मासिक सदरे


गराज सेल – एक उपयुक्त संकल्पना

शनिवार आला किंवा मोठया सणानिमित्त सुटी आली, की ठिकठिकाणी ‘सेल’ च्या जाहिराती फडकू लागतात. त्या सेलच्या धामधुमीइतकी मोठी नसली तरी एक नित्याची बाब म्हणजे गराज सेल.

गराज सेल म्हणजे आपल्याला नको असलेल्या वस्तू अल्प किंमतीला विकायच्या. सहसा या वस्तू घराच्या गराजमधे म्हणजे आपण ज्याला ‘गॅरेज’ म्हणतो तिथे मांडून विकण्याचा प्रघात आहे.

घर बदलायचे आहे, परदेशी जायचे आहे, कायमचा गाशा गुंडाळून दुस-या गावी जायचे आहे.. किंवा घरातली जागा जरा रिकामी करायची आहे.. अशी अनेक निमित्ते काढून गराज सेल केला जातो. त्यात घरातली आपल्याला नको असलेली पण वापरण्याजोगी भांडी-कुंडी, पुस्तके, लहानमुलांची खेळणी, पांघरुणे, नकाशे, कॉप्यूटरची टेबले, टेबल ल प, गाद्या, फर्निचर, सोफा, चित्रांच्या फ्रेमस्….. कोरे कागद, रुकसॅक…. काय वाट्टेल ते असते. या वस्तू बहुदा चांगल्या स्थितीत असतात व आता गरज नसल्यामुळे गराज सेलमधे विकायला काढलेल्या असतात.

गराज सेलच्या पाटया रस्त्याच्या जवळपासच्या कॉर्नरपासून ते विजेच्या खांबांवरही पुठ्ठयावर लिहून लटकविलेल्या असतात. स्थानिक तसेच शहरातल्या प्रमुख वर्तमानपत्रातही त्याच्या जाहिराती असतात. जागेचा पत्ता, वेळ, काय काय वस्तू विकायला आहेत सगळी माहिती थोडक्यात दिलेली असते. आपण तिथे जाऊन हवी ती वस्तू घ्यायची. इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर ती चालू आहे की नाही हे ही मालक दाखवून देतो. वस्तूंवर किंमती लिहिलेल्या असतात. आवडली तर रोख पैसे देऊन वस्तू लगेच घेता येते.

कधीकधी थोडीफार घासाघीस करून कमी किंमतीलाही वस्तू मागितल्या जातात. हा सगळा खुला कारभार असून त्यात बिल्कुल फसवाफसवी नसते. किवी लोक इतके प्रामाणिक असतात की वस्तू जर मोडकी निघाली तर पैसेही परत देतात. एकदा का तुम्ही ती वस्तू घेणार म्हणून सांगितले, की इतर कोणी तीच वस्तू जास्त किंमत देऊन विकत घेण्याची तयारी दाखविली तरी किवी माणूस ती दुस-याला देणार नाही.

परदेशात नव्याने स्थायिक होणारे लोक, विद्यार्थी यांच्या दृष्टीने ही फार सोयीची गोष्ट असते. एकदा का स्थिरावले की माणसे उगाच गराज सेलला जात नाहीत. बाजारात नव्या वस्तू खूपच महाग असतील तर वापरलेली चांगली वस्तू जवळजवळ पावपट किमतीला मिळते म्हणून मग ते गराज सेलला विशिष्ट वस्तूच्या शोधात जातात.

मुले मोठी झाली की त्यांच्यासाठीचे लहान बेड, खेळणी, कपडे, कार-सीट, प्रॅम या वस्तूंची घरात अडगळ होऊ लागते. नवे फर्निचर आले, की जुने कुठे टाकायचे? अशावेळी गराजसेल काढला की नको त्या वस्तू जाऊन जागा रिकामी करता येते. गरजू माणसांना त्या वस्तू मिळाल्यामुळे त्यांचीही गरज भागते. असा हा परस्परांच्या गरजा भागविण्याचा एक आदर्श व्यवहार. त्याचबरोबर वापरण्यास योग्य अशा वस्तूंचे समाजात घडणारे ‘री-सायकलींग’…. पुनर्वापर.

आपल्याकडे जुन्या बाजारात अशा अनेक वस्तू अत्यल्प किंमतीला मिळतात. जुनी पुस्तके विकत घेण्याबाबत सहसा कुणी कचरत नाही. त्याला समाजमान्यता प्राप्त झालेली आहे. पण जुन्या बाजारातून इतर काही आणणे ही गोष्ट फारशी प्रतिष्ठितपणाची समजली जात नाही. जुन्या वस्तू घेण्याबाबतची ही कथा तर जुन्या वस्तू विकण्याबाबत वेगळीच कथा. ‘कधी तरी लागेल’ या नावाखाली वर्षानुवर्षे नको त्या वस्तू साठविण्याचा व अडगळ जमविण्याचा नाद अनेकांना असतो. त्याचा मोह सहसा कुणाला सोडवत नाही… बायकांना तर नाहीच नाही…. मग त्या वस्तू मोलकरणीला देणे, किंवा कुणा गरीबाला देणे ही पध्दत आहे. कुणाची गरज भागविण्याच्या दृष्टीने ती योग्यही आहे. पण गराजसेलची ही कल्पना जर अंमलात आणली तर?

समाजात एक वर्ग असा असतो की जो गरीब असला तरी आत्मसन्मानाने जगू इच्छितो. कुणाच्यातरी ‘फुकट’ दिलेल्या गोष्टी घेणे त्यांच्या जिवावर येते. गराजसेलमुळे अशा गोरगरीबांना किंवा गरजू लोकांना अल्प किंमतीत आवश्यक त्या वस्तू विकत घेता येतील. कुणाचे तरी ‘उपकार’ घेण्यापेक्षा आत्मप्रतिष्ठेने वस्तू घेतल्याचे समाधान मिळेल. वर्षानुवर्षे अडगळीत पडून रहाणा-या व सरतेशेवटी खराब झाल्या म्हणून फेकून देण्याच्या योग्यतेच्या वस्तू वेळीच वापरल्या जातील. विशेषत: तरूण पिढीने तर ही गोष्ट हिरीरीने अंमलात आणायला हवी. आपल्यासारख्या गरीब देशाच्या दृष्टीने ही अगदी आवश्यक अशीच गोष्ट आहे. वस्तू वाया जाण्यापेक्षा ती वापरली जाण्याचे महत्व मोठे आहे.

उदा. घरात एखादा पेशंट असताना आधारासाठी लागणारी विशिष्ट प्रकारची काठी पेशंट बरा झाल्यावर अनावश्यक असते. तीच दुस-या एखाद्या पेशंटला उपयोगी पडू शकते. जुना कॉप्यूटर एखाद्या नवशिक्याच्या दृष्टीने गरजेचा ठरू शकतो. हौसेने घेतलेली नाशिकच्या बाजारातली कळशी एखाद दुस-यावेळी वापरून जुन्या खोक्यात धूळ खात पडलेली असते. ती एखाद्या नवपरिणित मुलीच्या संसाराची तहान भागवू शकते. बिस्किटांचे डबे, महागडया चॉकलेटचे रंगीबेरंगी डबे, गरजूंचे धान्य साठविण्याचे काम करू शकतात.

चला तर. ही प्रगत देशातली वस्तूंच्या पुनर्वापराची सन्मानित संकल्पना आपण आपल्याकडेही रुजवूया !

– सौ. कल्याणी गाडगीळ, न्युझीलँड