आज स्वच्छं ऊन पडलं होतं. निळं निळं आकाश मस्तं दिसत होतं.सॉलिड गार वारा सुटला होता.
सगळयात महत्वाचं म्हणजे उद्या माझा वाढदिवस होता!!
आयूनी मला हव्या त्या मित्रमैत्रिणींना बोलवायची परवानगी दिली होती. आम्ही सगळे जमून सिनेमा बघणार होतो. मला भरपूर प्रेझेंट्स मिळणार होती. चीजी पास्ता, आईसक्रीम…. मी जामेजाम खूष होते.
पण हा आजचा दिवस संपतच नव्हता…
कधी रात्र होणार…. आणि कधी उद्याची सकाळ….!!
आयू उशीखाली काय गम्मत ठेवेल… असा विचार करत झोपून गेले.
मज्जेची स्वप्नं पडत होती बहुतेक…. एव्हढंच आठवतंय की आयू उठवून विचारत होती,’ राधू काय होतंय? हसतेस काय पिल्ला?’ आणि मी परत झोपून गेले.
तर आयू परत उठवायला लागली…. ‘राधू…. उठ पिल्लू…. गम्मत बघ… ‘
अरे हां… माझा वाढदिवस ना आज….!! तसेच डोळे बंद ठेऊन ऊशीखाली हात घातला…. काहीच नव्हतं… ?!
‘आयू?’
‘इकडे ये राधू…’ आयू खिडकीपाशी उभी होती.
मला ऊब आली होती छान….
आयूनी मला उचलून घेतलं… म्हणाली, ‘हॅपी बर्थ डे राधू….’!! आणि बाहेर बोट दाखवलं.
अजून पूर्ण उजाड्लं नव्हतं… आणि मी झोपेत होते…
बघितलं तर सगळं वेगळंच दिसत होतं…पांढरं….
झाडं पांढरी…. रस्ते पांढरे…सगळंच पांढरं….!
मला काही कळेच ना… आयू माझ्याकडे पाहून हसत होती….
माझ्या एकदम लक्षात आलं… की तो बर्फ होता… स्नो फॉल..!!
सॉलिड…!!
मी एकदम उडी मारली….!
आयू म्हणाली..’चल, बाहेर जाऊ या…!’
आम्ही भराभर स्वेटर चढवले…. कान टोपी, हात मोजे घालून बाहेर आलो….
सगळीकडे पांढरंशुभ्र…!!! पार्किंग मधल्या रंगीत गाडया, झाडांची पानं, घरांची छप्परं… रस्ता…!!
पाऊल टाकलं तर भुस्सकन आतच गेला पाय..बर्फ मऊ होता…! फ्रीझ मधल्यासारखा नव्हता…!
मी बघतच बसले…तेव्हढयात माझ्या पाठीवर काहीतरी पडलं…
आयूनी माझ्या पाठीवर बर्फाचा गोळा टाकला होता…!!! आणि पुढचा गोळा तयार करत होती..मग मी ही मग बर्फात हात घातला… आणि फेकाफेकी सुरु…!!
लागत नव्हते ते गोळे…. फुस्सकन फुटत होते अंगावर…!! जाम धमाल..!!
किलियान आणि ऍलेक्स ही आले ….
अंगावर ढीगभर कपडे घातलेले आम्ही खूप विनोदी दिसत होतो…!फेकाफेकी मुळे पांढरे झालो होतो. नाकं मात्र लाल…!
आयूबरोबर आत गेले… गरम दुध पिऊन शाळेसाठी तयार झाले…
बर्फातून चालत शाळेत जायला सॉलीड धमाल येणार होती..!
परत बाहेर आलो.
तर एक भला मोठ्ठा स्नो मॅन केला होता…बर्फाचे दोन गोळे… एकावर एक… त्यावर डोक्याचा गोळा… डोळयाच्या जागी दोन दगड… डोक्यावर टोपी…गळयात स्कार्फ… आणि नाकाच्या जागी गाजर..!!! मस्त दिसत होत…. मी खूप हसले…. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मज्जाच झाली होती… बर्फ पडला होता…
आयूचा हात धरून हळूच बर्फावर नक्षी काढत मी निघाले…
स्नो मॅन च्या मागे लपलेल्या किलियान आणि ऍलेक्स नी मला ‘भॉ’ केलं… मला घाबरवलं … आणि ओरडले… ‘हॅप्पी बर्थ डे राधा…!!!!!
– मधुरा डहाणूकर
मधुरा डहाणूकर ह्या मराठी रंगभूमी, दूरदर्शन मालिकां मधील प्रसिध्द अभिनेत्री आहेत. साहित्य आणि कलेचा वारसा लाभलेल्या मधुरा डहाणूकर पुण्याच्या ‘चिल्ड्रन फिल्म सर्कल’ च्या संस्थापक कार्यकर्त्या आहेत.