहिरातींची पत्रके वाटली जातात. लहानशा पिपाण्या, चमचमणा-या कागदी टोप्या अशा वस्तू विकल्याही जातात. चिनी लोकांचा ग्रूप ड्रॅगन नृत्य, रशियन कलाकार त्यांच्या सर्कशीचे प्रयोग, आयरिश पुरुष स्कर्ट घालून बॅकपाइप वाजवीत शिस्तीने चालत असतात, मॅड सायंटिस्टने कसलासा स्फोट घडवून आणलेला असतो आणि कागदाच्या लक्षावधी टिकल्या हवेत उडतात, मुले आनंदाने टाळया पिटतात. सर्वात शेवटी सॅंटाक्लॉज येतो. सर्वांना नाताळच्या शुभेच्छा देतो.
ठराविक मार्गावरून मिरवणुक पुढे जाते व बरोबर चार वाजता ती ठराविक ठिकाणी विसर्जित होते. सहभागी कलाकारांना आपापले कपडे बदलून, आपले सामान घेऊन छोटयाशा पार्टीला निमंत्रित केलेले असते. थोडासा फराळ व पेय घेऊन मंडळी आपापल्या घरी जायला निघतात.
इकडे रस्त्यावर काय होत असते? मिरवणूकीचा शेवटचा ग्रूप निघाला की पाच दहा मिनिटात वाहतुक पोलिसांच्या गाडया निघतात. हा रस्ता पुढच्या अर्ध्या तासात वाहतुकीसाठी मोकळा होणार असल्याचे ते नागरिकांना सांगत असतात. त्या अर्ध्या तासात मात्र रस्त्यावर वाहनांना पूर्णत: मनाई आहे हे वारंवार सांगितले जात असते. वाहतूक पोलिसांच्या गाडया गेल्या की रस्ते झाडणा-या गाडयांचा ताफा येतो. फूटपाथवर भलेमोठे झाडू घेतलेले स्वच्छता कर्मचारी अवतरतात. फूटपाथवरचा कचरा रस्त्याच्या कडेला लोटला जातो. व्हॅक्युम क्लीनर असलेल्या गाडया तो भराभर गोळा करतात. ही टीम पुढे सरकली की रस्त्यावर पाणी मारणा-या गाडया येतात. नुकत्याच झाडलेल्या रस्त्यांवर पाणी शिंपडून त्यावर शेवटचा हात फिरवला जातो. तात्पुरत्या बांधलेल्या दो-या, खांब उचलणारी टीम येते. रस्ता मोकळा होत जातो. मिरवणूकीच्या शेवटच्या भागापर्यंत हे काम झाले की पुन्हा पोलिसांच्या गाडया रस्ता रहदारीसाठी खुला झाल्याची घोषणा देऊन येतात. हे काम बरोबर अर्ध्या तासात शिस्तीने पुरे केले जाते.
अर्ध्या तासापूर्वी इथे एवढा मोठा कार्यक्रम होऊन गेल्याची कोणतीही निशाणी उरलेली नसते.
ही सगळी शिस्त, व्यवस्थापन यांना कसे जमते? आपल्याकडे ते कां नाही जमत? दहा दिवस कर्कश्श आवाजात ध्वनीप्रदूषण करणारे लाउडस्पीकर्स, रस्त्यांवर मांडव घालून केलेली वाहतुकीची कोंडी, वर्गणीची सक्ती, घाणीचे साम्राज्य आणि विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळी या सर्व बेशिस्तीची कमाल……… सांस्कृतिक दृष्टया एवढा प्रगत असलेला आपला समाज… शिस्तीत ढोल,ताशे वाजविणा-यांचे जथे, लेझिमची पथके, नऊवारी साडया घातलेल्या स्त्रीयांचे पथक, भजनी मंडळांचे झांजा-एकतारी घेतलेले पथक, शाळेतील कसरती करणारी मुले, बॅंडचे पथक, केशरी ध्वज घेतलेले टिळेधारी भक्त, एकसुरात गणपतीच्या आरत्या म्हणणारे पथक, नगरसेवकांचा जथा हे सगळे एकापाठोपाठ गेले, मधे मधे फटाके- भुईनळे उडवायला आणि गुलाल अथवा हानिकारक रंग उधळायला मनाई केली गेली, दारू पिऊन बेहोश होणा-यांवर कायदेशीर कारवाई केली गेली, गर्दीचा गैरफायदा घेऊन चो-या करणारे किंवा स्त्रीयांच्या अंगचटीला येणारे आंबटशौकीन यांना दहशत बसविली गेली तर ?
उत्सव साजरा करणे म्हणजे बेशिस्त वागणे नव्हे, नियमांच्या चौकटीतून, इतरांना त्रास होणार नाही अशा त-हेने कला सादर करणे… प्रत्येकाचा वेगळा गणपती म्हणून वेगळा धांगडधिंगा करण्यापेक्षा आपले वैशिष्ठय जपत त्या समुदायात सामिल होणे, मंगलमूर्तीचे पावित्र्य राखणे हे सगळयांचे आद्य कर्तव्य नाही कां? कधी होणार याची जाणीव आणि कधी पोचणार ती प्रत्येक नागरिकापर्यंत?
आपण सँटा परेडकडून बरेच उचलण्यासारखे आहे. पटते कां तुम्हाला?
– सौ. कल्याणी गाडगीळ, न्युझीलँड