एचआयव्ही व एड्स या रोगांनी आता भीती व घृणेमध्ये कुष्ठरोगाची जागा घेतली आहे. मिशनरींनी
व नंतर बाबा आमटयांनी जागृती करे पर्यंत कुष्टरोग्यांची जागा समाजात वेशीबाहेर होती. अतिशय प्रभावी औषधांनी कुष्ठरोग खूपच आटोक्यात आला आहे. आज कुष्ठरोग्यांबद्दल घृणा व भीती दोन्ही कमी होण्यात याचाही फार मोठा सहभाग आहे.
एच आयव्हीचं निदान व तपासणी दोन्हीही समूपदेशना नंतरच व्हावी असा कायदा आहे. कारण ‘तुम्हाला एच आय व्ही/एड्स झाला आहे’ हे सांगितल्या नंतर केवळ भीतीनं व समाजाच्या अपेक्षित घृणेमुळे काही दुर्दैवी व्यक्तींनी आत्महत्या सुध्दा केल्या आहेत.
एचआयव्ही हा ‘बदफैली’ वागणुकीशी जोडला गेला आहे. गुप्तरोगातला ‘गुप्त’ हा शब्द मुळात या ‘वागणुकी’शी संबंधात आहे. ही भीती व घृणा एचआयव्ही बाधित व्यक्तीला का वाटते?
१. विवाहित माणसाला आपली जोडीदाराशी आपण करत असलेली फसवणूक या रोगनिदानांन उघड होणार ही ‘सार्थ’ भीती वाटते.
२. आपल्याला समाजात दुष्णं मिळणार, आपण व आपली मुलं समाजात वाळीत टाकली जाणार ही त्या व्यक्तीला भीती वाटते.
३. काहीतरी महाभयंकर रोगानं यातनामय मृत्यू होणार ही खात्रीच पटते!
४. एचआयव्ही म्हणजे फक्त ‘काही दिवस!’ अशी ठाम खात्री असते. आणि या सर्व समजूती आज बहुसंख्यांच्या मनात असतात.
म्हणून एचआयव्हीचं गमभन पुढे चालू ठेवताना आपण एचआयव्ही कशामुळे होत नाही ते बघु या.
एचआयव्ही यामुळे होत नाही.
१. एकत्र रहाण्यानं (शरीर संबंध टाळून)
२. एकत्र एका ताटात जेवल्याने
३. एकच संडास वापरल्यानं
४. डास चावल्यामुळे – बहुतेकांची पक्की खात्री असते की एचआयव्ही बाधित व्यक्तीला डास चावून तो आपल्याला लगेच चावला तर त्याच्या सोंडेवाटे एचआयव्ही चे जंतू आपल्या शरीरात जातील. अत्यंत चुकीची समजूत आहे ही. डास रक्त शोषतो व पितो. त्या रक्ताचं त्याच्या पोटात पचन होते. डासांच्या रक्तात एचआयव्ही नसतात कारणं एचआयव्ही मधला ‘एच’ हा ‘हयुमन’ म्हणून आहे. एचआयव्ही फक्त माणसांमध्येच वाढतो! डासात नाही.
५. चुंबन घेऊन (ओठाला मात्र व्रण नकोत)
६. एकत्र खेळण्याने – एखाद्या एचआयव्ही बाधित व्यक्तीला जख्म झाली तरी खपली धरली तर जंतू बाहेर येत नाहीत. रक्त बाहेर आलं तरी ही एचआयव्हीचे जंतू इतके नाजूक असतात की हवेने, साबणांने, पाण्याने सुध्दा मरतात.
७. रक्त देण्याने – रक्त देतांना देणा-याचं रक्त शरीरातून बाहेर येत असतं! अर्थातच रक्तदान करून एचआयव्हीची बाधा होत नाही.
८. एकत्र अभ्यास करून.
९. एचआयव्ही बांधित व्यक्तीच्या घामातून, लघवीतून, संडासमधून, शेंबडातून, अश्रुंमधून एचआयव्हीची बाधा होत नाही.
१०. एचआयव्ही बाधित व्यक्तीनं घातलेल्या कपडयामुळे, वापरलेल्या गाडीमुळे, एचआयव्ही व्यक्तीच्या खोकल्यामुळे एचबायव्हीची बाधा दुस-याला होत नाही.
अर्थातच एचआयव्ही बाधित व्यक्तीला समाजापासून दूर ठेवण्याची, गरज नाही. एका गावात मी एचआयव्हीचं भाषण दिल्यावर तिथले पुढारी मला म्हणाले, “डॉक्टर दर महिन्याला जे आमच्या गावचे एचआयव्ही पॉझीटीव्ह सापडतील त्यांची यादी ग्रामपंचायत बोर्डावर लावू या”. मी म्हटलं , “का ?”
”अर्थात त्यांच्यापासून एचआयव्ही गावात पसरायला प्रतिबंध करायला”
खूप समजावूनही ते हट्ट सोडेनात. शेवटी मी विचारलं, ”तुमची पत्नी सोडून गावात कोणकोणत्या पुरूषांशी तुमचे निरोधही न वापरता लैगिक संबंध चालू आहेत?” या प्रश्नावर खूप चिडले.
मग मी म्हटलं “नाहीत ना?….मग असू द्या की कुणाला ही एचआयव्ही! कशाला यादी हवी?”
खरचं आहे. एचआयव्ही बाधित यक्तीशी जर आपण असुरक्षित (निरोध न वापरता) संबंध ठेवणार नसू तर त्या व्यक्तीपासून कोणत्याच इतर मार्गानं आपल्याला एचआयव्हीची बाधा होणार नाही. देवाची केवढी कृपा ही! विचार करा जर एचआयव्ही फ्ल्यूसारखा हवेतून पसरला असता तर?
डॉ. अरूण गद्रे यांचे काही साहित्य
एडस् ने सा-या जगात थैमान घातले आहे. फक्त अशिक्षित समाजच नाही तर अगदी आयटीतले तरुणही ह्याचे शिकार आहेत. ह्या क्षेत्रातल्या कार्याबद्दलचे आपले अनुभव सांगत आहेत डॉ. अरुण गद्रे. डॉ. अरुण गद्रे (एम.डी.डी.जी.ओ) हे स्त्रीरोगतज्ञ असून त्यांनी नाशिक जिल्ह्यात लासलगावी वीस वर्षे काम केले. आता ते पुणे येथे स्थित असून ‘प्रयास,” पाथफाइंडर ‘ संस्थेसाठी एड्सवर कार्य करत आहेत. डॉ. गद्रे हे लेखक असून त्यांच्या नावावर ‘हितगुज लेकीशी’, ‘एक होता फेंगाडया’, ‘घातचक्र’, ‘विषाणू’ अशी बरीच पुस्तके आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचेही पुरस्कार मिळाले आहेत.