राधाची डायरी


राधाची डायरी – पान १५

Radha Diaryस्वप्नात तेच होतं रात्रभर…! राजपुत्र, त्याचे भरजरी कपडे, राजवाडा, दागिने, रथ…..सगळ्यांना कामं सांगणारा आणि आपण सोनेरी खुर्ची मधे बसून मिठाई खाणारा…!!

असा खराखरा राजपुत्र आयूच्या युनिव्हर्सिटी मधे येणार होता आणि मी जाणार होते त्याला पहायला…..

शाळेत टीचर आज एडवर्ड राजाची गोष्ट सांगत होत्या…. सगळं तेच… लढाया, शूर राजे, राण्या, राजवाडे… सॉलिड मस्त वाटत होतं मला….!!

शाळा कधी एकदा सुटते आहे आणि मी त्या शूर राजपुत्राला बघते आहे असं झालं होतं मला…!!!

“गर्दी खूप असेल का? सगळ्यांनाच बघायचं असेल त्याला! बोलेल का तो सगळ्यांशी? घोडाच्या रथातून येईल का?”

माझी बडबड चालूच होती. आयू फक्त हसत होती. मला म्हणत होती, “बघ आता तूच!! युनिव्हर्सिटी मधे एका नव्या बिल्डिंगचं उदघाटन करायचं आहे त्याला… म्हणून येतो आहे राजपुत्र…काम आहे त्याचं ते!”

आम्ही पोचलो लायब्ररी मधे..! अजून वेळ होता बहुतेक…काही गर्दीच नव्हती…सगळं रोजच्यासारखंच होतं. सगळे हातातून पुस्तकाचे गठ्ठे घेऊन सगळे नेहेमीसारखेच येत जात होते.

मी आयूला विचारलं, “नाही येणार का आता राजपुत्र? कॅंसल झालं?”

आयूनी सेक्युरिटी गार्डला विचारलं… तो म्हणाला, “येणार आहे ठरल्या वेळेला !”

मी काचेला नाक लाऊन बाहेर बघत बसले वाट पहात. रथाची!!

थोडावेळाने एकदम गाडया आल्या खूप…दहा, बारा…! सगळ्या काळ्या आणि चकचकीत..! त्यातली एक गाडी सॉलिड लांबलचक होती… एकाला एक जोडल्यासारखी…

आयू म्हणाली, “लिमोझिन…!”

सगळ्या गाडयांमधून भराभर माणसं उतरली. सगळ्यांनी सॉलिड सेम कपडे घातले होते.

लिमोझिन मधून एक माणूस उतरला. काळा सूट आणि चकचकीत बूट… त्याच्या कोटाला एक छान फूल लावलं होतं. त्याला पाहिल्या पाहिल्याच लक्षात आलं की हाच तो..!! प्रिंस ऑफ वेल्स… प्रिंस चार्ल्स..!! खरा राजपुत्र…!! चकचकीत कपडे नव्हते नाटकातल्या सारखे .. तरी वेगळाच दिसत होता. रुबाबदार!! सॉलिड!

सगळ्यांशी नीट हसून बोलत होता…. सगळं नीट फिरून बघत होता. उदघाटन झालं आणि मिठाईही न खाता पटकन निघूनही गेला.

मग माझ्या लक्षात आलं की मी एकटीच त्याला बघत नुसती उभी आहे. बाकी सगळे आपापलं काम करत होते. लायब्ररी मधली माणसं पुस्तकं मोजत होती, शिक्के मारत होती, अभ्यास करत होती. वाचत होती, लिहीत होती…!! एवढा सॉलिड खराखरा राजपुत्र आला होता ….. पण कोणाला त्याचं काही फार वाटत नव्हतं!! तो आला, त्याचं काम करून निघून ही गेला.

नुसताच सोनेरी खुर्चीत बसून मिठाई खाणारा आणि इतरांना कामाला लावणारा राजपुत्र नव्हता हा… तसे राजपुत्र फक्त नाटकातच असतात बहुदा…!!

खरा राजपुत्र आपल्यासारखाच आहे… सगळ्यांशी नीट बोलणारा आणि स्वत:चं काम स्वत: करणारा….!! मला आता नाटकातल्या राजपुत्रापेक्षा हाच राजपुत्र आवडला…..सॉलिड, हिज हायनेस प्रिंस ऑफ वेल्स…!!

– मधुरा डहाणूकर

मधुरा डहाणूकर ह्या मराठी रंगभूमी, दूरदर्शन मालिकां मधील प्रसिध्द अभिनेत्री आहेत. साहित्य आणि कलेचा वारसा लाभलेल्या मधुरा डहाणूकर पुण्याच्या ‘चिल्ड्रन फिल्म सर्कल’ च्या संस्थापक कार्यकर्त्या आहेत.