एक टक्क्याची गोष्ट


एच.आय.व्ही चं गमभन ३

माणसाची कल्पना शक्ती खूपच तरल असते. समुदायाची एकत्रित कल्पना शक्ती तर कोणतं टोक गाठेल त्याची कल्पनाच करवत नाही. जिथे ज्ञान नाही तिथे भिती असते व सहज साथीसारखी पसरते. काही प्रत्यक्षात घडलेल्या घटनांकडे जरा नजर टाकू.

एक छोट शहर. मध्यमवर्गीय माणूस त्याला अपघात होतो. पाय तुटतो, खूप रक्तस्त्राव होतो, मदत मिळते, तो हॉस्पीटलमध्ये पोहचतो. खाजगी सुसज्ज हॉस्पीटल. नातेवाईक पोचतात. ऑपरेशनसाठी आंत नेणार तोच रक्ताचा रिपोर्ट येतो. एचआयव्ही पॉझिटीव. डॉक्टर गडबडीनं निर्णय बदलतात. ”आमच्या हॉस्पिटलमध्ये एचआयव्ही पॉझिटीव व्यक्तीच ऑपरेशन करण्याची सोय नाही…..सरकारी हॉस्पिटलमधे न्या”.कसा गंमतशीर प्रकार! एरवी हेच डॉक्टर…जे रक्त सरकारी हॉस्पिटलमधे अटँज आहेत…..ते सरकारी हॉस्पिटल मधल्या रूग्णांना सांगतात….”करीन मी इथे ही ऑपरेशन, पण काय आहे….सरकारी हॉस्पिटलात सोयी कमी पडतात ना! उद्या काही कॉम्पलिकेशन झालं…त्यापेक्षा माझ्या खाजगी हॉस्पिटलात या….पैसे जातील पण इलाज चोख होईल!”आता मात्र हेच डॉक्टर सांगताहेत एचआयव्ही व्यक्तीवर ऑपरेशन करण्याची सोय माझ्या हॉस्पिटलमध्ये नाही! सरकारी हॉस्पिटलात आहे. तो माणूस सरकारी हॉस्पिटलात ऑपरेशन करून घरी येतो. खचलेला, निरस्कृत सर्व आशा संपलेला व ”कुठे शेण खाल्लं” अशा टोमण्यांची शिकार झालेला. अखेर एका रात्री आत्महत्या करतो.

काही दिवसांनी शेजारी राहणारी नर्स…जी त्या सरकारी हॉस्पिटल मध्येच असते. येऊन धक्कादायक बातमी देते ”खाजगी दवाखान्याचा रिपोर्ट चुकीचा होता! तो एचआयव्ही पॉझिटीव नव्हता. आमच्या हॉस्पिटलात रिझल्ट निगेटिव्ह आला आहे.” घरात हल्ला- कल्लोळ होतो. एक जीव हकनाक गेलेला असतो.

दुसरी घटना

तो खोकतोय…..बेडकं पडताहेत. अशक्त, पार सापळा झालाय हाडांचा. घरी निपचीत पडलाय. गावभर चर्चा चालतेय, ”नक्की ऐडसच!”
त्यांच्या घरातही खात्री पटतेय. पत्नी नशिबाला दोष देतेय. आईबापही जवळ येत नाहीत. लांबूनच जेवणाचं ताट ढकललं जातयं. तो ही हताशपणे मृत्यूची वाट बघतोय. त्याला मित्रांबरोबर एकदा वेश्यागमन केल्याचं स्पष्ट आठवतंय. ……नक्कीच! तो पुटपुटतो.
स्वत:ला शिव्या घालतो.दिवसें दिवस जातात. मित्र शहरातून येतो. हळहळतो, विचारतो, ” अरे रिपोर्ट कुठयं? ”. ” कशाला हवाय रिपोर्ट!” तो मित्र पुटपुटतो. ”चूक माझीच”. ”म्हणजे रिपोर्टसुध्दा केला नाही?” तो नकार देतो. मित्र त्याला उचलतो, हॉस्पिटलमध्ये दाखल करतो. रिपोर्ट येतो. एचआयव्ही निगेटीव्ह. टीबीची केस असते! दोन महिन्यात तो खडखडीत बरा होतो.

अजून एक घटना
प्रसिध्द एचआयव्ही स्पेशालिस्ट. एक मोठया हुद्यावर काम करणारे मध्यमवयीन गृहस्थ दबकत दबकत येतात. ”एचआयव्ही आहे बहुदा…” ते सांगतात. दहावर्षांपूर्वी एका मैत्रिणीशी निरोध न वापरता संबंध आलेला असतो. स्पेशालिस्ट समजवतात. एचआयव्ही टेस्ट करू….. ते गृहस्थ पिशवीतून जाडजूड फाईल काढतात. पाच वर्षापासून जवळपास शंभर रिपोर्ट! शेवटचा रिपोर्ट …एक महिन्यापूर्वी सर्व निगेटीव्ह. डॉक्टर हताशपणे बघतात. ते गृहस्थ घाब-या घाब-या म्हणतात ”एकदा पुन्हा करूनच घेऊ टेस्ट!”

असंख्य केसेस.
घाबरलेल्या, हताश झालेल्या, नुसत्या ऐकीव माहितीने, कल्पनेत गुंग.
कसा सुटणार हा गुंता ?
कोण सोडवणार?
आपणच…सर्व मिळून नाही का? त्यासाठीच तर ही एक टक्क्याची गोष्ट!

डॉ. अरूण गद्रे यांचे काही साहित्य
Dr Arun Gadre एडस् ने सा-या जगात थैमान घातले आहे. फक्त अशिक्षित समाजच नाही तर अगदी आयटीतले तरुणही ह्याचे शिकार आहेत. ह्या क्षेत्रातल्या कार्याबद्दलचे आपले अनुभव सांगत आहेत डॉ. अरुण गद्रे. डॉ. अरुण गद्रे (एम.डी.डी.जी.ओ) हे स्त्रीरोगतज्ञ असून त्यांनी नाशिक जिल्ह्यात लासलगावी वीस वर्षे काम केले. आता ते पुणे येथे स्थित असून ‘प्रयास,” पाथफाइंडर ‘ संस्थेसाठी एड्सवर कार्य करत आहेत. डॉ. गद्रे हे लेखक असून त्यांच्या नावावर ‘हितगुज लेकीशी’, ‘एक होता फेंगाडया’, ‘घातचक्र’, ‘विषाणू’ अशी बरीच पुस्तके आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचेही पुरस्कार मिळाले आहेत.

Hitguj
Ghatchekra
Vadhstambha
Vishanu