संग्रहालये/ऐतिहासिक स्थळे

टाऊन हॉल

 Town Hall शहराची भव्यता वाढविणारे हे ठिकाण महत्त्वाचे आहे. मध्यवर्ती ठिकाणी विस्तृत परिसरामध्ये दिमाखाने पसरलेली ही शहरातील खास इमारत आहे. ही इमारत १८७२ ते १८७६ च्या दरम्यान बांधण्यात आली. टोकेरी छपरांच्या छोटया कक्षांसमवेतच विस्तारलेले एक भव्य सभागृह ही टाऊन हॉलची खासीयत. इथे ऐतिहासिक वस्तूंचे एक संग्रहालय असून, हा भाग महाराष्ट्र शासनाचा आहे.

ब्रह्मपूरी येथे उत्खननात सापडलेल्या पुरातन मूर्ती, गाजलेल्या चित्रकारांची भव्य भित्ती चित्रे, कलात्मक वस्तू, प्राचीन नाणी, भरतकामाच्या वस्तू, पंखे, कपडे, पुतळे, चंदनाच्या मूर्ती, तलवारी, भाले, बंदुका, शिरस्त्राण व पिस्तूली इ. आकर्षक रित्या मांडून ठेवलेल्या वस्तू इथे पाहायला सापडतात.

टाऊन हॉलच्या आवारात शासनाची कार्यालये, न्यायालय, शासकीय रूग्णालय, निम-शासकीय कार्यालये, दूरध्वनी कार्यालय, ‘पुढारी’ दैनिकाचे कार्यालय इ. असल्यामुळे, हा परिसर कायम गर्दीचा गजबजलेला असतो. टाऊन हॉलच्या बागेमध्ये महादेवाचे मंदिर, मोठे कारंजे, तलाव, झाडे, वेली व पुष्कळशी फुलझाडे आहेत.

कोल्हापूर शहरातील सर्वात लक्षणीय व प्रेक्षणीय आकर्षण म्हणजे, देवळाच्या १ किमी. उत्तरेस भाऊसिंगजी मार्गावरील, ‘टाऊन हॉल कोल्हापूर संग्रहालय’ (सोमवारी बंद) हे होय. चार्लस् मॅन्ट याने १८७२-७६ या काळात टाऊन हॉल या नावाने ही सुंदरशी ‘निओ गथिक’ रचना उभी केली. कोल्हापूरातील त्याची ही पहिली वहिली निर्मिती असून, ही एकच इमारत अस्सल ‘निओ गथिक’ शैलीतील आहे. संग्रहालयाचा द्वारमंडप दोन्ही बाजूंच्या मनोऱ्यांमुळे विस्तारला असून, उंच सुळक्यांप्रमाणे पिरॅमिड आकाराचे धातूचे छप्पर त्याला आहे. दोन युरोपियन तोफा इथे प्रदर्शित केल्या आहेत. ‘१६०९’ कोरलेल्या तोफेवर रोमन रणदेवता मार्सची प्रतिकृती उठावदार दिसून येते. ब्रह्मपूरीजवळ उत्खननामधे सापडलेल्या सातवाहन कालीन वस्तू संग्रहालयामधे आहेत. गजारूढ सरदार, पोसायडन हया ग्रीक देवतेची छोटी प्रतिमा, मेडॅलियन्स सह हेलेनिस्टिकच्या प्रतिकृती त्यात आहेत. महालक्ष्मी मंदिरातून सोडवून आणलेल्या गायक वादकांच्या आकर्षक स्त्री-शिल्पाकृती येथे आहेत. पन्हाळा येथून आणलेले चामरधारी स्त्री मदतनीस वा परिचारिकेचे शिल्प, केवळ अप्रतिम आणि सर्वोत्कृष्ट आहे. महालक्ष्मी मंदिरात बसविण्याकरिता १७३९ मधे, वसईवरून आणलेली तांब्याची घंटा या संग्रहालयामधे पाहायला मिळते. संग्रहालयाच्या एका बाजूला उंचावर बांधलेल्या सज्जामधे सर्व प्रकारची शस्त्र-अस्त्रे ठेवली आहेत. संग्रहालयाच्या समोरच असलेले छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालय हे मँन्ट याने, १८८१-८४ या कालावधीमधे बांधले. टाऊन हॉलच्या विशाल प्रवेशद्वाराला साजेसे भव्य कॉरिन्थियन शैलीचे स्तंभ असून, स्तंभांच्या कमानींवर दैत्यांचे मुखवटे व मर्कटे समाविष्ट केली आहेत.

भवानी मंडप

Bhavani Mandap कोल्हापूर शहराची शान म्हणजे, भवानी मंडप. हया सर्वात जुन्या व सर्वात जास्त विशाल इमारतीस ऐतिहासिक महत्त्व आहे. कोल्हापूर स्वयंशासित झाल्यानंतर ही इमारत बांधण्यात आली. या इमारतीचे बांधकाम चौदा चौकांचे, भक्कम आणि मजबूत आहे. १८१३ साली मुस्लीम सरदार सदाखान याने या महालावर आक्रमण केले, व त्याचा काही भाग जाळला. महालाची डागडुजी केल्यानंतर सात चौक बचावले. महालाच्या मध्यवर्ती भागात, कुलस्वामीनी तुळजा भवानीचे मंदिर आहे. शंभू उर्फ आबासाहेब महाराजांचा वध, या मंडपामधे झाला, अशी ग्वाही इतिहास देतो. मंडपाच्या जवळच शाहू महाराजांच्या स्मरणार्थ, छत्रपती शाहूंचा हुबेहूब पुतळा आहे. शिकारीची त्यांची आवड चिरकाल लक्षात राहावी यासाठी, शिकार केलेले, पेंढा भरलेले वाघ व रेडा तिथे ठेवले आहेत. रंगीत माश्यांनी सजविलेली उजव्या बाजूची बखर, शिवाचे छोटेखानी मंदिर, – या साऱ्यामुळे इतिहास जणू इथे जिवंत होतो. शाहू महाराजांची कन्या, श्रीमंत अक्कासाहेब महाराज यांच्या विवाह सोहळयाच्या काळात, इ. सन. १९१८ मधे या देवळासमोरच भव्य मंडप बांधण्यात आला. नंतर १९२६ ते ३० च्या दरम्यान, छत्रपती राजाराम महाराजांनी सदर मंडपाला नवे रूप प्राप्त करून दिले. मूळच्या लाकडी कमानी बाजूला काढून, हया मंडपाचे एका भव्य आणि मोकळया सभागृहात रूपांतर केले. मंडपाच्या आवाराच्या विस्तृत रक्षक भिंतींच्या मोठमोठया चौकांमधे, मोतीबाग व्यायामशाळा, राजवाडा पोलिस स्टेशन, तसेच महाराष्ट्र बटालियन यांचे कामकाज सुरळीतपणे चालते.