शाळेत जाताना रोज एक चर्च दिसायचं. दगडी. आत काय असेल असं वाटायचं. भीती वाटायची कसलीतरी… आत जायला मिळालं नव्हतं कधी! जीजस चा पुतळा होता बाहेर छोटा. तो बघून कसंतरीच व्हायचं, वाईट वाटायचं!
एक दिवस घरी नोटिस आली की ज्यांना ख्रिसमस च्या गाण्याच्या कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल त्यांनी दर बुधवारी शाळेत थांबायचं. मी आयूला विचारलं. ती लगेच ‘हो’ म्हणाली. एलन ही येणार होती.
आमची प्रॅक्टिस चालू झाली.
मिस हॉवर्ड पियानो वाजवत आम्हाला गाणी शिकवायच्या..! सगळी जीजस आणि ख्रिसमसची! तीन गाणी जरा शांत होती. थोडासा कंटाळा यायचा कधी कधी. पण चौथं गाणं सॉलिड धमाल होतं. असं वाटायचं की सारखं तेच म्हणावं!! या गाण्याला जागच्या जागी करता येतील अश्या छोटा स्टेप्स बसवल्या होत्या. आणि असे असे हात करायचे आणि पाय ही! हे गाणं म्हणताना छान वाटायचं. एलन ची जागा माझ्या शेजारीच होती.(पहिली तीन गाणी म्हणताना कंटाळा आला की बाकीची मुलं गाणं म्हणताना कशी तोंडं करतायत ते आम्ही चोरून बघायचो आणि हसायचो..!चौथ्या गाण्याला मात्र लक्ष द्यायचो!!)
कार्यक्रमाचा दिवस जवळ यायला लागला! ५/६ शाळा असणार होत्या. आमची प्रॅक्टिस सॉलिड जोरात चालू होती. घरी, शाळेत, गाडीत, रस्त्यात … फक्त आमची गाणीच….!!
आयू येणार होती बघायला…. व्हिडिऒ कॅमेरा घेऊन. तिला सगळं शूटिंग करायचं होतं. आतून नं बघितलेल्या चर्च चं….आणि आमच्या गाण्यांचंही..
आधी मोठया मुलांची गाणी झाली. बघायला आलेले सगळे आईबाबा शांत बसून ऐकत होते. मला तर कंटाळा यायला लागला होत… गाण्यांचा कार्यक्रम आणि सगळे असे गप्प का बसले होते?? चर्च मधे आहोत म्हणून का? असं शांत बसून ऐकायचं असतं क इथे?
सगळ्यात शेवटी आमची शाळा! आता आम्ही खूष! मिस हॉवर्ड ने १-२-३ म्हटलं…. मग आधी आमची शांत गाणी झाली. आणि मग माझं आवडतं ‘दंगा’ गाणं…..सॉलिड हातवारे असलेलं… हे ही गाणं सगळे गप्प बसून ऐकणार??
पियानोवर पहिली ऒळ वाजली…. आणि आम्ही एका जागी डुलत, नाचत गायला लागलो…
‘वी आर ख्रिसमस क्रॅकर्स……’
आणि सॉलिड गम्मत झाली. ऐकायला आलेले सगळे टाळ्या वाजवत ताल धरायला लागले. काही काही आईबाबा तर आमच्याबरोबर गात ही होते….सॉलिड…!! गाणं संपल्यावर सगळ्यांनी खूप टाळया वाजवल्या….
माईक वर एका काकांनी सांगितलं….’इतकी लहान मुलं इतकं छान गाणं म्हणत असतील, तर त्यांची शाळा किती छान असेल?’
सगळे ऒरडले,’खूप छान…’
‘आणि शाळा इतकी छान असेल तर हेड टीचर किती छान असतील??’
‘बोलवा त्यांना…..’ सगळे परत ऒरडले….
मिस हॉवर्ड ने खूण केली….मी आणि एलन त्यांना घेऊन आलो… मिस्टर ऍन्ड’… आमचे प्रेमळ हेड टीचर….तेव्हढात पियानोवर ‘दंगा’ गाण्याची पहिली ऒळ वाजली….’वी आर ख्रिसमस क्रॅकर्स……’ आम्ही पटकन गायला लागलो…. नाचत, डुलत, असे असे हात करत…
आणि सॉलिड म्हणजे, आमचे हेड टीचर ही आमच्या बरोबर नाचत होते…. गात होते….
चर्च मधलं सगळं एकदम बदलून गेलं… आता सगळे शांत बसले नव्हते….. जीजस च्या पुतळ्याकडे बघून कसंतरी होत नव्हंतं…. सगळं सॉलिड खूश होऊन गेलं होतं….
मी आयूकडे चोरून बघितलं… तर ती ही गात होती… एकिकडे सगळं शूट करत होती…. हसत होती…. मला माहितेय तिच्या मनात काय असेल …..
‘राधू, तू मोठी झालीस ना, की हे सगळं परत बघताना तुला किती सॉलिड मज्जा येईल…!!?’
– मधुरा डहाणूकर
मधुरा डहाणूकर ह्या मराठी रंगभूमी, दूरदर्शन मालिकां मधील प्रसिध्द अभिनेत्री आहेत. साहित्य आणि कलेचा वारसा लाभलेल्या मधुरा डहाणूकर पुण्याच्या ‘चिल्ड्रन फिल्म सर्कल’ च्या संस्थापक कार्यकर्त्या आहेत.