मासिक सदरे


सुपरमार्केट शॉपिंग गाईड

diabetes सर्दी-खोकला झाला आणि तो लवकर बरा होईना. म्हणून डॉक्टरांकडे जावे लागले. नंबरची वाट पहात बसले होते तेव्हां तिथे ठेवलेल्या अनेकविध पत्रकांकडे लक्ष गेले. डायबेटीस बाबतची अनेक पत्रके तिथे दिसली. सहज कुतुहल म्हणून पाहिले. यादी केवढी मोठ्ठी होती.

डायबेटीसशी सामना

 • टाइप टू डायबेटीसविषयी अधिक माहिती
 • इन्सुलिनने नियंत्रित केला जाणारा डायबेटिस
 • डायबेटीस असलेल्यांसाठी योग्य आहार
 • रक्तातली साखर मोजणे
 • डायबेटीस व व्यायाम
 • चांगल्या प्रकृतीसाठी चालण्याचा व्यायाम – पेडॉमीटर

वापरण्याविषयीची माहिती

 • डायबेटीस असलेल्या व्यक्तींचे कार चालविणे
 • डायबेटीस व तुमच्या किडनी
 • डायबेटीस व तुमचे डोळे
 • डायबेटीस व तुमचे पाय
 • डायबेटीस व गरोदरपण
 • डायबेटीस पूर्वावस्था

या सगळया पुस्तिका अगदी सोप्या भाषेत असून त्यात सर्वसामान्य माणसाला सहजपणे समजतील व त्यानुसार योग्य ती काळजी घेता येईल अशा प्रकारे माहिती दिली होती. त्याच गठ्ठयात सगळयात तळाशी सापडली एक अत्यंत नाविन्यपूर्ण व उपयुक्त पुस्तिका

सुपरमार्केट शॉपिंग गाइड

पुस्तिकेचा हेतु कोणत्या प्रकारचे अन्नपदार्थ खावेत ज्यामुळे प्रकृती उत्तम राहून साखरेचे नियंत्रण होईल व ह्रदयआणि रक्तवाहिन्यांचे संरक्षण होईल हे समजावून देणे हा होता.

या पुस्तिकेत पाहून कोणत्याप्रकारचे खाद्यपदार्थ विकत घ्यावेत ज्यामुळे कमी साखर, मीठ तसेच अति स्निग्ध पदार्थ यांचे प्रमाण कमी असूनही तंतूमय आहार सहजासहजी मिळेल हे सांगितलेले होते.

पहिल्याच पानावर मुख्य जेवणाचा एक पाय चार्ट काढलेला होता. २५ टक्के प्रोटीन( मांस, चिकन, मासे, अंडी इत्यादी) , २५ टक्के कार्बोहाड्रेट (बटाटे, रताळी, भात, पास्ता इत्यादी) व ५० टक्के भाज्या (ब्रोकोली, कोबी, फ्लॉवर, लेटयुस, टोमॅटो, गाजर, मटार इत्यादी) असा आहार योग्य होय हे त्यातून दाखविलेले होते.

पण सुपरमार्केट्मधे खरेदी करताना त्याचा कसा उपयोग करायचा? पुढच्या पानावर माहिती दिलेली होती. खाद्यपदार्थांची जाहिरात कशी दिशाभूल करणारी असते व त्यातून योग्य काय ते कसे निवडावे याची माहिती देणारे काही मुद्दे त्यात होते. उदा –
जास्तीची साखर घातलेली नाही – असे जरी एखाद्या पदार्थाच्या लेबलवर लिहिलेले असले तरी मुळातच त्या पदार्थात नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असू शकेल . लेबलवर दिलेल्या पोषणमूल्यांच्या तक्त्यात पाहून कार्बोहायड्रेटचे प्रमाण किती हे तपासून पहा.

कोलेस्टेरॉलमुक्त – असे लेबल असले तरी त्यातील ऊर्जा व फॅटचे प्रमाण पहा.
डाएट किंवा कमी ऊष्मांकांचे पदार्थ – हे उत्तम. हे पदार्थ कृत्रिम स्वीटनर वापरून केलेले असतात.
नंतरच्या पानावरची माहिती होती फॅट, साखर, मीठ इत्यादींची पर्यायी नावे. उदा. मोनोसॅच्युरेटेड फॅट – कॅनोला तेल, शेंगदाणा तेल, ऍव्होकाडो तेल, ऑलिव्ह तेल इत्यादी.

साखर – ब्राउन शुगर, कॉर्न सिरप, फ्रुक्टोज, ग्लूकोज, लॅक्टोज, माल्टोज, शुक्रोज, डेक्स्ट्रोज, मध, मोलॅसिस, रॉ शुगर इत्यादी.

