ती उद्वेगाने व अट्टाहासाने मला पटविण्याचा चिकारच प्रयत्न करत होती.
”झाली चूक माझी…..हो, मी शरीर संबंध ठेवले. जरासुध्दा संशय आला नाही मला की हा माणूस एचआयव्ही पॉझीटीव्ह असेल! शी!……. इतक्या चांगल्या घरातला आहे तो”.
मी अगतिक अविश्वासानं पहात होतो. हा जो ‘एक टक्का’ अस्तित्वात आहे. तो तिच्यासारख्याच उच्चभ्रु, शहरी, सुशिक्षित, सामाजिक स्तरावरही तिच्या शेजारीच उभा होता तो तिला दिसू शकला नव्हता. तिच्यामते … हा ‘एक टक्का’ वगळता उरलेल्या ९९% समाजाच्यामते हा एक टक्का ‘त्यांच्यात’ असूच शकत नाही.
”कसं ओळखणार होतीस बाई गं…… की हा अमूक तमूक एच आय व्ही पॉझीटीव्ह आहे ?” मी हताशपणे विचारलं.
ती उत्तरली, ”अजिबात आजारी नव्हता, अन् तो काही ड्रायव्हर, व्यसनी, ड्रगऍडीक्ट वा प्रॉस्टीटयुटकडे जाणारा नव्हता”.
मी उसासा सोडला.
ते तसे नाही. हा एक टक्का आपल्यासारख्याच दिसणा-या, असणा-या, वागणा-या, शिक्षण-करीअर करणा-या व्यक्तींमध्ये सुध्दा अस्तित्वात आहे. त्यातलं ना कोणी दीर्घकाळ आजारी असतं वा दिसतं. हे भीषण सत्य तिला कळत होतं. पण जबरदस्त किंमत देऊन!
ती उठून निघून गेली.
मला लासलगावला भेटलेली ती झाशीची राणी आठवली. या कुमारी माता नेहमीच दुस-या दूरच्या गावात मानलेल्या भावाबरोबर गर्भपात करायला जातात. या नात्यानं ती दूर लासलगावला माझ्यासमोर गर्भपाताची ‘सही’ करत होती. तिसरा गर्भपात तो माझ्याकडचा तिचा!
मी चकीत होऊन बघत होतो.
सही करून तिनं मला विचारलं, ”या गर्भाचं डीएनए टेस्टींग करता येईल?”
”का ग?”
”धडा शिकवायचाय मला त्याला!…”
मी तिला विचारलं,
”अग…तुला तिस-यांदा गर्भपात का करावा लागतोय पण ?…एक दोन तीन ? सावध का नाही झालीस? गोळया घ्यायच्या संतती नियमनाच्या. निरोध वापरायचा. काहीतरी करायच.”
तिनं गोंधळून मला सांगितलं, ”पण गर्भपाताचा दोन वेळा काहीच त्रास तर झाला नाही ! ”
मी विचारलं,
”आणि तो एचआयव्ही पॉझीटीव्ह असला तर?” तिनं क्षणात झिडकारलं.
”शक्यच नाही तो आमच्या चांगल्या घरातल्या मुलामुलींच्या ग्रुपमधलाच आहे. तो काही ड्रग ऍडीक्ट, वेश्यांकडे जाणारा असा नाही.”
गर्भपात करवून ती ताडताड निघून गेली. आजही नशिबाला दोष लावत गेली नाही.
मी मात्र विचार करतोय. ”कोणता वेडा खेळ आहे हा? अन कोणतं भीषण अज्ञान हे, की एच आय व्ही चा एक टक्का असतो फक्त ट्रक ड्रायव्हर्समध्ये, वेश्यांमध्ये खालच्या वर्गाच्या लोकांत! ‘आमच्या’ जातीत, धर्मात, स्तरात, व्यवसायात एचआयव्हीचा एक टक्का असूच शकत नाही!”
मी पुन्हा मलाच तुम्हालाही हा प्रश्न विचारतोय, ”कोणता क्रूर दृष्टीभ्रम हा!”
डॉ. अरूण गद्रे यांचे काही साहित्य
एडस् ने सा-या जगात थैमान घातले आहे. फक्त अशिक्षित समाजच नाही तर अगदी आयटीतले तरुणही ह्याचे शिकार आहेत. ह्या क्षेत्रातल्या कार्याबद्दलचे आपले अनुभव सांगत आहेत डॉ. अरुण गद्रे. डॉ. अरुण गद्रे (एम.डी.डी.जी.ओ) हे स्त्रीरोगतज्ञ असून त्यांनी नाशिक जिल्ह्यात लासलगावी वीस वर्षे काम केले. आता ते पुणे येथे स्थित असून ‘प्रयास,” पाथफाइंडर ‘ संस्थेसाठी एड्सवर कार्य करत आहेत. डॉ. गद्रे हे लेखक असून त्यांच्या नावावर ‘हितगुज लेकीशी’, ‘एक होता फेंगाडया’, ‘घातचक्र’, ‘विषाणू’ अशी बरीच पुस्तके आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचेही पुरस्कार मिळाले आहेत.