आयूच्या मैत्रिणी कडे गणपती बसणार होता, इथे इंग्लंड मधे..! आम्हाला बोलावलं होतं …पूजेला आणि आरतीला..!
तर मी आयूला विचारलं की, ‘इथे यू के मधला गणपती कसा असतो…? त्याला सोंड असते का आणि पायाशी मोदकाचं ताट ?? उंदीर?’
तर आयू हसायलाच लागली… आता यात काय होतं हसण्यासारखं?
मला वाटलं की यू के मधलं सगळंच वेगळं आहे… तर गणपती ही वेगळा असेल…!!
तर आयू मला उत्तर द्यायचं सोडून हसतंच बसली…
म्हणाली, ‘राधू, अगं, गणपती हा गणपती असतो! यूके मधे काय आणि पुण्यात काय? सोंड, गोलमटोल पोट, हत्तीचे कान, पायाशी उंदीर आणि मोदकाचं ताट असणारंच..!! इथे रहाणारी भारतीय माणसं सुध्दा पुण्यातल्या सारखीच पूजा करतात त्याची… अभ्यासाचा बाप्पा म्हणून…!!
देश दुसरा असला तरी सगळं बदलंत नाही काही…!!! आता मला सांग… पुण्यातली राधू आणि इथली राधू सारखीच आहे की नाही?? गोडु आणि वेडु?? ‘
पण मी फुगुन बसले होते…. इतकं कशाला हसायचं??
संध्याकाळी एलन आली खेळायला…खूप खेळलो…मी तिला गणपती ची गोष्ट सांगितली… एलिफंट गॉड…!! तिचे निळे डोळे मोठे करून ऐकत होती…
मग आम्ही बागेतल्या फुलपाखरांना नावं दिली…. एक मोठ्ठं ढब्बू होतं…. ते झालं गणपती फुलपाखरू…! आणि बाकी सगळे त्याचे सैनिक…!!! मज्जा आली…
मी आणि एलन नी ठरवलं की आज तिनी माझ्याकडेच रहायचं…. मग मी तिला गणपतीच्या बाबांच्या कपाळावर असलेल्या तिस-या डोळयाची गोष्ट सांगणार ….!!! आणि ती मला जिजस् ची….त्याचा जन्म तबेल्यात झाला म्हणे….
आयू मधेच येऊन बोलावून गेली… मी तिला ‘एलन ला राहू दे का?’ विचारलं आणि ती ‘हो’ म्हणाली…. मग मी हसले….!! कट्टी सोडली….
आम्ही दोघी जिजस् आणि गणपती च्या गोष्टी सांगत ऐकतच झोपलो….
सकाळी आयू छान साडी नेसून तयार झाली… मी परकर पोलकं … यूके च्या गणपती च्या पूजेला जायचं होतं ना….!! एलन नी छान ख्रिसमस चा पांढरा फॉक घातला होता….चम चम टिकल्या लावलेला… परी सारखी दिसत होती….!! सॉलिड नटलो होतो आम्ही सगळया….!! रोज पॅण्ट घालून शाळेत जातो…. आज नटायची मज्जा..!!
पूजेच्या घरी पोचलो….छान आरास मांडली होती… मस्त वास येत होता…. मिठाईचा.. उद्बबत्तीचा…!! एलन ला सॉलिड छान वाटत असणार… वेगळंच….! एलिफंट गॉड बघून ही ती खूष झाली…. मला काय काय विचारत होती…. तिने गोष्ट ऐकली होती ना काल….मग आम्ही मस्त मोदकाचं जेवण जेवलो…. एलन ला नाही आवडलं.. खूप गोड वाटलं तिला … तिनं वरण भात खाल्ला…
उद्या शाळा….
सगळी तयारी करून लवकर झोपले….दमले होते… कधी झोप लागली कळळंच नाही…..
स्वप्नात यूके मधला गणपती आमच्या गाडीत बसला होता…. एलन आणि माझ्या मधे….
आणि आम्ही सगळे टाळया वाजवत ख्रिसमस ची गाणी म्हणत होतो….!!!!
– मधुरा डहाणूकर
मधुरा डहाणूकर ह्या मराठी रंगभूमी, दूरदर्शन मालिकां मधील प्रसिध्द अभिनेत्री आहेत. साहित्य आणि कलेचा वारसा लाभलेल्या मधुरा डहाणूकर पुण्याच्या ‘चिल्ड्रन फिल्म सर्कल’ च्या संस्थापक कार्यकर्त्या आहेत.