एक टक्क्याची गोष्ट


एच आय व्ही समस्येची उकल – ३

रोगाची शास्त्रीय माहिती घेऊन तसच एचआयव्हीचं समाजात लागणीचे स्वरूप बघून आपण एचआयव्ही समस्येची उकल करणं सुरू केलं.

पुनुरूक्तीचा दोष स्वीकारून एचआयव्ही बद्दलचे काही ठळक मुद्दे या लेखात मांडतो आहे…

१. एचआयव्ही हा व्हायरस आहे.

२. एच म्हणजे ह्युमन, हा व्हायरस फक्त ‘माणसांमध्ये’ उपद्रव देतो. अर्थातच तो डास, उंदीर, पिसवा, कोंबडया, डुकरं अशा कुणात ही जिवंत रहात नाही. अर्थातच या कोणात्याही प्राण्यावाटे तो आपल्याला संसर्ग करू शकत नाही.

३. हा व्हायरस अत्यंत नाजूक आहे. त्यामुळे हवेत वीस सेकंदात हा मरतो. म्हणूनच खोकल्याद्वारे, त्वचेद्वारे, घामाने, अश्रूवाटे, शिंकाद्वारे, पाण्यावाटे, लाळेवाटे हा पसरत नाही.

४. असुरक्षित लैगिक संबंध, दुषित सुया, दुषित रक्त व आईकडून बाळाला या चारच मार्गांनी हा पसरतो.
५. शरीरसंबंध टाळून एकत्र रहाण्याने, जेवल्याने, एकमेकांचे कपडे घातल्याने, एक संडास वापरल्याने, डासांमुळे, एकत्र खेळून फक्त चुंबन घेऊन, रक्त देऊन, एचआयव्हीचा संसर्ग होत नाही.
६. लैगिकता ही एक गूढ गोष्ट आहे. कुणाची खात्री कुणीही देऊ शकत नाही. पण असुरक्षित लैगिक संबंधातून एचआयव्ही होतो. जर कंडोम वापरला तर एचआयव्हीची लागण होत नाही.
७. पती-पत्नीने जर एकमेकांशी एकमिलता दाखविली तर त्यांना कंडोम वापरण्याची गरज नाही. या जोडप्याला त्यांच्या लैगिक संबंधातून कधीही एचआयव्ही होणार नाही. (दूषित रक्त/ अवजारे याने तो होऊ शकतो)

हा परामंर्श घेतल्यानंतर आता आपण एच आय व्हीचे निदान व उपचारांकडे बघूया.

एचआयव्हीचे निदान :-

१. रक्ताच्या साघ्या तपासण्याने एचआयव्हीचे निदान होते.

२. ही टेस्ट जवळपास सर्व प्रायव्हेट लॅबमध्ये केली जाते. पण त्यासाठी जे कायद्यानं आवश्यक असे प्री-टेस्ट कांऊन्सेलींग व्हायला हवं ते होत नाही.

३. जिथे प्री-टेस्ट कांऊसेलिंग केले जात नाही तिथं ही टेस्ट करू नये.

प्री-टेस्ट कांऊसेलिंग
या कांऊन्सेलींग मध्ये एचआयव्हीची लागण, प्रसार याबद्दल माहिती देतात. त्यानंतर एचआयव्ही बाधित व्यक्ती काय खबरदारी घेऊ शकते, एचआयव्हीचा संसर्ग झाल्यावर ही नेहमीचे सुदृढ आरोग्य कसे टिकवू शकते याचेही मार्गदर्शन केले जाते.

एचआयव्ही म्हणजे मृत्यू ही समजूत काढून मगच ही टेस्ट केली जाते. ही कांऊन्सेलींग न झाल्यामुळे अनेकांनी एचआयव्हीचं निदान झाल्यावर केल्या आहेत. या रोखण्यासाठी कायद्यानं प्री-टेस्ट कांऊसेलिंग केल्याशिवाय ही टेस्ट करण्यास मनाई केली आहे. म्हणून शक्यतो सरकारी UCTC/ICTC सेन्टर मध्येच ही टेस्ट करावी. सरकारी यंत्रणा याबाबतीत अत्यंत सक्षमपणे काम करतात.

४. एका कंपनीच्या टेस्ट कीटनं प्रथम निदान करतात. ती जर निगेटीव्ह असेल तर ‘एचआयव्ही’चे संसर्ग नाही असं सांगता येत.

