आजकाल प्रत्येक तरुणांना शिक्षण आणि नोकरी करीता परदेशात जायची ओढ असते. अभय सुध्दा त्याच मार्गाने गेलेला. पण ह्या प्रवासात त्याच्या संवेदनशील मनाने अनेक बारकावे टिपले आहेत. त्याने शब्दबध्द केलेले ‘बिनधास्त’ अनुभव.
अभय परांजपे हे अभियंता असून ऍरोझोना युनिव्हर्सीटीतून त्यांनी एम एस केले आहे. लहानपणापासून अभ्यासाबरोबरच टेबलटेनिस, नाटक, वक्तृत्व, लिखाण याची विशेष आवड असणा-या संवेदनशील अभयने त्याच्या अनुभवांची गुंफण तसेच देशा-परदेशातले बारकावे आपल्यासाठी टिपले आहे.
एकदाचा व्हिसा मिळाला!! खिडकी क्रमांक १३ वरचा अमेरिकन ऑफिसर मला अभिनंदन करत होता, माझे भान हरपले होते. आधीच्या ब-याच माणसांना व्हिसा नाकारून, ह्याने मला व्हिसा द्यावा, म्हणजे खूप शोधाशोध करून मुलगा पसंत करणा-या मुलीसारखी गत होती. मी त्याला थॅक्यू म्हणून मागे वळालो. माझा इंन्टंरव्हयू तब्बल ५ मिनिटे चालला होता, म्हणजे साधारण इंन्टंरव्हयू पेक्षा बराच वेळ जास्त. सगळे लोक माझ्याकडे कुतूहलाने बघत होते. शेवटच्या चेंडूवर सहा धावा पाहिजे आहेत, तेंडूलकरने हवेत बॉल मारला आहे, क्षेत्ररक्षक सीमेरेषेकडे पळत आहे, तो चेंडूच्या बरोबर खाली झेल घ्यायला उभा आहे, स्टेडिअम मधले प्रेक्षक आ…आ वासून उभे आहेत, आऊट होणार का सिक्स? दोन मिनिटं स्तब्ध उभा राहिलो, मग एक मोठी स्माईल दिली. “अरे मिळाला, मिळाला” अशी कुजबूज सुरू झाली. आज कोणाला तरी व्हिसा मिळाला हे बघून जमलेल्या लोकांना आनंद होत होता. त्यातल्या काही जणांनी माझे अभिनंदन केले. मी धावत बाहेर आलो आणि घरी फोन केला. घरचे फोनची वाट बघत होते. पहिल्या रिंगमध्येच त्यांनी फोन उचलला. मी म्हटलो “मिळाला.” घरात एकदम जल्लोशाचे वातावरण झाले. मी लगेच पहिली बस पकडून घरी पोहचलो. बाबा पेढे घेऊन, स्वागताला उभेच होते. माझा पोरगा अमेरिकेला जाणार हे एव्हाना संपूर्ण शहराला बाबांनी सांगितले. पराजंपे घरातून कोणीतरी पहिल्यादां अमेरिकेला जाणार होता.
