कोल्हापूर जिल्हयातील शिरोळ तालुक्यातील शेवटचे गाव ‘खिद्रापूर’ होय. कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम इथे आहे. सर्व प्रदेश हिरवागार करणाऱ्या ह्या संगमानंतर पूर्वेकडे येणारी हे जीवनदायी नदी गावास वळसा घालून परत पश्चिमेकडे फिरते. खिद्रापूर म्हणजे आहे, महाराष्ट्र-कर्नाटक प्रदेशांची सीमारेषा.
शिरोळ हा तसा वैशिष्टयपूर्ण तालुका. जीवनाला सर्व दिशांनी स्पर्श करणारा असा हा प्रदेश. त्यात नरसोबावाडीचे दत्त मंदिर, शाहु महाराजांनी वसविलेले व्यापारी केंद्र जयसिंगपूर, ‘कुरुदंवाडकर’ सरकारचे राजवाडे, शिरोळचा साखर कारखाना, घरातील एक तरी व्यक्ती भारतीय सेनेत असलेली… ‘सैनिक टाकळी’ हे खिद्रापूरचं वैशिष्टयं. आवर्जून उल्लेख करण्यासारख्या आणखी दोन गोष्टी म्हणजे, खिद्रापूरचे ‘कोपेश्वर मंदिर’ आणि ‘जैन मंदिर’ होय. या मंदिरांच्या सौदंर्यानं व शिल्पकलेनं भल्याभल्या वास्तुविशारदांना तोंडात बोटं घालायला लावली आहेत.
खिद्रापूरचा प्रवास
३०६ हेक्टर जमीन असलेले, खिद्रापूर हे गाव ३००० लोकवस्तीचे छोटेसे गाव. हे गाव देवळांच्या सेवकांना इनाम म्हणून दिलेले. यामध्ये वाजंत्री, गुरव आदी आले. एक धर्मनिरपेक्ष गाव म्हणून तालुक्यात प्रसिध्द.
उत्सव
विशालतीर्थ यात्रा भरते यावेळी हजारो भाविक कृष्णा नदीच्या पात्रात स्नान करून दर्शन घेऊन जातात. गावातील सर्व पंथाचे लोक ग्रामदेवतेस नैवेद्य दाखवितात व आपली मनोकामना पूर्ण करण्याची विनवणी करतात.
कुरुंदवाड मार्गे खिद्रापुराला जाता येतं. दुतर्फा हिरवीगार ऊस शेती, केळीच्या बागा, मध्येच लागणारी नारळाची झाडे, आणि पुष्कळ झुळझुळ पाणी. संपूर्ण प्रवासभर आनंदच आनंद जाणवत राहतो.
खिद्रापूर मंदिराविषयी
बस स्थानकावर उतरल्यावर पूर्वेस भव्य कृष्णेचे पात्र आणि पश्चिमेस एक अद्वितीय मंदिर दिसल्यावर नजरेचं पारणं फिटतं. मंदिराचं आवार सुरू झाल्यावर एक फलक आहे. त्यात आपल्याला वाचायला मिळते की हे प्राचीन मंदिर केंद्र शासनाच्या पुरातन संरक्षक विभागाकडे ‘संरक्षित’ घोषित करण्यात आले आहे.
खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर हे हेमाडपंथी शैलीचे एक अजोड शिल्प मंदिर आहे. इ.स. १००० ते १३५० हा यादवांच्या कारकिर्दीचा वैभवशाली कालखंङ यादवांचा मुख्य प्रधान म्हणजे, ‘हेमाडपंत’. हे एक विद्वान वास्तूविशारद होते. हेमाडपंथी शैलीची मंदिरे आपल्याला जंगलात किंवा पठारावर कुठेही आढळतात. नदीकाठी दोन दगडांच्यामध्ये आधार म्हणून खोबणी आणि कंगोरे यांचा वापर करुन, इतर कुठलाही आधार न घेता, दगडांची कलात्मक रचना करुन मंदिर बांधण्याची कला या वास्तु-विशारदाने प्रचलीत केली. खिद्रापुरचे कोपेश्वर मंदिर हे हेमाडपंथी शैलीचा एक अजोड नमूना आहे.