नंतरच्या पानावर प्रत्येक खाद्यपदार्थावर बंधनकारक असलेले जे लेबल लावलेले असते ते लेबल कसे वाचायचे? त्याचा अर्थ काय? याची पूर्ण माहिती दिली होती. त्यात पोषणमूल्ये व प्रत्येक १०० ग्रॅम पदार्थ खाल्ल्यास किती ऊष्मांक, किती साखर, किती कर्बोदके, किती लोह वगैरे पोटात जाईल याची माहिती वाचून आपल्याला कशाची आवश्यकता आहे हे कसे पहायचे हे समजावले होते. उदा. ज्यास्त तंतूमय पदार्थ शरिराला चांगले. ज्यात मीठ जास्त आहे असे पदार्थ ब्लडप्रेशर असलेल्या व्यक्तींनी जास्त खाऊ नयेत. ग्लायसेमिक इंडेक्स (क) म्हणजे काही कर्बोदकामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते तर काहींमुळे ते पटकन वाढत नाही. म्हणजे ज्याचा जीआय् इंडेक्स कमी असे पदार्थ हळुहळु पचविले जातात. त्यामुळे कमी जीआय् असलेले पदार्थ खाणे योग्य. तरीही ते अतीप्रमाणात खाल्ले तर पुन्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणारच अशी सगळी माहिती होती.

त्यानंतरच्या पानांवर कोणत्या भाज्या मधुमेहींनी निवडाव्यात – उदा. जास्त कर्बोदके नसलेल्या ब्रोकोली, घेवडा, टोमॅटो इत्यादी भाज्या. रताळी, बटाटे पूर्णत: वर्ज नसल्यातरी बेताने घ्याव्यात अशा प्रकारच्या सूचना.
फळे कोणती घ्यावीत? फळांच्या रसाचे कॅन घेण्यापेक्षा फळे घेणे चांगले. फळांमधे फॅटचे प्रमाण कमी असते. सुकविलेल्या फळांमधील साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. फळांचे डबे घ्यायचे असल्यास साखरेच्या पाण्यात बुडविलेले फळांचे कॅन घेण्यापेक्षा साधे फळांचे कॅन घ्यावेत.

नाश्त्यासाठी कोणते सिरियल चांगले.
इथे मिळणा-या शेकडो प्रकारच्या ब्रेडपैकी कोणता ब्रेड निवडावा, तो कसा निवडावा – ज्यात तंतू जास्त आहेत असा ब्रेड निवडावा.

या प्रकारे सूप, मांस, मासे, चिकन, अंडी, दूध, दही, चीज, बटर , तेल, विविधप्रकारचे नट्स् म्हणजे काजू, बदाम, दाणे इत्यादी. , मुरांबे, सॉस, पेये, दारू, बिस्किटे, केक, गोडपदार्थ, आइसक्रीम अशा विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे शेकडो नमुने सुपरमार्केटमधे उपलब्ध असताना त्यातले आपल्या प्रकृतीसाठी योग्य काय ते कसे ठरवावे व निवडावे याची थोडक्यात पण मुद्देसूद माहिती दिलेली होते.

सरतेशेवटी कृत्रिम गोडपणासाठी कोणते स्वीटनर्स वापरावेत याचीही माहिती दिलेली होती. शेवटच्या पानावर आपल्याला आवडणा-या व आपल्यासाठी योग्य असलेल्या पदार्थांची यादी करण्यासाठी मोकळी आखीव जागा.
माहितीपत्रकाच्या मलपृष्ठावर डायबेटीस न्यूझीलंडचा पत्ता व फोन नंबर दिलेला. तुमच्या जवळच्या भागातील डायबेटीस केंद्रावर जाऊन सल्ला घ्या अशी सूचना.

सगळयात कमाल वाटली ती म्हणजे या डायबेटीस केंद्रातर्फे डायबेटीस असलेल्या लोकांची सुपरमार्केटमधे टूर नेतात त्याची. डायबेटीस केंद्राचा प्रतिनिधी ही टूर आयोजित करतो. पुस्तिकेत दाखविल्या प्रमाणे सुपरमार्केटमधे जाऊन विविध पदार्थांची पोषणमूल्यांची माहिती वाचून पदार्थ निवडण्याचे काम कसे करायचे, व असा आहार घेतल्यावर साखरेचे नियंत्रण झाले कां किती नियंत्रण झाले असल्या गोष्टींची चर्चाही केली जाते.

डायबेटिस असलेल्या लोकांचे सर्वात जास्त प्रमाण भारतात आहे असे म्हंटले जाते. त्याविषयी अनेक दवाखान्यांमधून तसेच हॉस्पिटलांमधूनही भित्तिपत्रकेसुध्दा लावलेली असतात. डायबेटीस, ह्रदयविकार, ब्लडप्रेशर असल्या खूप जास्त प्रमाणात वाढत असलेल्या आजाराशी सामना करणा-या लोकांना अशी माहिती पत्रके देऊन व प्रत्यक्ष भाजी बाजार, सुपरमार्केटमधे त्यांना नेऊन योग्य त्या निवडीविषयी जागृत करण्याची ही कल्पना मला फारच आवडली. आपल्या आजाराची माहिती व त्याच्याशी जुळवून घेत आपली जीवनशैली ठरविण्याची तसेच आजाराविषयी शास्त्रशुध्द माहिती देऊन योग्य आहाराची जाणीव करून देण्याची ही समाजशिक्षणाची पध्दती मला फारच भावली.

आपल्याकडे ती राबविता येईल का? मनात आणले की काहीही शक्य असते. मग आता वाट कशाची पहाताय?

– सौ. कल्याणी गाडगीळ, न्युझीलँड