कोर्स चालू व्हायला दीड महिनाच राहिला. म्हणजे एका महिन्याच्या आंत सगळी तयारी करून अमेरिकेला पोहचणे भाग होते. घरात लग्नकार्य असल्यासारखा धुमाकूळ होता. काय काय सामान लागणार/नाही लागणार ह्याची माहिती मी माझ्या यु एस मध्ये असलेल्या मित्रांकडून आणि माझ्या युनिर्व्हसिटीच्या इंडियन स्टूडंन्टस असोसिएशन कडून मिळविली. याद्या बनवायला सुरूवात केलेली. प्रत्येक युनिर्व्हसिटीचे एक भारतीय विद्यापीठाचे मंडळ असते. दर वर्षी येणा-या नवीन मुलांना मदत करणे त्यांचे मुख्य काम असते. त्यांच्या वेबसाईटवर सामानाची सविस्तर यादी असते. सर्वप्रथम घ्यायची गोष्ट म्हणजे दोन भल्या मोठया, एअरलाईनच्या नियमांमध्ये बसतील अशा मापाच्या बॅगा. घरात सततच्या चर्चा आणि सूचना- ” नवीन शर्ट घेऊन जा, तुझे नेहमीचे काळे टी-शर्ट नको घेऊस तिकडे”, ” जास्त शहाणपणा करू नकोस, थंडी असते तिकडे, दोन जॅकेट्स, स्वेटर आणि कानटोपी घेऊन जा” (माझी युनिर्व्हसिटी वाळवंटात आहे!), “किती लिटरचा कुकर आणू दुकानातून?”, “पैसे तुझ्याकडेच ठेव, बॅगेत नको, एअरलाईनवाले बॅगा हरवतात म्हणे”, “पासपोर्ट वगैरे जपून ने, वेंधळ्यासारखा पडशील कुठेतरी”, “विमानाचे तिकिट बघू रे, आमच्या नशिबी विमान प्रवास नाही, निदान तिकिट तरी बघून घ्यावे”, “अरे देवा, एवढया जाड बॅगा उचलणार कशा रे तू?”, “अरे हो पुस्तकं राहिलीच की!” मुलगा खूप लांब जाणार म्हणून सगळ्यांनाच काळजी वाटत होती, पण आयुष्यात उंच भरारी मारणार म्हणून कौतुकही होतं.
सगळे सामान भरून झाले, आता त्या भल्या मोठया बॅगा उचलून त्यांचे वजन करायचे. दोन्ही बॅगा मिळून फक्त सत्तर पौंड वजन झाले पाहिजे, नाहीतर जादा सामानाचे अधिक पैसे लागणार. पहाटे चारची फ्लाईट होती. रात्रीच्या जेवणापर्यंत सगळी तयारी झाली. आता शेवटचे काही तास घरच्याबरोबर. त्यानंतर निदान एक-दीड वर्ष तरी भेट होणार नव्हती. एकूण सगळ्या तयारीच्या गडबडीत कोणाला भान नव्हते. “मामा, तू गावाला चाललास? परत कधी येणार?” माझी दोन वर्षाची भाची सगळा गोंधळ बघून विचारत होती.
“तुझा ब्लॉग बरा आहे, मराठीवर्ल्डसाठी पण लिहीणार का?” अशा प्रकारची ऑफर मला काही दिवसांपूर्वी मिळाली. ऎकून मला आनंदच झाला, पण नंतरचे तब्बल दोन आठवडे ‘ऑफिशियल’ काय लिहायला पाहिजे ह्या विचारात निघून गेले. कारण ब्लॉग लिहीणं ही वैयक्तिक गोष्ट आहे. तर मराठीवर्ल्डसाठी लिहीणं काहीप्रमाणात फॉर्मल आहे. वर्तमानपत्रात रोज ‘ऎडोटीरीअल्स’ लिहीणा-या संपादकांचे मला कौतूक वाटते. दररोज नवीन विषय मिळतात कसे? आता मी लिहायचे ठरविले तर कशाबद्दल लिहीणार? आजच्या पिढीचे जीवन, त्याचे विचार, लाईफस्टाईल की आवांतर काहीतरी?
