एक टक्क्याची गोष्ट


एच आय व्ही समस्येची उकल – ४

एचआयव्हीची लागण झाल्यास उपचार

आज मितीला एचआयव्हीचे जंतू (विषाणू) शरीरातून पूर्णपणे घालवून देऊन त्या व्यक्तीला ‘रोग-मुक्त’ करणारे एकही औषध नाही. अनेक बाब-बुवा-भोंदू-ऍलोपॅथी-होमीओपॅथी-आयुर्वद डॉक्टर्स जाहिरात करमन असे औषध/औषधोपचार पध्दती/उपचार सापडला असा दावा करतात.
हा खोटारडा स्वार्थ- व प्रेतांच्या टाळूवरील लोणी खाणा-या निर्लेज्ज धंदेवाईकांचा दावा आहे. कुणीही त्याला भलू नये. काही वेळा ‘असे’ उपचार घेऊन वा ‘मंत्र’ ‘तंत्र’ असं काहीतरी करून एखादी एचआयव्ही बाधीत व्यक्ती अनेक वर्ष सुखात जगते कसं काय?

काही कारणं अशी
१. HIV व HIV2 मध्ये HIV1 हा जास्त धोकादायक असतो. भारतात ९९% हा जास्त HIV1 आहे दुर्देवाने. पण १ ते २% HIV2 ने बाधीत असतात. त्यांच्या मध्ये क्वचित अनेक वर्षे एड्स होत नाही.

२. HIV1 असूनही काही रोग्यांमध्ये नैसर्गिक रोग प्रतिकार शक्ती जास्त सबळ असते. त्यामुळै अनेक वर्ष ह्या व्यक्ती व्यवस्थित राहतात.

३. काही अपवादात्मक केसेसमध्ये क्वचित CD4 या पांढ-या रक्त पेशीचा नाश एचआयव्ही फार कमी करतात. (का असं होतं ते माहित नाही) पण अशा अपवादात्मक केसेस वगळया तर ‘उपचार’ केले नाहीत तर ८ ते १५ वर्षात एचआयव्ही बाधित व्यक्तीच्या CD4 पेशी २०० पेक्षा खाली जातातच. त्या २०० पेक्षा खाली गेल्या तर इतर रोगांची लागण होते. (…….इन्फेक्शन) व झपाटयानं एड्समध्ये ती व्यक्ती प्रवेश करते.

औषधं ……असं म्हणताना आपण पुन्हा एकदा लक्षात घेऊया की औषधं दोन प्रकारची असतात. टायफाईड झाला तर पूर्वी माणसं औषधं नसल्याने मरायची साथीत. आता ऍ़टीबायोटिक आली आहेत व ही औषधं शरीरातल्या टायफाईडच्या जंतूचा समुळ नाश करून टायफाईड बरा करतात. डायबेटीस मात्र बरा होत नाही औषधांनी. तो रोज मरेपर्यंत औषधे घेऊन ताब्यात ठेवता येतो व ठेवणं गरजेचं असतं.

एचआयव्ही बरा करणारी औषधे नाहीत. पण डायबेटीस सारखी एचआयव्ही ताब्यात ठेवणारी औषधे आता निघाली आहेत. त्यामुळे एचआयव्हीवर औषधे आहेत पण ती एचआयव्हीवर ताबा ठेवतात. एचआयव्हीच्या औषधांना ART म्हणतात. ही औषधे एचआयव्हीचे जंतू मारतात, पण समुळ घालवत नाहीत. त्यामुळे दर बारा तासांनी गोळया घ्याव्याच लागतात. फक्त बारा तासांची सुटका मिळते!
पण नियमित घेतल्या तर एचआयव्हीचे विषाणू मर्यादित प्रमाणात रहातात आणि CD4 चं प्रमाण खाली येणं थांबतं.

अर्थातच इतर रोगांचा प्रतिकार शरीर नॉर्मल माणसां सारखाच करतं. ही व्यक्ती नेहमी सारखं जगू शकते. ARTच्या साध्या औषधाचा खर्च महिना ८०० – १००० रू असतो.

ART बद्दल महत्वाचे तीन मुद्दे

CD4 पेशी २५०/२०० ला आल्यावर ART सुरू करतात. आधी नाही पण त्यामुळे HIV बाधीत व्यक्तीत दर ६ महिन्यांनी CD4 करायला हवा.

ART मध्ये तज्ज्ञ असणा-यांकडून वा सरकारी UCTC मधून ही ART सुरू करावा. अनेक M.D. म्हणवणा-यांना सुध्दा नेमका औषधे व डोस माहित नसतात व तरी ते ART सुरू करतात ही एक खेदजनक बाब आहे. ART एकदा सूरू केली की मरेपर्यंत बंद करू नये. पण ART मुळे एचआयव्ही म्हणजे मृत्यू हे समीकरण पूर्णपणे बदलतं आहे. आता एचआयव्ही सह जीवन शक्य आहे.

मात्र ART चे साईड इफेक्ट्स आहेतच व क्वचित ती निकामी ठरतात! एचआयहीची बाधा टाळणं याला पर्याय नाही.

गर्भार स्त्री व ART
ART चा सर्वात मोठा फायदा हा नवजात बालकांसाठी आहे. जर एखादी स्त्री एचआयव्ही पॉझीटीव्ह आहे तर तिच्या बाळाला एचआयव्हीची लागण होण्याचं प्रमाण २५% असतं म्हणजे ४ बाळात एक.

पण ART आल्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने गरोदरपणी २८ आठवडयापासून ते घेतलं व स्तनपान टाळलं तर नवजात बाळ एचआयव्ही बाधित असण्याचं प्रमाण फक्त २-५% होतं. (शंभरात २ ते ५ बाळं!) म्हणजेच शंभरात ९५ ते ९८ बाळं वाचतात.

प्रत्येक बाळ वाचवा! त्यासाठी प्रत्येक मातेनं एचआयव्ही तपास पहिल्या तीन महिन्यातच करून घ्या. तेव्हा एचआयव्ही समस्येची उकल फार परिपूर्ण नाही तरी सुसह्य होण्याएवढी निश्चितच झाली आहे. एचआयव्ही म्हणजे मृत्यू नाही. एचआयव्ही सह जीवन शक्य आहे. कसं?

डॉ. अरूण गद्रे यांचे काही साहित्य
Dr Arun Gadre एडस् ने सा-या जगात थैमान घातले आहे. फक्त अशिक्षित समाजच नाही तर अगदी आयटीतले तरुणही ह्याचे शिकार आहेत. ह्या क्षेत्रातल्या कार्याबद्दलचे आपले अनुभव सांगत आहेत डॉ. अरुण गद्रे. डॉ. अरुण गद्रे (एम.डी.डी.जी.ओ) हे स्त्रीरोगतज्ञ असून त्यांनी नाशिक जिल्ह्यात लासलगावी वीस वर्षे काम केले. आता ते पुणे येथे स्थित असून ‘प्रयास,” पाथफाइंडर ‘ संस्थेसाठी एड्सवर कार्य करत आहेत. डॉ. गद्रे हे लेखक असून त्यांच्या नावावर ‘हितगुज लेकीशी’, ‘एक होता फेंगाडया’, ‘घातचक्र’, ‘विषाणू’ अशी बरीच पुस्तके आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचेही पुरस्कार मिळाले आहेत.

Hitguj
Ghatchekra
Vadhstambha
Vishanu