मुख्य प्रवेशद्वारानंतर नगारखाना लागतो. प्रवेश-भिंतीवरील दोन हत्ती आपले स्वागत करत आहेत असं वाटतं. एका वेळी एकच व्यक्ति प्रवेश द्वारातून जाऊ शकेल इतकं ते अरूंद आहे. एके काळी ह्या देवळाचा आसमंत सनईच्या मधुर स्वरांनी जिवंत होत असे. नगा-याच्या नादाने दुमदुमत असे.
स्थापत्य रचनेचा एक उत्कृष्ट नमूना असलेले हे मंदिर तारकाकृती आहे. मध्यवर्ती स्वर्गमंडपालाच यज्ञमंडप असेही नाव आहे. एका मोठया, अखंड शिलेवर अट्ठेचाळीस खांबांच्या आधाराने गोल छत उभे आहे. यज्ञमंडपाच्या गोलाकार छताखाली नऊ ग्रहांच्या नऊ कलाकृती विलोभनीय आहेत. प्रत्येक खांबामधील कोरीव काम बघत राहावं असं वाटतं. एकाच साच्यातून काढल्याप्रमाणे या कोरीव कामामध्ये एकसंधता, सुबकता आहे. दगडाची चकाकी व मऊपणा त्या खांबांवर आपले प्रतिबिंब उठावे अशी पारदर्शकता पाहून मन थक्क होऊन जातं. या स्वर्गमंडपाचे उघडे छत हे होम-हवनाच्या समिधांचे धूर जाण्यासाठी ठेवले आहे. आणि छिद्रांमुळेच या गावाचे नाव छिद्रापूर… ते खिद्रापूर असे पडले.
स्वर्गमंडपाच्या नंतर येतो तो सभामंडप. सभामंडप हा सुध्दा दगडी खांबांवर उभा आहे. वरच्या बाजूला खोबणी कांगारीच्या साह्याने संधी साधलेले कलात्मक छत आहे. या दालनाला सहा खिडक्या, तीन दरवाजे आहेत. या सभामंडपाच्या मध्यभागी गोलाकार शिळा आहे. त्यावर उभे राहून वर पाहिले की, कमळाच्या आकाराचे सुंदर नक्षीकाम पर्यटकांच्या मनाला भुरळ पाडते. या मंडपाच्या खांबावर रामायण, महाभारत, पंचतंत्र त्याचप्रमाणे प्रचलित कथांवर सुंदर दगडी कोरीव काम आहे. पाने, फुले, नर्तकी यांच्या कलाकुसरींनी नटलेले हे दालन खरोखरच अप्रतिम आहे.
या नंतरचा मुख्य भाग म्हणजे, गर्भगृह. जय-विजय या दोन द्वारपालांनी गर्भगृहाचा दर्शनी भाग सजला आहे. सध्या मात्र त्यातील एकच द्वारपाल शिल्लक राहीला आहे. मोठया दरवाजाच्या पायथ्याशी कासव व बाजूला भितीवर यक्ष यक्षिणीचे दर्शन होत आपली नजर खिळते ते दक्षिणाभिमुख असणाऱ्या गाभाऱ्यातील शिवलिंगावर. हे शिवलिंग किंचिंत तांबूस रंगाचे असून शाळुंखा रंगाने काळी कुळकुळीत आहे. गाभाऱ्यात भरपूर गारवा जाणवतो. गर्भमंडपाच्या दालनात तीन लहान कमानी आहेत, परंतु तेथील सिंहासनांवर मूर्ती मात्र नाहीत.
शिवलिंग व कोपेश्वराचे दर्शन घेऊन ज्यावेळी सभामंडपात येतो त्यावेळी उजव्या बाजूला मंदिर पाहण्यास बाहेर पडल्यावर एक शिलालेख आढळतो. प्राचीन भाषेतील हा शिलालेख अनाकलनीय आहे. वाटाडयांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव सम्राट सिंहाण देव याने खिद्रापूरच्या लढाईत मोठा विजय मिळवून या मंदिराचा जीर्णोध्दार केला आणि मंदिराच्या खर्चासाठी ‘कुडलदामवाड’ नावाचे दान दिल्याचा या शिलालेखात उल्लेख असल्याचे सांगितलं जातं. बाहेरुन मंदिराचे निरीक्षण करताना वेरुळच्या लेण्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. संपूर्ण मंदिर एकशे आठ गजपीठांवर विराजमान आहे. हत्तींच्या वरच्या रांगेमध्ये कोरलेल्या देव, यक्ष, यक्षिणी यांची रूपे फार मोहक आहेत. पण खालील हत्तीची ओळ अखंड अशी मिळत नाही. या तळातील गजरुपानंतर साधारणपणे ८ ते ९ फुटावर अनेक नर्तकी, नर्तक, वादक आणि शस्त्रधारी शिल्पांची मुक्त उधळण शिल्पकाराने येथे केली आहे. त्यावेळच्या बांधकामांची रचना, धार्मिक, सांस्कृतिक परंपरा व या परिसरातील तत्कालीन राजांचा वैभवशाली कालखंड, त्याचं कलाप्रेम खिद्रापूरमुळे मनात अधोरेखित केलं जातं.
