प्राणी-पक्षी माझे सांगाती

लेखकाविषयी

क्षितिजा वागळे हिचा जन्म आणि शिक्षण पुण्यातील. पती उत्तर भारतीय असल्याने लग्नानंतर काही वर्षांनी क्षितिजा वागळे “गुप्ता” झाली व वास्तव्याला अलाहाबाद, लखनऊला गेली. उत्तर प्रदेशातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक विविधता तिला जवळून बघण्याची संधी मिळाली. पुरुषप्रधान आणि पुराणमतवादी समाज रचनेमुळे तिथल्या वातावरणात जुळवून घ्यायला तिला कसरत करावी लागली पण तिने निसर्गाशी जवळीक साधली आणि झाडं, फुलं, पक्षी प्राणी यांच्याशी मैत्री जमवली. तिला आधीच निसर्गाची ओढ होती पण आता नव्याने निसर्गातील हे वेगवेगळे अंश आपापसात कसे छान जोडलेले असतात हे जाणवलं. निसर्गाशी जास्त सम्पर्क आल्यावर तिला जाणवले की ती स्वतः झाडे, खडक, प्राणी पक्षी यांच्यातीलच एक आहे.

१९९९ मध्ये एक गाय त्यांनी पाळली व त्या निमित्ताने अनेक गौसेवक आणि पशुकल्याणासाठी काम करणाऱ्या अनेकांशी तिचा संबंध आला सर्व प्राण्यांना माणसांसारखीच अन्न, देखभाल आणि इलाजाची गरज भासते आणि कधी कधी काही देशी उपचारांनी ते पटकन बरे होऊ शकतात हे तिला समजले. त्यांच्या भागात अनेक गाई, घोडे, कुत्रे होते – काही पाळीव तर काही मोकाट. त्यांच्या साठी तिने एक छोटी पाण्याची टाकी घराबाहेर गेटाजवळ बसवून घेतली, त्याच बरोबर भाजीचे देठ, साली व उरलेसुरले अन्न त्यांना देता यावे म्हणून एक टब ठेवला. आजूबाजूच्या घरातूनही लोक त्या टबमध्ये अन्न टाकू लागले. अनेक आजारी गाई, बैल, कुत्रे ह्यांचा इलाज तिने कधी स्वतः तर कधी पशु तज्ज्ञांच्या मदतीने केला. काही आजारी प्राणी आपणहून तिच्या गेटाबाहेर चालत आले तर काहींना कोणी भल्या व्यक्तीने तिच्याकडे पोचवले. काहींंना परत नेण्यास कोणी आलेच नाही आणि मग ते तिच्याकडेच राहू लागले. अशा प्रकारे तिच्या आश्रयाला आलेल्यांंना घेऊन ‘ब्रह्म क्षेत्र’ ची स्थापना झाली. अनेक गाई, बैल, कुत्रे, तर कधी खारी आणि पक्षी ह्यांनी ही इथे आपला इलाज करून घेतला.

‘ब्रह्म क्षेत्र’ मधील अनेक हृदयस्पर्षी प्रसंग क्षितिजा आपल्याला सांगणार आहे. शब्दांकन करणार आहेत पुण्याच्या कल्याणी गाडगीळ.