मासिक सदरे


बॅकपॅकर्स

Backpackersप्रवासातले विश्रांतीचे स्थान हा एक महत्वाचा भाग असतो. प्रवास करून शिणल्यावर विश्रांती हवीच. शिवाय मनाजोगे जेवण मिळाले तर फारच छान. आणि या दोन्ही गोष्टी अगदी कमी किमतीत झाल्या तर? मग काय सोन्याहून पिवळे. बॅकपॅकर्सची देशभर पसरलेली एक साखळी ही सोय न्यूझीलँडमधे सहज उपलब्ध करून देते. बॅकपॅकर्स म्हणजे आहे तरी काय?

पाठीवर पडशी टाकून भटकायला निघालेल्या तरूण मुशाफिरांसाठी निर्माण झालेली ही सोय. पण आता ती फक्त तरूणांची मक्तेदारी राहिलेली नाही. – कुणालाही त्या सोयीचा लाभ घेता येतो.

पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या कोणत्याही लहानात लहान गावातही बॅकपॅकर्स असतात. तिथे रहाण्याची सोय असते. एक भले मोठे, सर्व साधनांनी युक्त असे स्वयंपाकघर असते. आसपासच्या प्रेक्षणीय स्थळांची माहितीपत्रके असतात. त्या स्थळांचे तिकिट काढण्याची सोय असते. या सोयी पंचतारांकित हॉटेलसारख्या अर्थातच नसतात. पण सर्व आवश्यक त्या गोष्टी अगदी कमी किंमतीत उपलब्ध केलेल्या असतात. या सोयीसाठी एका रात्रीचा माणशी खर्च साधारणत: 25 डॉलर्स एवढा अल्प.

झोपण्यासाठी सिंगल, डबल किंवा एकावर एक असे बंक बेड असलेली खोली किंवा ७ ते ८ जण अथवा कधी कधी १५-१६ जण झोपू शकतील अशी भली मोठी खोली – डॉर्मिटरी असते. प्रत्येकाला गादी उशी, पलंगपोस तसेच पांघरूणही असते.

स्वयंपाकघरात भला मोठा फ्रीज, मायक्रोवेव्ह, टोस्टर, जेवणासाठी लागणारे काटे,चमचे, सु-या, प्लेटस्, कप, बाउल या मुबलक प्रमाणावर असतात. दोनतीन कुकिंग रेंज अथवा गॅसच्या शेगडया असतात. स्वयंपाकासाठी, तसेच मोठा ओव्हनमधे वापरण्यासाठीची अनेक भांडी असतात. शिधा ठेवण्यासाठी कपाटे असतात. ज्याने त्याने आपले नाव घातलेली पिशवी त्यात ठेवायची. फ्रीजमधेही आपल्या पिशवीवर नाव घालून ठेवायचे. हवी ती भांडी वापरून स्वयंपाक करायचा, जेवण करायचे आणि आपण वापरलेल्या वस्तू धुवून पुसून जागच्याजागी ठेवून द्यायच्या. भांडी धुण्यासाठी लागणारा साबण, घासणी, भांडी पुसण्यासाठी लागणारे नॅपकिंन्स सगळे तिथे उपलब्ध असते.

बॅकपॅकर्सच्या जवळपास फळे, भाज्या, ब्रेड वगैरे मिळणारी दुकाने असतात. त्यामुळे ताजी भाजी घेऊन येऊन लगेच जेवण रांधता येते. आपला मुक्काम संपला आणि काही शिधा उरला तर ’फ्री फुड’ अशी नोट लिहून एका खोक्यात ठेवायचे. साखर, मीठ असले पदार्थ त्यात असतात. ते कुणालाही वापरायची मुभा असते.

कॉमन जागेत पूल्सची टेबले, व्हिडिओ लायब्ररी, पुस्तके, टी.व्ही. स्पा (गरम पाण्यात शेकून घेण्यासाठीचा हौद), कॉप्यूटर, ई-मेल, देशी-परदेशी फोन करण्याची सोय अशा सोयी असतात. आसपासच्या प्रेक्षणीय स्थळांची भरपूर माहितीपत्रके- अर्थातच मोफत – उपलब्ध असतात. बॅकपॅकर्सचे संचालक हे चांगलेच हसरे असतात. सर्व प्रकारची मदत करायला तयार असतात.

