नदी/तलाव

प्रवरा नदी

संगम चार नद्यांचा – उदय संगमनेरचा
Pravara river पुणे-नाशिक मार्गात संगमनेर छोटेसे पण ऐसिहासिक वारसा असलेले गाव. इ. स.पूर्व सुमारे २०० वर्षापूर्वी प्रवरेचा काठावर मानवी वस्ती निर्माण होउन हळू हळू छोटेसे गाव साकारत होते. या गावाजवळ एक-दोन नाही तर चक्क चार लहान- मोठ्या नद्यांचा संगम झाला म्हणूनच या गावाचे नामकरण ‘संगमिका’ झाले तेच आजचे संगमनेर होय. गावाच्या पश्चिमेला म्हाळुंगी अणि म्हानुटी नद्यांचा संगम होतो. म्हानुटी आपल्या पोटात सामावून घेत म्हाळुंगी पुढे सरकते तोच अमृतवाहिनी पयोधरा तिची वाट पाहत असते. म्हाळुंगी ही मोठ्या दिमाखाने पुढे सरकत थोरल्या बहिणीने धाकटीला भेटावे तसे पयोधरेला मिळते. संगमनेर मधील लोकांसाठी अमृतवाहिनी असणारी पायोधरा पुढे नाटकी नावाचा छोट्या नदीला आपल्यात सामावून घेत खळखळ प्रवाहात पुढचा प्रवास करीत असते. ही पयोधरा म्हणजेच आजची अमृतवाहिनी प्रवरा… अनंत काळापासून संगमनेरकरांना जीवनदाई ठरलेली प्रवरामाईच्या अमृतापासून संगमनेरकर आपली तहान आणि गरजा भागवत आहेत. अकोल्याहून येताना म्हानुटी अलगद म्हाळुंगीच्या पोटात शिरून तिला दिलेले आलिंगन, पुढे एक तुर्रेबाज वळण घेत म्हाळुंगीने आपल्यापेक्षा मोठ्या पयोधारेला ( प्रवरा) केलेली गळाभेट त्यावेळी बारमाही वाहणा-या नद्यांनी संगमनेरला फुलविले असे ते एकंदरीत चित्रं मनात साठविले व इतिहासात जाऊन पाहिले तर मनाला एक सुखद गारवा वाटतो. संगमनेर गावाला चोहोबाजूनी वाहणा-या नद्यांमुळे एक प्रकारचे सौंदर्य प्राप्त झाले होते. प्रवरा, म्हाळुंगी, म्हानुटी, नाटकी, या चार नद्यांमुळे गावाभोवती एक प्रकारचा नैसर्गिक खंदकच तयार झाला होता.

पुढे हीच प्रवरामाई संगमनेर मधून वाहत जाऊन धाकटे संगमनेर, निंबाळे, वाघापूर, जोर्वे, ओझर, असा छोट्या गावातून प्रवास करीत ओझरच्या धरणात तिचे पाणी अडविले जाते. त्यानंतर प्रवरेचा पुढचा प्रवास सुरु होऊन श्रीरामपूर तालुक्याला आपले अमृततुल्य पाणी देते. अकोले तालुकातून रतनगड येथे या प्रवरेचा उगम होतो. श्रीरामपूर मधून प्रवरा वाहत जाते पुढे नेवासा येथे त्रिवेणी संगमावर गोदावरी, प्रवरा, मुळा या नद्याचा संगम होतो यालाच त्रिवेणी संगम असे म्हणतात. Location Icon

– शेखर पानसरे

रंकाळा तलाव

Rankala talaw कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिराच्या पश्चिमेकडील ‘रंकाळा तलाव’ ही संध्याकाळी फिरण्याची मनोरंजक जागा लोकप्रिय आहे. छत्रपती शाहू महाराजांनी हे सरोवर बांधले. चौपाटी व इतर बागांनी हे सरोवर वेढले आहे. रंकाळयाच्या पार्श्वभूमीला ऐटबाज शालीनी महाल उभा आहे. महाराष्ट्रातील एकमेव ‘स्टार रेटेड हॉटेल’ म्हणजे शालीनी पॅलेस होय. रंकाळा आणि चौपाटी म्हटलं की, चटकदार भेळपूरी, रगडा पॅटीस आणि निरनिराळे चमचमीत पदार्थ आठवल्याशिवाय राहात नाही. चित्रपट उद्योगाचे एक केंद्र म्हणून पूर्वी कोल्हापूर प्रसिध्द होते. कोल्हापूरच्या स्टुडियोमधे अनेक मराठी व हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. रंकाळा सरोवरावरील ‘शांत-किरण’ स्टुडियो अनेक चित्रपटांच्या चौकटीत पकडला गेला आहे. भारतीय चित्रपटाला हा स्टुडियो म्हणजे एक अनमोल भेट होय. व्ही (वणकुद्रे) शांताराम हे या स्टुडियोचे मालक होते. इतिहासातील ते कलेचे दिवस म्हणजे, आजच्या सोनेरी स्मृती आहेत.

इ. सनाच्या ७५० ते ८५० व्या शतकामधे, ऐतिहासिक घटनांची साक्ष असलेली ही जागा, आधी एक काळया पाषाणाची भली मोठी खाण होती. इ. सन. ८०० ते ९०० मधे झालेल्या भूकंपामुळे या खाणीच्या नैसर्गिक संरचनेत बदल घडला. यांतील मोठया विवरातून भूमीगत पाणी साठू लागले. महालक्ष्मी मंदिरापासून अर्धा किमी. अंतरावरील एक भव्य कलाकृती म्हणजे, ‘रंकाळा’ तळे होय. इतिहासात या तळयाला सर्वाधिक महत्त्व मिळाले असून, या सर्वात जुन्या तळयापाशी, भव्य नंदीचे देऊळ आहे. ‘संध्यामठा’ची बांधणी याच तळयाकाठी झाली. नंदीची प्रतिमा विशाल आणि दुर्मिळ आहे. या तळयाच्या उत्तरेस शालीनी पॅलेस तर तळयाच्या नैऋत्य दिशेस ‘पद्माराजे उद्यान’ आहे. एक चित्रसदृश विलोभनीयता हया तळयास लाभली असून, तळयाच्या काठाने पाय मोकळे करण्याचा अनुभव आनंददायी आहे. थेट जलसान्निध्याचा अनुभव हा राजघाट व मराठाघाट येथून घेता येतो. राजघाटावर एक मनोरा आहे. हया मनो-यासमोरच शालीनी महाल व अंबाई तरण तलाव आहे. सिनेमा चित्रीकरणासाठी हे स्थान प्रसिध्द आहे. पावसाळयात, तळयातील संध्यामठ हा अधिकांश काळ पाण्यात असतो. Location Icon