मासिक सदरे


रस्ते कसे ओलांडाल?

ऑकलँडच्या रस्त्यावर केशरी किंवा पिवळया फ्लूरोसंट रंगांची जाकिटे घातलेली व हातात वाहतुकीला थांबविण्यासाठी केशरी रंगाचा भला मोठा ‘STOP’ असे लिहिलेला आडवा दांडा धरून (त्याला Orange lolipop – ऑरेंज लॉलीपॉप म्हणतात) वाहतुक रोखणारी प्रायमरी शाळेतली मुले अनेकदा दिसतात. हा लहान मुलांच्या वाहतुकीसंबंधीच्या शिक्षणातील प्रात्यक्षिकाचा भाग असतो. हे शिक्षण मुलांना वयाच्या पाचव्या वर्षापासून द्यायला लागतात. हे शिक्षण अर्थातच सक्तीचे असते.

पहिला धडा असतो रस्ता कसा ओलांडायचा?

नियम – जिथे पादचारी मार्ग आहे – झेब्रा क्रॉसिंग आहे तिथेच रस्ता ओलांडा. प्रथम डावीकडे पहा, मग उजवीकडे पहा, मग रस्ता ओलांडा.शाळा भरायच्यावेळी व सुटायच्यावेळी वयाने जरा मोठी असलेली – म्हणजे 10 ते 11 वर्षांची मुले पॅट्रोलिंगचे काम करतात. त्यांच्या बरोबर दोन शिक्षकही असतात. लहान मुलांना रस्ता क्रॉस करताना मदत करण्याचे, थांबविण्याचे असे काम ही मुले शिक्षकांच्या मदतीने करतात. सकाळी शाळा भरतेवेळी सुमारे अर्धा तास व दुपारी शाळा सुटायच्यावेळी अर्धा तास असे हे काम मुले स्वेच्छेने करतात. त्यांना पोलिस डिपार्टमेंटमधील ‘पोलीस एज्युकेशन ऑफिसर’ येऊन वर्षातून दोन वेळा ट्रेनिंग देतो. तसेच अधूनमधून मुले शिकविल्यानुसार नीट काम करतात किंवा नाही हे पहायलाही पोलिस एज्युकेशन ऑफिसर येतो. आवश्यक त्या सूचना करतो. वर्षभर हे काम केल्यानंतर त्यांना जवळपासच्या एखाद्या करमणुकीच्या ठिकाणी जाण्याचा पासही बक्षीस म्हणून मिळतो.

मुलांना दिल्या जाणा-या शिक्षणात झेब्रा क्रॉसिंग असेल तिथे कसा रस्ता ओलांडायचा, ज्या रस्त्यावर काहीही खुणा केलेल्या नाहीत अशा ठिकाणचा रस्ता कसा ओलांडायचा, घरातून निघून रस्त्याला मिळणा-या ड्राइव्ह वे (या ड्राइव्ह वे वरून लोक आपापल्या गाडया घराबाहेर काढतात.) जवळून जाताना काय काळजी घ्यायची असल्या गोष्टी शिकवितात. गाडी रिव्हर्स करीत असताना अनेकदा लहानमुले मागे न दिसल्यामुळे वाहनचालकाच्या हातून अपघात होतात, ते टाळण्यासाठी हे शिक्षण लहान मुलांनाच देतात. गाडी चालकाने आरशात पाहून गाडी रिव्हर्स केली तरीही ब्लाइंड स्पॉटमुळे एखादी जागा दिसतच नाही व तिथे नेमके मूल असले तर अपघाताची चांगलीच शक्यता असते.

या व्यतिरिक्त भरधाव वाहतुकीचा रस्ता कसा ओलांडायचा, फूटपाथवरून जातानाही कोणती काळजी घ्यायची याची माहिती मुलांना देतात. कधी कधी फूटपाथ दुरुस्तीचे काम चालू असते. अशावेळी मुलांना रस्त्यावरून , अल्पसे का होईना, अंतर चालावे लागते. अशावेळी काय करायचे, शाळेपासून घरी जाण्याचा सर्वात सुरक्षित रस्ता कोणता हे नकाशाच्या मदतीने ठरवायचे, शाळेच्या वेळातच मुलांना मोठया ग्रूपने जवळपासच्या ठिकाणी चालत न्यायचे (ज्यावेळी दोन शिक्षक मुलांच्या मागे-पुढे असतात व मुले रस्ते कसे ओलांडतान , फूटपाथवरून चालतानाचे नियम पाळतात किंवा नाही याचे निरीक्षण करतात) अशा प्रकारचे शिक्षण मुलांना दिले जाते.