मला अमेरिकेत येऊन आता ३ वर्ष होतील. या तीन वर्षात जग पाहिल्यासारखे वाटले. अमेरिकेत बरेच चांगले वाईट अनुभव आले. त्याबद्दलच मी मोकळेपणाने लिहीणार आहे. सध्याच्या, म्हणजे माझ्या पिढीतील तरुणांचा अमेरिकेत येण्याचा एक स्टँडर्ड मार्ग आहे. भारतातून चार वर्ष इंजिनिअरींग करायचे, जी.आर.ई. द्यायची, अमेरिकेत युनिर्व्हसिटीमध्ये अर्ज करायचा, ऍडमिशन मिळाले की एफ१ व्हिसा मिळवायचा. व्हिसा मिळताच तुम्ही अमेरिकेत यायला मोकळे. जे लोक ह्या किचकट परीक्षेतून गेले आहेत ते माझी एका वाक्याची समरी वाचून मला संतप्त प्रतिक्रीया पाठवतील! कारण हे काम तब्बल एक दोन वर्ष चालते. भारतीय इंजिनिअर्स सहसा ‘मास्टर ऑफ सायन्स’ अर्थात एम.एस. ह्या डिग्रीसाठी अर्ज करतात. कारण पीएचडी करण्याइतका संयम ब-याच जणांमध्ये नसतो. एम.एस पूर्ण करण्यासाठी सहसा दोन वर्ष लागतात. पण आपल्यासारखं “ऎटीकेटी लागली नाही म्हणून चार वर्षात इंजिनिअर झाला” असे साधे समीकरण नसते. मुलगा हुशार व चलाख असला तर तो एका वर्षात पण हा कोर्स करु शकतो. जर मास्टर थिसीस ऍडव्हायजर यमाचे दुसरे रुप असला तर तोच कोर्स पूर्ण व्हायला चार वर्ष देखील लागू शकतात! कारण इकडे ज्ञानाचे मोजमाप, तुम्ही घालवलेल्या वेळेत नाही, तर, तुम्ही अपेक्षे एवढे काम केले आहे का? ह्या गोष्टीवर ठरते. एम.एस. पाठोपाठ पीएचडी, एमबीए, आर्किटेक्चर हे पॉप्युलर चॉईस आहेत. इकडच्या विद्यार्थी जीवनावर बरेच काही लिहीण्यासारखे आहे. पण पहिल्या लेखात सारांशच पुरे.
असो, पार्टटाईम नोक-या करुन, कोर्सेस करुन, थिसिस रिसर्च करुन एमएस ही पदवी मिळवावी लागते. नंतरचा मोठा टप्पा म्हणजे ‘जॉब सर्च’ अर्थात नोकरी मिळविण्यासाठी खटपट. हिंदी सिनेमात बरेचदा, दाखवतात, हिरो हातात भली मोठी फाईल घेऊन नोकरी शोधत फिरतात आणि ‘नो व्हॅकेन्सी’ असे अनेक बोर्ड त्याला दिसतात. सुदैवाने, इकडे एवढी पायपीट करावी लागत नाही. तुमचा ‘रिझ्युम’ हा नोकरी देणा-यासाठी पुरे असतो. त्या एका कागदाच्या तुकडयाला खूप महत्त्व आहे. तुम्ही स्वत:चे गुण किती कौशल्याने मांडतात हे फार महत्त्वाचे असते. हे रिझ्युम्स घेऊन तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवर सबमीट करु शकता, अथवा प्रत्येक युनिर्व्हसिटीमध्ये होणा-या ‘करिअर – फेअर’ मध्ये म्हणजे तुम्हाला ऐम्प्लॉयरकडे जायची गरज नसून, तेच तुम्हाला भेटायला येतात! शेकडो उमेदवारांपैकी तुम्ही जर शॉर्ट लिस्ट झालात, तर पुढे इंन्टरव्हयूची तयारी. सहसा, फोन आणि ऑनसाईट इंन्टरव्ह्यू अशा दोन फे-या असतात. त्या दरम्यान तुमचे बरेच ‘ग्रिलिंग’ होते. तुम्ही रिझ्युम मध्ये लिहीलेल्या गोष्टी तुम्हाला खंरच किती येतात का हे पारखून पाहण्यात येते. एकदा का त्यांची खात्री पटली, की तुम्हाला अमेरिकेत नोकरी करायची संधी मिळते. अमेरिकेत काम करण्यासाठी वर्क व्हिसा अथवा एच १ बी व्हिसा लागतो, जो तुमचा ऐम्प्लॉयर तुम्हाला देऊ शकतो. एच १ बी मिळाल्यावर तुम्ही अमेरिकेत डॉलर कमवायला तयार होता.
असे किती तरूण, भारत सोडून अमेरिकेत आले. उच्च शिक्षण, हाय – टेक नोक-या, लठ्ठ पगार, उच्चभ्रू राहणीमान, दैनंदिन कामाचा सोपेपणा अशी अनेक कारणं आहेत. त्यासाठी घरदार सोडून साता समुद्रा पलिकडे यावे लागले. पूर्वीच्याकाळी मराठी माणूस कोकणातून, मुंबईत नोकरी शोधत यायचा. आज पुण्याहून, अमेरिकेत येऊन पोहचला. महत्त्वकांक्षा आणि कधी न संपणा-या गरजांसाठी माणूस नेहमी फिरतच राहणार…….