नदी/तलाव

गोदावरी नदी

Godavari river भारतीय लोक नदीला माते समान मानतात. गोदावरी ही भारताची महत्त्वाची नदी आहे. गोदावरी नदीचा उगम पश्चिम घाटातील सहयाद्रीच्या पर्वत रांगेतील ब्रह्मगिरी येथे झाला. पौराणिक कथेनुसार गौतम ऋषींनी गोहत्येचे प्रायश्चित म्हणून भगवान शंकराची तपस्चर्या केली. शंकरांनी प्रसन्न होऊन ब्रह्मगिरी पर्वतावर जटा आपटल्या आणि गोदावरी पृथ्वीवर अवतरली. गौतम ऋषींनी गोदावरीत स्नान करून गोहत्येचे पाप धुतले. शास्त्रज्ञांच्या मते काही कोटी वर्षापूर्वी गोदावरी आंटारटीका खंडातून वाहिली असेल का ? याचा शोध चालू आहे. विभाजन पूर्व काळात दख्खनचे पठार आणि आंटारटीका एकाच गोडवन खंडाचा भाग होते असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे.

गोदावरी ही गंगेची आद्य बहीण आहे. भागीरथी गंगा पृथ्वीवर अवतारण्याचा अगोदर गोदावरीचा उगम झाला होता. त्यामूळे तिला दक्षिण गंगा नावानेही ओळखले जाते. येथेच १२ शिवजोतीर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर हे एक जोतिर्लिंग आहे. त्र्यंबकेश्वर पासून पुढे वाहतांना गोदावरीचा प्रवाह गुप्त होतो. २०-२५ किमीचा प्रवास करून गोदावरी नाशिक शहरातून वाहते. रामायण काळात नाशिकचा उल्लेख दंडकारण्य असा आहे. प्रभू रामचंद्रांनी १४ वर्षाच्या काळात पंचवटी येथे गोदातीरी पर्णकुटी उभारली होती. आजही गोदावरीत रामकुंड, सीताकुंड ही पवित्र कुंड आहे. नाशिक मध्ये गोदावरी प्रवाह बदलते, काटकोन वळण घेऊन पूर्वेकडे वाहते. त्यामुळे येथे चुंबकीय क्षेत्र तयार झाले आहे. मानवांच्या अस्थी येथे पाण्यात विरघळतात म्हणून देशभरातून भाविक येथे अस्थी विसर्जनासाठी येतात. अमृत – मंथनच्या वेळेस अमृताचे थेंब रामकुंड व त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त या ठिकाणी पडले. त्यामुळे दर १२ वर्षांनी सिहस्थ कुंभमेळा या ठिकाणी भरतो. देशभरातील साधू, संत-महंत व भाविक स्नानासाठी येतात. म्हणूनच गोदावरीला गंगे इतकेच महत्त्व आहे.

महाराष्ट्रामधून वाहतांना गोदावरी नाशिक, औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड या जिल्हातून वाहत आंध्रप्रदेश मध्ये प्रवेश करते. इंद्रावती, वैनगंगा, पैनगंगा, मांजरा, प्राणहिता, दारणा, प्रवरा, कादवा या गोदावरीच्या प्रमुख उपनद्या आहेत. गोदावरी ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी नदी व जीवनदायिनी आहे. नाशिक मध्ये गोदावरीवर इंग्रजांनी गंगापूर धरण बांधले आहे. जालना यथे जायकवाडी हे मोठे धरण आहे. नांदूरमधमेश्वर येथे इंग्रजकालीन छोटा बंधारा असून महाराष्ट्रातील पक्षी अभयारण्य आहे. नांदेडमध्ये विष्णूपुरी प्रकल्प आशियातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प आहे. गोदावरी खो-याने महाराष्टाचे ५०% हून अधिक क्षेत्र व्यापले आहे. त्यात नाशिकचा दक्षिण भाग, नगर व मराठवाडयाचा समावेश होतो. जवळ – जवळ ९५० किमीचा प्रवास करून गोदावरी आंध्रप्रदेश राज्यात प्रवेश करते. तेथे पूर्व गोदावरी व पश्चिम गोदावरी जिल्हे आहेत. गोदातीरी यथे दर १२ वर्षांनी पुष्कर मेळावा भरतो त्याला कुंभमेळया इतकेच महत्त्व आहे.

गोदावरीच्या खो-यात काही दिवसांपूर्वी खनिजतेल व नैसर्गिक वायूचे साठे सापडले आहेत. रिलायंस कंपनीद्वारे गोदावरी बेसिन मध्ये मोठ्या प्रमाणवर उत्पादनाचे काम चालते. येथे गोदावरीचे पात्र विस्तृत असल्याने मोठया प्रमाणावर अंतर्गत जल वाहतूक चालते. मासेमारी देखील इथला प्रमुख उद्योग आहे. गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशात शेती केली जाते. सागरालगतच्या प्रदेशात मंग्रोह झाडांची जंगले आहेत. त्यांना स्थानिक तेलगु लोक माडा अडवी म्हणतात. या झाडांमूळे सुनामी, चक्रीवादळ, नैसर्गिक आपत्ती पासून संरक्षण होते.

बंगालच्या उपसागराला मिळण्यापूर्वी ८० किमी अगोदर गोदावरीचे दोन उप जलवाहिन्या मध्ये रुपांतर होते. एकूण १४५० कि.मी प्रवास करून राजमुंद्री जवळ गोदावरी बंगालच्या उपसागराला मिळते.

गोदावरी हि भारताची दुस-या क्रमांकाची नदी आहे. तिच्या एकूण लांबी नुसार (१४५०) जगात तिचा ९२ वा क्रमांक आहे.पश्चिम घाटातून उगम पाऊन दख्खनचे पठार, आंध्रमध्ये पूर्वघाट असा प्रवास करते. भूगोल नकाशात गोदावरी ही महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या राज्यातून वाहते असे दाखवले जाते पण असे म्हणतात गोदावरी ही महाराष्ट्र, मध्प्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातूनही वाहते. एकूणच धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक दृष्टया गोदामाईचे लोकांमध्ये विषेश स्थान आहे.

अमरावती जिल्ह्यातील नद्या Location Icon