जगभरचे प्रवासी इथे येऊन रात्री-दोन रात्रीचा मुक्काम करतात. नवीन ओळखी करून घेतात. आपापले अनुभव एकमेकांना सांगतात. एकमेकांनी केलेल्या जेवणाच्या चवी घेतात. हसत-खेळत एकत्र वेळ घालवतात. मुक्काम संपला की पाठीवर रकसॅक टाकून पुढच्या प्रवासाला सज्ज होतात. यातून कधीकधी दीर्घकाळ टिकणा-या मैत्रीची सुरुवात होते तर कधीकधी जन्माच्या लग्नगाठीही बांधल्या जातात.

देशभर पसरलेल्या बॅकपॅकर्सची यादी (पूर्ण पत्ता, फोन नंबर, फॅक्स नंबर, ईमेल, तिथे उपलब्ध असलेल्या सोयी इत्यादींसह) छोटयाशा पुस्तकाच्या स्वरूपात सरकारच्या ‘इन्फर्मेशन सेंटर’ मधे मोफत उपलब्ध असते. फोन अथवा ईमेल करून हव्या त्या दिवशीचे आरक्षण करायचे असा अगदी सोयीचा मामला असतो.

अशी साखळी भारतात निर्माण केली तर?
या सोयीचा लोकांना फार फायदा होईल. आपल्याकडे धर्मशाळांमधे अथवा काही देवस्थानांच्या स्वत:च्या अशा जागा भाविकांसाठी मिळू शकतात. तिरुपती किंवा गोव्याच्या मंगेशी या देवस्थानांनी अशा सोयी निर्माण केलेल्या आहेत. कोकणातल्या अनेक प्रसिध्द मंदिरांपाशी तिथल्या ब्राह्मणांच्या घरी-भोजन-निवासाची सोयही केलेली असते. पण या सगळयांचे स्वरूप हे स्थानिक असून त्यात एक संघटित अशी साखळी नाही. पुन्हा जाती-धर्माच्या अदृष्य भिंती त्याआड येतातच. त्याऐवजी बॅकपॅकर्सची साखळी निर्माण केली तर देशी-परदेशी सर्वच पर्यटकांची चांगली सोय होईल. शिवाय अनेक लोकांना चांगला उद्योग र्निमाण होईल. शेजारी एखादे जनरल स्टोअर काढले की ते बॅकपॅकरच्या पर्यटकांच्या जिवावरसुध्दा चांगले चालेल.

हवे तर स्वयंपाकघरातील भांडीकुंडी किंवा इतर वस्तू (उदा. टॉवेल, परटघडीचे बेडशीट) यांसाठी अल्पसे जास्तीचे भाडे घ्यायचे अथवा डिपॉझिट ठेवून घ्यायचे. वस्तू परत केल्या की डिपॉझिट परत. म्हणजे वस्तू गायब होण्याचीही भिती नाही. फक्त मद्यपान व इतर व्यसनांना मात्र पूर्णत: बंदी…. या अटीवरच प्रवेश.

या साखळीचा पर्यटनाच्या वाढीसाठी चांगला उपयोग होईल. शिवाय भारतातील प्रांताप्रातातील लोकांना एकमेकांत मिसळण्याची एक संधी मिळेल. साने गुरुजींच्या ‘आंतरभारती’चे स्वप्न या रितीने प्रत्यक्षात उतरविता येईल. मद्रासी अण्णांना कोल्हापूरच्या झणझणीत झुणका-भाकरीची चव कळेल आणि मऊसूत पोळया खाणारी महाराष्ट्रातील मंडळी, उत्तरेकडील जाडजाड कणकेच्या पराठयाची गंमत अनुभवतील.

कल्पना करा……दिल्लीच्या बॅकपॅकरला रोज लस्सीचा रतीब तर गोव्याच्या बॅकपॅकरला ताज्या मासळी देणा-या कोळणीची भेट… भीमाशंकरच्या बॅकपॅकरमधे ज्योतिर्लिंगाच्या व तेथील मंदिराच्या माहितीचे (मोफत) पत्रक तर तेथील जंगलात आढळणा-या लाल रंगाच्या ‘उडणा-या’ खारींची माहिती असलेले (अल्पशा किंमतीचे) पत्रक मिळते आहे… लोक आवडीने या गोष्टींचा अनुभव घेतील.

भारतात पहाण्याजोग्या हजारो जागा आहेत. उणीव आहे ती तेथपर्यंत सहजरित्या पोचण्याची. बॅकपॅकर्सची साखळी ही उणीव नक्की भरून काढेल… ती सुध्दा खिशाला परवडणा-या दरात.

– सौ. कल्याणी गाडगीळ, न्युझीलँड