जैन मंदिर
हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर, खिद्रापूर मंदिराच्या समकालीन आहे. जैन मंदिर गावाच्या पश्चिमेस आहे. खिद्रापूरपेक्षा थोडे छोटे आहे. पण आपले स्वतंत्र अस्तित्व आणि परंपरा जपणारे आहे. मंदिराला तीन प्रशस्त दालने, आणि पायापासून छताची उंची साधारणत: २० फूट आहे. या मंदिरात साडे-सहा ते सात फूट उंचींचे आदिनाथांचे भव्य शिल्प आहे. या मूर्तीच्या सौदंर्याने अनेक मुनी, पर्यटक, श्रमण आकर्षित होतात आणि थोडे दिवस येथे तप करुन जातात. असे ही म्हटलं जातं की, या मूर्तीच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. ‘दक्षिण भारत जैन इतिहास’ या पुस्तकातून डॉ. विलास संघवे यांच्या टिपणावरून मिळणारा या मंदिराचा इतिहास असा आहे की, शिलाहार राजे गंडरादित्य यांचा महासामंत (सेनापती) निंबदेवरस यानं हे जैन मंदिर बांधलं. सामंत निंबदेवरस हा जैन धर्मीय सामंत होय. तो नाकीरस व चंपाबिकाचा द्वितीय पुत्र होय. याला भिल्लरस व काबरस नावाचे दोन कर्तबगार भाऊ होते. निंबदेवरस याला एक बहिण होती. तिचे नाव कर्णादेवी. हीच कर्णादेवी गंडरादित्याला दिली होती. राजाची राजमाता नागलादेवी ही सुध्दा धार्मिक होती. याचकाळी शिलाहार राजवंशजांनी १०८ जैन मंदिरे बांधली. त्यापैकी कोल्हापूर परिसरातील हे जैन मंदिर. इ.स. ११०५ ते इ.स. ११४० पर्यंत शिलाहारांची राजवट होती. त्या काळात भरभराटीस आलेली ही शिल्पकला, जशी जतन झाली पाहिजे तशी आज जतन होत नाही, याचेच फार दु:ख वाटते.
१. जागतिक संदर्भात, खिद्रापूर हे आकर्षक स्थळ असूनही ‘पर्यटन स्थळ’ म्हणून त्याचा विकास नाही.
२. कागदोपत्री हजारो रुपयांचा परिसर विकास खर्च तेवढा दाखविला आहे.
३. महाराष्ट्र पर्यटन मंडळाची कोल्हापूर दर्शन बस इकडे फिरकत नाही.
४. राजकीय वर्चस्व असलेला तालुका, पण परिसर विकास करण्यात मात्र कुचकामी ठरलेला.
समारोप
कितीही प्रसिध्दीच्या अंधारात असले तरी बरेच शिल्प-प्रेमी, देशी व परदेशी पर्यटक उन्हाळयात या जागेस भेट देतात. अनेक शाळांच्या सहली येथे येतात. कला शाळांच्या कार्यशाळा, वर्षातून एखादा तरी साप्ताहिक शिक्षण वर्ग येथे भरतो. येथील शिल्प सौदर्याने अनेक पर्यटक मोहीत होतात. आपलं एक सांस्कृतिक शक्तिपीठ व धर्मपीठ असलेलं हे अतिशय सुंदर स्मारक जतन कसं होणार हाच भेडसावणारा प्रश्न आहे.
संकलक : पद्मनाभ कागवाडे