नदी/तलाव

तापी नदी

Tapi river तापी नदीचा उगम मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगावर मुलताई येथे होतो. या नदीचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. सूर्याने स्वत:च्या उष्णतेपासून संरक्षण मिळवण्यासाठी तापी नदी निर्माण केली आहे, असे पौराणिक कथांमध्ये म्हटले जाते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात राज्यातून वाहत जाऊन सुरत येथे अरबी समुद्रास तापी नदी मिळते. तापी नदीची एकूण लांबी ७२४ किमी असून नदीप्रणालीचे क्षेत्र ५७,६६२ चौकिमी आहे. महाराष्ट्रात तापी नदीच्या खो-यातून दर वर्षी पाण्याचा प्रवाह सुमारे ७२५० दशलक्ष घनमीटर वाह्तो.

तापी नदी मध्य प्रदेशातल्या बैतुल व पूर्व नेमाड या जिल्ह्यातून वाहत येउन महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात प्रवेश करते. नंतर धुळे जिल्ह्यातून बाहेर पडून गुजरातमधील सुरत या जिल्ह्यातून वाहते. त्यापूर्वी गुजरातमध्ये भरूच व सुरत या जिल्ह्यामधील सीमेजवळून वाह्ते.

बैतुल जिल्ह्यातून बाहेर पडल्यावर पूर्व नेमाड जिल्ह्यातील हासुद तालुका आणि महाराष्ट्रातील अमरावती जिल्हा यांमधील सीमेवरून काही अंतर जाउन पू . नेमाड मध्ये प्रवेश करते. पू. नेमाड जिल्ह्यात हर्सूद व ब-हाणपूर या गावांजावळून वाह्ते. ब-हाणपूर पासून खाली १४. ५ कि.मी वर अजगड (ता. रावेर) गावाजवळ जळगाव जिल्ह्यात प्रवेश करते. जळगाव जिल्ह्यात उजव्या काठावर रावेर , यावल, आणि चोपडा तसेच डाव्या काठावर एलदाबाद, भुसावळ, जळगाव, एरंडोल आणि अमळनेर हे तालुके आहेत. त्यापुढच्या धुळे जिल्ह्यात उजव्या काठावर शिरपूर, शहादे आणि तळोदे , तसेच डाव्या काठावर शिंदखेडे, नंदुरबार आणि नवापुर तालुके आहेत. गुजरातमधील सुरत जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी भरूच व सुरत या जिल्ह्यांमधील सीमेवरून वाह्ते.

या नदीच्या खो-याच्या संपूर्ण लांबीत दोन पातळीवर पूरजन्य मैदाने आढळतात. त्यातील जुना भाग सध्याच्या नदी पत्राच्यावर १५ ते २५ मि. पर्यंत दिसतो. त्यानंतरचा भाग जुन्यामध्ये घुसून बसला आहे. जुन्या भागात सापडलेल्या अश्मिभुत अस्थीनवरून व दगडी हत्यारांवरून त्याच काल उत्तर “क्लायस्टोसीन” ठरतो. गरम पाण्याच्या झ-याचे अस्तित्व, खोल दरीत असणारा तापीचा सध्याचा प्रवाह या गोष्टी भूतकाळातील घडामोडींमुळे येणारी अस्थिरता दर्शवितात.

जळगाव जिल्ह्यात तापीचे खोरे तिच्या दोन्ही तीरांवर सुमारे १२ ते १६ किमी रुंद पसरलेले आहे. दोन्ही काठांलगत ५ ते ६ किमी रुंदीच्या पट्टयात गाळाची माती असली तरी तापीला मिळणा-या उपनद्या हा भाग ठिकठिकाणी छेदतात आणि तेथे घळी पडतात, अशा घळीमुळे तो भाग शेतीला निरुपयोगी झाला आहे.

धुळे जिल्ह्यातील लंबित नदीच्या दोन्ही तटांवर ६० मि. उंच दरडी आढळतात. त्यात कंकर, वाळू , गाळ ई. पदार्थ दिसतात. तापी व तिच्या उपनद्या यांनी त्यांचे प्रवाह मार्ग अशा जाड थरांतून पोखरून काढले असल्यामुळे त्यांच्या दोन्ही काठांवर ते उघडे पडलेले दिसून येतात. तापीच्या खो-यात एलदाबादजवळ अश्मयुगीन हत्यारांचे पुरावे मिळाले आहेत.

तापी नदीवरील महत्त्वाची शहरे : ब-हाणपूर, चांगदेव, एलदाबाद , भुसावळ, नांदेड , थाळनेर, सारंगखेड, प्रकाशे, ताळोदे , मांडवी, सुरत.

अभयारण्ये : मेळघाट, यावल

पर्यटन स्थळ : पूर्णा नदीच्या काठावरील प्रसिद्ध निसर्गरम्य ठिकाण श्री क्षेत्र गंगामाई निरूळ गंगामाई, जि . अमरावती

तापी नदीच्या उपनद्या : तापी नदीस विदर्भाच्या पश्चिम भागातून वाहत येणारी पूर्णा नदी मिळते. ही तापीची मुख्य उपनदी आहे. तापी नदीला उजव्या किना-याने चंद्रभागा, भूलेश्वरी, शहानुर, नंदवान या उपनद्या मिळतात. बहुतेक सर्व नद्या सातमाळा -अजिंठा डोंगरात उगम पाऊन दक्षिणोत्तर वाहून डाव्या किना-याने तापीला मिळतात. या उपनद्या पेढी, काटेपुर्णा, मोरना , मण, व नळगंगा आहेत. तर तापी पूर्णेच्या संयुक्त प्रवाहास पुढे पश्चिमेकडे वाघुर, गिरणा, बोरी, पांझरा, बुराई या नद्या मिळतात.

अमरावती जिल्ह्यातील नद्या : मदारी, भाड, पूर्णा, सिपना, गाडगा, देवल, शिवा, सुखाड, पाताळ गंगा, नागन, रंगावली, वालेर, दुदान, वरेली, अजाण, वारी ई. Location Icon