५. विन्डो पिरीअड:-
आज जर असुरक्षित लैगिक संबंध (तेही एचआयव्ही बाधित व्यक्तीशी) आले वा दूषित अवजाराने इजा झाली (बहूदा ती डॉक्टर/नर्सना होते) व आज जर एचआयव्हीचे जंतू एखाद्या व्यक्तीच्या शरीरात गेले व आजच एचआयव्हीची टेस्ट केली तर ती ‘निगेटीव्ह’ येते.

‘आज’पासून सहा महिन्याच्या काळाला विन्डो पिरीअड म्हणतात. याकाळात शरीरात एचआयव्हीचे जंतू असून सुध्दा. ते रक्ताच्या साध्या तपासणीत सापडत नाहीत. (याकाळात ती व्यक्ती दुस-या व्यक्तीला एचआयव्हीची लागण करू शकते) मात्र सहा महिन्यात ही टेस्ट पॉझीटीव्ह येते. म्हणून ज्या व्यक्तीला एचआयव्हीची लागण झाल्याचा संशय आहे त्या व्यक्तीने आज, तीन महिन्यानी, सहा महिन्यांनी एचआयव्हीची टेस्ट करावी. जर सहा महिन्यात ती पॉझीटीव्ह आली नाही तर संसर्ग झाला नाही असं नाही असं समजावं. (अर्थात या सहा महिन्यात पुन्हा असुरक्षित लैगिक संबंध ठेऊ नये.)

६. जर पहिली टेस्ट पॉझाटीव्ह झाली तर मात्र अजून दोन वेगळया कंपन्यांच्या टेस्टकिट वापरून त्याच रक्तीची त्याचवेळी अजून दोनदा तपासणी होते. (ब-याच वेळा प्रायव्हेट लॅब हे टाळतात.)

तीन टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर टेस्ट पॉझिटीव्ह आली असं जाहिर केले जाते.

७. रिपोर्ट देतांना – पोस्ट टेस्ट कांऊसेलींग करून धीर दिला जातो. प्रश्नांची उत्तरे दिली जातात. नुसताच रिपोर्ट देणं हा कायद्यानं गुन्हा आहे. ब-याच प्रायव्हेट लॅब मध्ये हे असच घडतं! पोस्ट टेस्ट कांऊनसेलिंग केलं जात नाही.

एचआयव्हीचा तपास हा असा दक्षता घेऊन करून घ्यावा. कुणाही व्यक्तीला ‘न’ सांगता, तिची परवानगी न घेता परस्पर एचआयव्हीचा तपास करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. तसंच जर एखाद्या व्यक्तीची इच्छा नसेल तर तिच्यावर सक्तीने ती टेस्ट लादता येत नाही. मात्र ज्या व्यक्तीला संसर्गाचा संशय आहे तिने एचआयव्हीचा तपास जरूर लवकरात लवकर करावा. कारण एचआयव्हीची लागण झाल्याचं लवकरात लवकर माहित होणं हा जास्तीत जास्त सुदृढ जीवन जगण्याची पहीली पायरी आहे. कसं ते पुढे बघू.

डॉ. अरूण गद्रे यांचे काही साहित्य
Dr Arun Gadre एडस् ने सा-या जगात थैमान घातले आहे. फक्त अशिक्षित समाजच नाही तर अगदी आयटीतले तरुणही ह्याचे शिकार आहेत. ह्या क्षेत्रातल्या कार्याबद्दलचे आपले अनुभव सांगत आहेत डॉ. अरुण गद्रे. डॉ. अरुण गद्रे (एम.डी.डी.जी.ओ) हे स्त्रीरोगतज्ञ असून त्यांनी नाशिक जिल्ह्यात लासलगावी वीस वर्षे काम केले. आता ते पुणे येथे स्थित असून ‘प्रयास,” पाथफाइंडर ‘ संस्थेसाठी एड्सवर कार्य करत आहेत. डॉ. गद्रे हे लेखक असून त्यांच्या नावावर ‘हितगुज लेकीशी’, ‘एक होता फेंगाडया’, ‘घातचक्र’, ‘विषाणू’ अशी बरीच पुस्तके आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचेही पुरस्कार मिळाले आहेत.

Hitguj
Ghatchekra
Vadhstambha
Vishanu