विनित आणि विशाल तिसरीत शिकणारे दोन मित्र. दोघांची अगदी घट्ट मैत्री पण स्वभाव मात्र अगदी वेगळे. विनित सदा हसतमुख उत्साही, प्रत्येक खेळात भाग घेणारा तर विशाल कायम दुरमुखलेला, निरउत्साही आणि बरेच वेळा शाळा बुडविणारा.
त्या दिवशी सर्व वर्गाची ट्रीप डोंगरावर जाणार आहे असे प्राची टिचरांनी सांगितले. सगळी मुले आनंदाने ‘हुर्रे’ ओरडली. जो तो उत्साहात तयारीला लागला. शूज, बॅगपॅक, पाणी, खाऊ आणि काय काय. बटाटवडे, वेफर्स, सॅण्डवीच, पराठे इत्यादी खाऊची तयारी सुध्दा झाली. विनितने सर्व भाज्यांच्या मिश्रणाचे पराठे, दही, शिरा, आणि फळं अस सगळं घेतलं होत. विशालने मात्र वेफर्स, चिवडा, कोल्डड्रिंक्स घेतली होती.
ठरल्याप्रमाणे सारा वर्ग सकाळी ठीक सात वाजता शाळेत जमला. सगळी मुलं खूपच एक्साईट झाली होती. वाट बघून शेवटी एकदाची बस सुटली. साडे आठला ब्रेकफास्ट सगळयांनी गाडीतच करायचा ठरला. सर्वांनी आपआपले डबे उघडले विनितनेही शिरा आणि ऍपलचा चट्टामट्टा करायला सुरूवात केली. विशाल मात्र कोल्डड्रिंक्स आणि भलमोठं वेफर्सच पाकीट खात होता. होता होता बस डोंगराच्या पायथ्याशी पोहोचली. सगळी मुले खाली उतरल्यावर टिचरांनी सांगितले ”मुलांनो उंच वर डोगंरावर काही प्राचीन लेणी आहेत. आपल्याला ती बघायची आहेत तेंव्हा सर्वांनी काळजीपूर्वक डोंगर चढायचा आहे. आपल्या बरोबर दुस-या मुलांचीसुध्दा आपण काळजी घ्यायची आहे.” मुलं काय तयार होतीच. सर्वांनी आपल्या बॅगपॅक पाठीवर टाकल्या. टोप्या घातल्या आणि चढायला सुरूवात केली. मधून मधून उत्साह वाढावा म्हणून टिचर त्यांना ” हर हर महादेव” म्हणायला सांगत होत्या. मुलांनाही आरोळया देतांना अगदी शिवाजीचे मावळे झाल्यासारखे वाटत होते.
पण मित्रांनो, जसे जसे वर जात होते तस तसा ह्या मावळयांचा उत्साह कमी कमी होत जात होता. त्यांना दम लागत होता. बरेच जण थांबून थांबून चढत होते तर काहीजण सारखे पाणी पीत होते. एकूण काय डोंगर चढायच्या आधीचा उत्साह आता फारच थोडया प्रमाणात होता. अपवाद फक्त विशालचा! आपला हा मावळा विशाल सगळयांच्या पुढे होता. नाही म्हणायला तोही एकदा थांबला पण लगेच पुढच्या चढाईला लागला. आपले मित्र थांबलेत पाहून त्यांनाही तो उत्साहाने वर बोलवत होता. हळूहळू का होईना सगळी मुलं डोंगरावर पोहोचली. विशाल त्यांच्यात अर्थातच पहिला होता. मुलांना दगडात कोरलेली अदभूत लेणी खूपच आवडली. काहींनी फोटो काढले, काहींनी चित्र काढली तर काही मुलांनी तिथल्या स्थानिक लोकांना संपूर्ण माहिती विचारून घेतली.
संध्याकाळ होत आल्यामुळे आता खाली उतरणे आवश्यक होते पण त्या आधी टिचरांनी सगळयांना जवळ बोलावले त्या म्हणाल्या, ”मुलांनो आज बहुतेक मुलांना डोंगर चढतांना दम लागला. विनीत तर सर्वात मागे राहिला होता. तुमच्यात न दमता जर कोणी डोंगर चढला असेल जर तो आहे विशाल. असं का माहिती आहे का? मुलांनी नाहीच्या माना डोलावल्या.
टिचर पुढे म्हणाल्या, “विशाल अजिबात जंकफुड खात नाही. आईने केलेले संपूर्ण जेवण तो मनापासून जेवतो. त्यामुळे त्याच्या शरीराचे चांगले पोषण होऊन शक्ती वाढते. तसेच तो दररोज सकाळी व्यायामही करतो. त्यामुळे त्याचा स्टॅमीना पण वाढला आहे. तुम्ही जर त्याच्या सारखे वागलात तर तुमचाही स्टॅमीना वाढून न दमता तुम्ही डोंगर चढाल. हं, कधीतरी बदल म्हणून वेफर्स, बिस्किटे खायला हरकत नाही. पण संपूर्ण जेवण त्यावर नको. काय समजले ना?” मुलांनी मोठयाने हो म्हटले आणि उडया मारत डोंगर उतरायला सुरूवात केली.
– सौ. भाग्यश्री केंगे