जरा मोठी झालेली मुले सायकलवरून शाळेत येतात. त्यावेळी हेल्मेट घालणे सक्तीचे असते. हे हेल्मेट “New Zealand Safety” या संस्थेकडून मान्यताप्राप्त असणे आवश्यक असते. मुलांना सायकल नीट चालविता येते किंवा नाही हे पालक ठरवितात. पण त्यांची सायकल चांगल्या स्थितीत आहे किंवा नाही, त्याचे ब्रेक चालू आहेत किंवा नाही या गोष्टी मात्र शाळा, सायकल विक्रेत्यांच्या एखाद्या रिप्रेझेंटेटिव्हकडून तपासून घेते. एखादा मुलगा सायकल नीट चालवित नाही, हेल्मेट घालत नाही असे दिसते तर त्याला सायकलवरून शाळेत येण्याला बंदी केली जाते. शाळेच्या आवारात व रस्ते क्रॉस करताना मुलाने सायकलवरून उतरणे सक्तीचे असते. मुलांच्या सायकली पोलीस ऑफिसर तपासतो व त्यांना रस्त्यावरून सायकल चालविण्यासंबंधी ट्रेनिंगही देतो.

याशिवाय मुलांनी शक्यतो चालतच शाळेत यावे यासाठी प्रयत्न चालू असतात. काही पालक स्वत:चे पाल्य व त्याच बरोबर इतर मुलांना आठवडयातून एकदा घरी आणण्या-नेण्याचे काम स्वेच्छेने करतात. त्याला “Walking Bus” असे म्हंटले जाते. दोन पालक व जास्तीत जास्त 12 मुले अशी ही टीम असते. शाळेच्या जवळपासच्या ठिकाणी वाहनांचा वेग कमी करण्यासंबंधी चळवळ चालू आहे. सिटी काउन्सिल शाळेपासून जास्तीत जास्त दोन किलोमिटर अंतरावरील मुलांनाच त्या शाळेत प्रवेश देण्यासंबंधी जातीने लक्ष घालते. त्यामुळे मुलांना चालत येणे शक्य असते. काही पालक जर गाडीतून मुलांना शाळेत सोडत असतील तर, मुलांनी गाडीत बसल्यावर सीट बेल्ट लावणे कसे आवश्यक आहे याचेही शिक्षण मुलांना देतात. मॅकडोनाल्ड या कंपनीतर्फे ऑकलँडमधील शाळांमधे ‘रोनाल्ड’ नावाची व्यक्ती सीटबेल्टचे शिक्षण देण्यासाठी सध्या येते. त्याने दिलेले हसतखेळत शिक्षण मुलांना भलतेच आवडते.

Land Transport Safety Authority, पोलीस खात्यातील Police Education Officer, BikeWise नावाची संस्था, मॅकडोनाल्ड अशा विविध संस्थाच्या एकत्रित प्रयत्नाने हे शिक्षण दिले जाते. त्यामुळे रस्त्यावर होणा-या अपघातांचे प्रमाण खूपच कमी असते.

आपल्याकडेही ५वी च्या पुढच्या मुलांना काही प्रमाणात हे शिक्षण दिले जाते. चौकात उभे राहून वाहतुकीचे नियमन
करणारी मुले अनेक ठिकाणी दिसतात. लहान मुलांपेक्षा मोठी माणसेच सगळे नियम धाब्यावर बसविताना दिसतात. मोठया माणसांना शिकविणेही अवघड. त्यामुळे अगदी लहान मुलांनाच या प्रकारचे शिक्षण जर सक्तीचे केले तर? तर पुढची पिढी नक्कीच जबाबदार होईल. लहान मुले सहसा नियम मोडायला तयार नसतात. हा जगभरचाच अनुभव आहे. म्हणूनच प्रायमरी शाळेतील शिक्षणातच वाहतुकीचे नियम शिकवायचे. रस्त्यातून धावायचे नाही, रस्ता योग्य ठिकाणीच क्रॉस करायचा हे त्यांच्या मनावर बिंबेल.मोठया शहरातील म्युनिसिपल कार्पोरेशन, पोलिसांची वाहतुक नियंत्रण शाखा, शाळेतील शिक्षक व पालक या सर्वांनी मिळून

जर या प्रश्नात लक्ष घातले, नियमांची लहानशी पुस्तके तयार केली किंवा शाळेत माहितीचे मोठमोठे बोर्ड लावले तर हे विचार मुलांच्यात रुजतील…… मुलेच पालकांना नियम मोडताना दिसल्यास अडवतील…. मग कोणत्याही शहरातले पहिले पान अपघातांच्या बातम्यांनी न सजता काही सकारात्मक घटनांनी सजतील…. याची खूप गरज आहे. मूल्य शिक्षणाचे महत्व शिक्षणक्षेत्रातील अधिकारी व्यक्तींना पटले असले तरी समाजाच्या लहानातल्या लहान घटकापर्यंत ते पोचविण्यासाठी सर्व समाजाने एकत्रितपणे या प्रश्नाकडे पहायला हवे.मुलांच्या सुरक्षिततेसाठी व पुढच्या सुसंस्कृत पिढीसाठी आपण पाश्चात्यांचे ह्या संबंधीचे अनुकरण नक्कीच करायला हवे.

तुम्हाला काय वाटते?

– सौ. कल्याणी गाडगीळ, न्युझीलँड