एक टक्क्याची गोष्ट

विश्वरूप दर्शन

‘तो’ व ‘ती’ आयटी मधले तिशीचे स्मार्ट. ‘मी’ पुण्यात नव्यानं स्त्रीरोग तज्ञ म्हणुन डेरेदाखल, लासलगांव (नाशिक जवळ) सोडून ‘प्रयास’ मधे कार्यरत. ते कोणत्याच तक्रारीसाठी आले नव्हते. ऍक्चुअली ती जास्त स्मार्ट (ऍज युजवल?). ती ठामपणे म्हणाली, “लग्नाला वर्षच झालंय आमच्या. पण उशीरा झालंय.

आता तिशी संपेल. मुल हवे असेल तर काय करावं हे विचारायला आलोय.” मी सराईतपणे काही बोलणार तोच तिनं अडवलं म्हणाली,” ‘हा’ एच.आय.व्ही. पॉझीटीव्ह आहे.” क्षणभर मी बावचळलो. हळूच मी त्याच्याकडे बघितलं, अहं, तो शांत, गंभीर, जणू त्यात काहीच नाही!

त्या दोघांनाही मी ‘एच.आय.व्ही. पॉझीटीव्ह’ अशा त्या एका टक्क्यात कधीच टाकलं नसतं! अहं, असे हे एकच टक्का प्रमाण असल्यामुळे अशी माणसे एकदाही समोर येत नाहीत. भारतात आपण जणु ते अस्तित्वातच नाहीत या समजुतीत जगत असतो. आता ग्रामीण भागात सर्वत्र हा एक टक्का पोहचलाय तरीही…… या दोघांना बघून मी दचकलो हे खरंय. पुढे मी काही बोलणार तोच ती म्हणाली, “मी एच.आय.व्ही. निगेटिव्ह आहे”.

मी सुन्न झालो. फसवणूक?…..लग्नाअगोदरच एच.आय.व्ही. करणं कसं जरुरी आहे वगैरे विचारात गुंतणार, तोच ती पुढे म्हणाली,
“लग्नाअगोदर ‘त्याने’ सर्व माहिती दिली होती मला डॉक्टर!”

अरे देवा! काही मिनिटांत विश्वरूप दर्शन देतोहेस! मी कादंबरीकार असल्याने असलेल्या माझ्या तथाकथित तरल कल्पना शक्तीचे विमान झपाटयांन जमिनीवर उतरलं. हे मी कधी अपेक्षित केलं नव्हते. इथे माझी कल्पना शक्ती अपूरीच पडली होती.
“आमच्या परीचयोत्तर विवाह. “ती शांतपणे म्हणाली”.

एका ठिकाणी काम करतो. आवडलो एकमेकांना, मागणी ह्याने घातली नाही, मग मी घातली. ‘हा’ बरेच महिने फ़क्त नकार देत होता. कारणं सांगत नव्हता. शेवटी त्यानं तो एच.आय.व्ही. पॉझीटीव्ह असल्याचं कारण सांगितलं. तिनं थोडी उसंत घेतली मग म्हणाली, “मी तीन चार महिने विचार केला……..ही काही गॅरंटी नाही…..कायम निगेटीव्ह रहायची? अहं…….. ज्या पध्दतीने / सहजतेने हल्ली स्त्री-पुरुष संबंध होत आहेत. मी तरी अजिबात खात्री देणार नाही. अन टेम्पटेशन व संधीच एवढी आहे हल्ली प्रत्येकाला…….तो अगतिक क्षण कधी येईल काय नेम?

So….मी पूर्ण विचारांती हा निर्णय घेतलाय. मी एव्हाना डॉक्टरी डोक्यात पचवलं होतं तिच हे लग्न “हल्ली Dink, जोडपी खूप डबल इन्कम नो किड्स. ऍक्चुअली…..मला ही मूल हवचं आहे असं काही नाही…..still…..माहिती करुन घ्यायला आलोय.

मी म्हणालो, “आजच्या वैद्यकीय ज्ञानाप्रमाणे एच.आय.व्ही. (HIV) पॉझीटीव्ह पुरुषापासून एच.आय.व्ही. निगेटिव्ह स्त्रीला मूल होऊ देणं शक्य नाही! ते डॉक्टर म्हणून मी अजिबात मान्य करणार नाही. साधं कारण आहे. तुला एच.आय.व्ही. पॉझीटीव्ह व्हायचं नसेल तर प्रत्येक लैंगिक संबंधावेळी निरोध वापरणं आवश्यक अन निरोध वापरला तर मूल कसं राहणार? शक्यच नाही ते. फक्त मूल होऊ देण्यापुरता निरोध न वापरण्याचा धोका घे…….असं डॉक्टर म्हणून मी सल्ला देऊ शकत नाही. सॉरी ‘ह्यांच्या’ पासून ‘तुला’ मूल शक्य नाही!”
” थँक्स” म्हणत निर्विकारपणे दोघं निघून गेले. मी मात्र विचार करत होतो,”या एका टक्क्याच्या जगानं…….शंभर टक्क्यांची झोप उडवलीय!……अहं, ती खरी झोप होती? का झोपेचे सोंग होतं?” तुम्हाला काय म्हणायचय?

डॉ. अरूण गद्रे यांचे काही साहित्य
Dr Arun Gadre एडस् ने सा-या जगात थैमान घातले आहे. फक्त अशिक्षित समाजच नाही तर अगदी आयटीतले तरुणही ह्याचे शिकार आहेत. ह्या क्षेत्रातल्या कार्याबद्दलचे आपले अनुभव सांगत आहेत डॉ. अरुण गद्रे. डॉ. अरुण गद्रे (एम.डी.डी.जी.ओ) हे स्त्रीरोगतज्ञ असून त्यांनी नाशिक जिल्ह्यात लासलगावी वीस वर्षे काम केले. आता ते पुणे येथे स्थित असून ‘प्रयास,” पाथफाइंडर ‘ संस्थेसाठी एड्सवर कार्य करत आहेत. डॉ. गद्रे हे लेखक असून त्यांच्या नावावर ‘हितगुज लेकीशी’, ‘एक होता फेंगाडया’, ‘घातचक्र’, ‘विषाणू’ अशी बरीच पुस्तके आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचेही पुरस्कार मिळाले आहेत.

Hitguj
Ghatchekra
Vadhstambha
Vishanu